वझरे सजामध्ये कायमस्वरूपी तलाठी नेमण्यात यावा
अन्यथा उपोषण छेडणार ; वझरे, गिरोडे, माटणे, आंबडगाव ग्रामस्थांचा दोडामार्ग तहसीलदारांना इशारा
दोडामार्ग - वार्ताहर
वझरे सजामध्ये स्वतंत्र कायमस्वरूपी तलाठी नेमण्यात यावा अशी वारंवार मागणी तहसीलदार दोडामार्ग यांच्याकडे केली. मात्र त्यांनी प्रत्येकवेळी प्रभारी तलाठी नेमून ग्रामस्थांची दिशाभूल केली आहे. कायमस्वरूपी तलाठी नसल्यामुळे ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे तात्काळ कायमस्वरूपी तलाठ्याची नेमणूक करावी अन्यथा उपोषण छेडण्याचा इशारा वझरे, गिरोडे, माटणे, आंबडगाव आदी गावातील ग्रामस्थांनी दिला आहे. याबाबतचे एक निवेदनही तहसीलदार दोडामार्ग यांना दिले आहे.
वझरे तलाठी सजामध्ये वझरे, गिरोडे, माटणे, आंबडगाव हि चार गावे येतात. या गावांची सुमारे ५ ते ६ हजार लोकसंख्या आहे. या सर्व लोकांची कायमस्वरूपी तलाठी नसल्यामुळे मोठी गैरसोय होत आहे. प्रभारी तलाठ्यावर त्यांच्या मुळ सजाच्या कामाचा व्याप जास्त असतो. त्यामुळे त्यांना दोन्ही ठिकाणी म्हणावा तसा लक्ष व वेळ देता येत नाही. वझरे तलाठी सजा हा जुना आहे.
[ तलाठ्यांसोबत कोतवालाची ही नेमणूक करावी ]
वझरे सजामध्ये तलाठ्यांसोबत कोतवालाची ही तात्काळ नेमणूक करण्यात यावी. व कायमस्वरूपी कार्यालय खुले करावे. कायमस्वरूपी तलाठी नसल्यामुळे शाळेच्या मुलांना शिक्षणकामी लागणारे उत्पन्नाचे दाखले वेळेत भेटत नाही. वारस तपासाची प्रकरणे चार - पाच महिने पडून राहतात., नैसर्गिक किंवा रानटी जनावरांनी केलेल्या नुकसानाची भरपाई वेळेत मिळत नाही., सातबारा हवा असल्यास तलाठी वेळेत भेटत नाही. भेटले तर नेटवर्कचे कारण समोर येते. आदी अनेक समस्या तलाठी नसल्यामुळे उद्भवत आहेत तरी तात्काळ आमच्या ग्रामस्थांच्या या मागणीचा विचार करून तलाठ्यांनी व करकुनाची कायमस्वरूपी नेमणूक करावी अन्यथा सर्व ग्रामस्थ मिळून उपोषण छेडू असा इशारा निवेदनाद्वारे तहसीलदार दोडामार्ग यांना दिला आहे. या निवेदनावर सुरेश गवस (वझरे सरपंच), लक्ष्मण गवस (वझरेचे माजी सरपंच), विठ्ठल नाईक (माटणे ग्रा. पं. सदस्य), अर्जुन गवस, गजानन शिरोडकर, प्रशांत गवस, बाळा गवस, सुशांत गवस यांसह अनेक ग्रामस्थांच्या सह्या आहेत.
छाया - समीर ठाकूर