आष्टा शहरात अंधश्रद्धेचा कळस
आष्टा :
आष्टा शहरात अंधश्रद्धेने कळस गाठला आहे. गेल्या महिन्याभरात करणीचे दोन प्रकार उघडकीस आल्यानंतर गुरुवारी सकाळी उतारा टाकल्याचा तिसरा प्रकार उघडकीस आला आहे. आष्टा दुधगाव रस्त्यावर आधार वृद्धाश्रमासमोर हा उतारा टाकण्यात आला असून यामध्ये दहीभात, दोन लिंबू, दोन फोडलेले नारळ तसेच हळदीकुंकू टाकण्यात आले आहे. हा प्रकार पाहून नागरिकांच्या भीतीचे वातावरण पसरले आहे. यापूर्वी झाडाला लिंबू टांगण्यात आला होता. तसेच एका घरासमोर चिठ्ठ्या टाकून करणी केली होती.
गुरुवारी सकाळी आष्टा-दुधगाव रस्त्यावर आधार वृध्दाश्रमासमोर पेपरच्या कागदावर दोन नारळ फोडून तसेच हळद-कुंकू लावलेले लिंबू आणि दहिभात असा उतारा टाकल्याचे सकाळी नागरिकांच्या निदर्शनास आले. हा प्रकार पाहिल्यानंतर नागरिकांचे भीतीचे वातावरण पसरले. अनेकांनी या उताऱ्याचे फोटो काढून सोशल मीडियावर टाकले. शहरात अनेक अंधश्रद्धेचे प्रकार घडत आहेत. असे सातत्याने प्रकार घडत असल्याने शहरातील नागरिक भयभीत झाले आहेत.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीने अशा प्रकाराकडे लक्ष देण्याची गरज आहे. असे प्रकार करणाऱ्याच्यावर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. अशी अपेक्षा सुजाण नागरिकांतून व्यक्त होत आहे. याबाबत बोलताना सामाजिक कार्यकर्ते सुधीर हिरुगडे म्हणाले, आष्टा शहरात मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धेचे प्रकार निदर्शनास येत आहेत. अनेक सुशिक्षित नागरिक अंधश्रद्धेत अडकले आहेत. सामाजिक प्रबोधनातून या बाबी वरती अटकाव करणे आवश्यक आहे. २१ व्या शतकातील जग हे अंतराळात मुक्काम करण्याचे स्वप्न पाहत असताना नीमशहरी भागामध्ये असे प्रकार हास्यास्पद वाटत आहेत.