ओटवणेत श्रमदानातून स्मशानभूमीचा साकारला चिरेबंदी मार्ग
मांडवफातरवाडीच्या उपक्रमाला उद्योजक सुरेश तावडे यांचे सहकार्य
ओटवणे : प्रतिनिधी
ओटवणे मांडवफातरवाडी मुख्य रस्त्यापासून स्मशानभूमीकडे जाण्यासाठी मांडवफातरवाडी ग्रामस्थांनी एकत्र येत श्रमदानाच्या माध्यमातून एक उत्कृष्ट चिरेबंदी मार्ग साकारला. मांडवफातरवाडी ग्रामस्थांच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.ओटवणे मुख्य रस्त्यापासून काही अंतरावर उंचावर मांडवफातरवाडी स्मशानभूमी आहे. उतार असल्यामुळे पावसाळ्यात येथून अंत्ययात्रा नेणे धोक्याचे बनत होते. त्यामुळे हा चिरेबंदी मार्ग करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मांडवफातरवाडीतील वासीयांनी या श्रमदानात उत्स्फूर्त सहभाग घेतला. या मार्गावर एकामागोमाग एक सरळ उभे चिरे रचण्यात आले. हा मार्ग उंचावर असल्याने पावसाने वाहून जाऊ नये यासाठी पारंपरिक आणि मजबूत असा हा चिरेबंदी मार्ग करण्यात आला. ओटवणे मांडवफातरवाडीचा श्रमदानाचा हा उपक्रम सर्वांसाठी आदर्शवत आहे.
उद्योजक सुरेश तावडे यांचे सहकार्य
ओटवणे गावचे मुंबईस्थित उद्योजक सुरेश तावडे यांच्या संकल्पनेतून ही स्मशानभूमी साकारली असून या स्मशानभूमीसाठी त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. स्मशानभूमीच्या या चिरेबंदी मार्गासाठीही सुरेश तावडे यांनी चिरे उपलब्ध करून दिले. याबद्दल त्यांचे मांडवफातरवाडीवासीयांनी आभार मानले.