मंगला एक्स्प्रेसची साखळी प्रवाशाने खेचली अन्..
खेड :
गोव्याच्या दिशेने जाणारी मंगला एक्स्प्रेस शनिवारी सकाळी नियोजित वेळेत दाखल झाली. मात्र एका प्रवाशाचा मार्गच चुकल्याने मंगला एक्स्प्रेसमध्ये घुसलेल्या प्रवाशाने साखळी खेचताच काहीतरी विपरित घडल्याच्या शक्यतेने लोकोपायलटने स्थानकालगतच्या पॉईंट १ जवळ एक्स्प्रेसला थांबा दिला. या साऱ्या प्रकारानंतर प्रवासी अवाक् झाले. रेल्वेच्या यंत्रणांची तारांबळ उडाली. यामुळे मंगला एक्स्प्रेससह अन्य गाड्यांच्या सेवांवरही परिणाम झाला. त्या प्रवाशावर कारवाईची प्रक्रिया रेल्वे प्रशासनाकडून सुरू होती.
कल्याण-मुंबई येथे वास्तव्यास असलेल्या एका उच्चभ्रू प्रवाशाला रेल्वे गाडीने मुंबईला जायचे होते. मात्र गोव्याच्या दिशेला जाणाऱ्या मंगला एक्स्प्रेसमध्ये हा प्रवासी चढला. एक्सप्रेस गोव्याच्या दिशेने जात असल्याची माहिती इतर प्रवाशांकडून मिळाल्यानंतर त्याने क्षणाचाही विलंब न लावता आपत्कालीन साखळी खेचली. यामुळे एक्स्प्रेसमध्ये काहीतरी गडबड झाल्याच्या शक्यतेने लोकोपायलटने एक्स्प्रेस थांबवली.