पिल्लांसोबत भेदभाव करणारी पोपटाची प्रजाती
काही पिल्लांना मरण्यासाठी देतात सोडून
जगात अनेक प्राणी असे आहेत, जे स्वत:च्या पिल्लांच्या देखभालीकरता फारसे चांगले नसतात. काही प्राणी तर स्वत:च्या पिल्लांचे भक्षण करण्यासाठी बदनाम आहेत. परंतु यात एक अनोखा पक्षीही सामील आहे. स्कार्लेट मॅका किंवा लाल पोपट हे स्वत:च्या इंद्रधनुष्यी पंखांसाठी प्रसिद्ध आहेत. परंतु या प्रजातीचा पोपट स्वत:च्या पिल्लांसोबत भेदभाव करतो आणि काहीवेळा स्वत:च्या पिल्लांना वाऱ्यावर सोडून देतो. नव्या अध्ययनात वैज्ञानिकांनी या वर्तनाचे कारण शोधून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
टेक्सास ए अँड एम कॉलेज ऑफ वेटरनरी मेडिसीन अँड बायोमेडिकल सायन्सेसच्या संशोधकांनी हे अध्ययन केले आहे. स्कार्लेट मॅका स्वत:च्या पिल्लांसोबत पक्षपात करतो, हा त्याच्या स्वभावाचा एक क्रूर पैलू आहे, परंतु वैज्ञानिकांनी याचे कारण शोधून काढले असता ते देखील चकित करणारे ठरले आहे. लाल पोपट स्वत:च्या पिल्लांना पसंत करत नाही किंवा त्यांची देखभाल करू शकत नाही असे नाही. लाल पोपट जाणूनबुजून स्वत:च्या सर्वात छोट्या पिल्लाला अन्न देत नाही. या घोर पक्षपातामुळेच केवळ एक किंवा दोन पिल्लू जिवंत राहण्याची कला शिकू शकतात.
स्कार्लेट मॅका जितक्या पिल्लांना वाढवते, त्याहून अधिक प्रमाणात पिल्लांना जन्म देत असते. स्कार्ले मॅकाच्या पिल्लांमध्ये 26 टक्के दुसऱ्या क्रमांकाचे पिल्लू आणि जवळपास सर्व तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचे पिल्लू मृत्युमुखी पडत असते असे पशूचिकित्सा रोगविज्ञान विभागाचे प्राध्यापक डॉ. डोनाल्ड ब्राइटस्मिथ यांनी सांगितले आहे.
अशा प्रेमळ जीवांना मरण्यासाठी कसे सोडले जाऊ शकते असा प्रश्न उपस्थित होतो. या पक्ष्यांसाठी आईवडिलांची भूमिका कमी जटिल नसल्याचे वैज्ञानिकांचे सांगणे आहे. प्रत्येक पिल्लू अंड्यातून एकाच दिवशी बाहेर पडत नाही, कारण स्कार्लेट मॅका एका दीर्घ कालावधीपर्यंत अंडे देत असते याकडे शूबोट सेंटर फॉर एव्हियन हेल्थच्या प्रमुख संशोधिका डॉ. गॅब्रिएला विगो-ट्राउको यांनी लक्ष वेधले आहे.
अंड्यातू पिल्लू बाहेर पडण्याचा वेगवेगळा दिवस पाहता लाल पोपटाच्या भोजनसंबंधी निर्णयांवर प्रभाव पडतो. अंड्यातून पिल्लू बाहेर पडण्याचा कालावधी चार किंवा त्याहून अधिक दिवसांपर्यंत वेगळा असतो, अशा स्थितीत प्रत्येक पिल्लूसाठी आईवडिलांची देखभाल वेगवेगळी होऊ लागते. हे अंतर सर्वात छोट्या पिल्लूची भयावह उपेक्षा आणि त्यानंतर उपासामुळे मृत्यूचे कारण ठरते.
अध्ययनाचे निष्कर्ष पाहता टेक्सास ए अँड एमच्या वैज्ञानिकांनी या समस्येवर मात करण्यासाठी एक उपाय तयार केला आहे. यामुळे पिल्लांचे होणारे मृत्यू कमी करता येणार आहेत. उपेक्षित पिल्लांसाठी पालक आईवडिल या गंभीर समस्येवर उपाय ठरू शकतो. म्हणजेच अशी व्यवस्था ज्यात इतरांच्या पिल्लांना पाळण्याची व्यवस्था असेल, ज्यामुळे लाल पोपटांच्या जोडीवर पिल्लांचे पोषण करण्याचा दबाव तयार होणार नाही. हा मानवी हस्तक्षेप ठरू शकतो, परंतु योग्य दिशेने एक धक्का देण्यासारखा हा प्रकार असल्याचे वैज्ञानिकांनी म्हटले आहे.
उपेक्षित पिल्लांना काही आठवड्यांपर्यंत कैदेत ठेवले जाते मग त्यांना पोपटांच्या घरट्यांमध्ये ठेवण्यात येते. यामुळे ती समान विकासात्मक अवस्थेत असतात, पालन कार्यक्रमाचे यश हे सर्व पिल्लू जवळपास एकाच आकारात दिसावीत हे सुनश्चित करते. यामुळे लाल पोपट या पिल्लांना आपले मानू शकतात. हे अध्ययन डायवर्सिटी या नियतकालिकात प्रकाशित झाले आहे.