बिबट्याच्या जोडीची आरोसमध्ये दहशत
रात्रीचा मुक्त संचार ; शिकारीसाठी थेट घराच्या अंगणात
त.भा.वार्ताहर
न्हावेली : सावंतवाडी तालुक्यातील आरोस नाबरवाडी परिसर गेल्या दोन महिन्यांपासून वस्तीत घुसणाऱ्या दोन बिबट्यांच्या दहशतीखाली आहे.स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीतीचे सावट आहे.येथील रहिवासी शैलेश गजानन नाबर यांच्या घराच्या परिसरात नर आणि मादी बिबट्याचा हा मुक्त वावर सीसीटीव्हीत कैद झाला आहे.अधिक माहिती अशी की,नाबरवाडीत गेल्या काही दिवसांपासून बिबट्याकडून पाळीव प्राण्यांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले होते.शैलेश नाबर यांनी आपल्या घराबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्यात हे बिबट्या अगदी घराच्या उंबरठ्यापर्यत येत असल्याचे धक्कादायक दृश्य कैद झाले आहे.रात्रीच्यावेळी जेव्हा हे बिबट्या शिकार शोधण्यासाठी वस्तीत शिरले तेव्हा कुत्रा आणि इतर पाळीव श्वानांनी जोरदार भुंकून संपूर्ण परिसर डोक्यावर घेतला.या सतर्कतेमुळे घरातील लोक जागे झाले आणि बिबट्याला तिथून पळ काढावा लागला.या श्वानांमुळे केवळ नाबर कुंटुब नव्हेच तर संपूर्ण वाडीतील नागरिक दहशतीखाली आहेत. याप्रकरणी वनविभागाला पाचारण करण्यात आले असता त्यांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली.वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कॅमेर्यात दिसणारी मादी बिबट्याने नुकताच पिल्लांना जन्म दिला आहे . नियमानुसार लहान पिल्ले असलेल्या मादीला पिंजऱ्यात पकडून तिचे स्थलांतर धोकादायक ठरु शकते.कारण अशा स्थितीत मादी अधिक आक्रमक होण्याची शक्यता असते.त्यामुळे वनविभागाने सध्या केवळ देखरेख ठेवण्यावर भर दिला आहे.
तोडगा काढण्याची ग्रामस्थांची मागणी !
सद्या आरोस येथे बिबट्याच्या मुक्त वावरामुळे रात्रीच्यावेळी रात्रीच्यावेळी बाहेर पडणे मुश्किल झाले आहे.येथील ग्रामस्थांनी वनविभागाकडे यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्याची मागणी केली आहे.
-- वारंवार मानवी वस्तीत बिबट्या आपल्या शिकारीसाठी येत असल्यामुळे गावात भितीचे वातावरण आहे.याला कारण म्हणजे वृक्षतोड तसेच खनिज उत्खनन होत असल्यामुळे हे जगंली प्राणी मानवी वस्तीत येऊन पाळीव प्राण्यांवर हल्ला भक्ष करतात.यदाकदाचित ते मानवी जीवांवर सुद्धा हल्ला करतील.यामुळे सद्या रात्री घराच्या बाहेर जाणे जीव मुठीत घेऊनच जावे लागत आहे.वनविभागाने ग्रामस्थांच्या प्राण्यांच्या सुरक्षेसाठी ठोस पाऊले उचलण्याची अत्यंत गरज आहे.
-- शैलेश गजानन नाबर,ग्रामस्थ आरोस नाबरवाडी
--------------
-- सद्या आरोस परिसरात बिबट्याच्या दहशतीमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.याबाबत वनविभागाने ताबडतोब बंदोबस्त करावा.या बिबट्यामुळे एखादी दुर्घटना घडून जिवीतहानी झाली तर याला जबाबदार कोण ? सद्या रात्रीच्यावेळी बाहेर पडणे सुद्धा मुश्किल झाले असून मागील काही दिवसांपूर्वी येथील शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरे गायींवर बकऱ्यांवर बिबट्याने हल्ला चढवत नुकसान केले होते.याबाबत तात्काळ वनविभागाने दखल घेऊन या बिबट्याचा बंदोबस्त करावा.
--------------
शंकर नाईक,ग्रामपंचायत आरोस प्रशासक