For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मालवण नगरपालिका निवडणुकीत येणार नवा ट्वीस्ट

03:43 PM Nov 13, 2025 IST | अनुजा कुडतरकर
मालवण नगरपालिका निवडणुकीत येणार नवा ट्वीस्ट
Advertisement

मालवण नागरी आघाडी निवडणूक रिंगणात उतरणार

Advertisement

मालवण (प्रतिनिधी)

मालवण नगरपालिका निवडणुकीत सद्यस्थितीत महायुती आणि महाविकास आघाडीबाबत कोणताही ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे या दोन्हीमधील घटक पक्षांनी आपापले उमेदवार उभे करण्याच्या दृष्टीने व्युहरचना आखली असतानाच या निवडणुकीत नव्याने काही जणांनी इच्छुक उमेदवार आणि अपक्ष उमेदवार यांची एकत्रित मोट बांधून मालवण नागरी आघाडी स्थापन करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. मालवण नगरपालिकेच्या निवडणुकीत मालवण नागरी आघाडी स्थापन करण्यासाठी मालवणचे माजी नगरसेवक श्री. तुळशीदास गांवकर यांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे जवळपास नऊ वर्षांनी होणाऱ्या या निवडणुकीत मतदारांसाठी मालवण नागरी आघाडी हा एक पर्याय निर्माण होणार असल्याने या निवडणुकीत एक ट्वीस्ट निर्माण झाला आहे. मालवण नगरपालिकेची निवडणूक तब्बल नऊ वर्षांनी होत आहे. गेली चार वर्षे मालवण नगरपालिकेवर प्रशासकाची राजवट होती. त्यामुळे काही विकासकामे रखडल्याचा आरोप नागरिकांमधून होत होता. खास करून गेली कित्येक वर्षे रखडलेली भुयारी गटार योजना, शहरातील वाहतूक कोंडी, स्ट्रीटलाईट समस्या, विजेचा होणारा खेळखंडोबा, शहरात जागोजागी साचणारे कचऱ्याचे ढीग, आरोग्य व्यवस्था, अधून मधून बिघडणारी नळपाणी योजना यामुळे मालवणवासीय त्रस्त झाले आहेत. या सर्व प्रश्नांची उकल करण्यासाठी मतदारांना एक नावा पर्याय निर्माण करून देणे गरजेचे आहे आणि म्हणून १९८५ आणि २००२ मध्ये मालवण नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत विजयी झालेले तुळशीदास गांवकर यांनी आता यां निवडणुकीत उडी घेण्याचे ठरविले असून "मालवण शहराचा विकास हाच आमचा ध्यास" असा अजेंडा ठेवून मालवणात मालवण नागरी आघाडी निर्माण करून निवडणूक लढविण्याचा विचार आपण करीत आहोत, जे लोक शहर विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी तळमळीने कार्य करू इच्छितात तसेच जे अपक्ष म्हणून निवडणूक लढवू पाहत आहेत अशा लोकांची मोट बांधून ही मालवण नागरी आघाडी स्थापन केली जात आहे. यात सर्वपक्षीय लोकांचा समावेश असेल. ही मालवण नागरी आघाडी कोणत्याही एका पक्षाच्या दावणीला बांधली जाणार नाही, असे स्पष्ट करून माजी नगरसेवक तुळशीदास गांवकर यांनी मालवण नागरी आघाडीच्या झेंड्याखाली निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांनी तुळशीदास गांवकर - मोबा. नं. - ९४२२३७९३७९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन श्री. गांवकर यांनी केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.