For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘त्या’ खून प्रकरणात नवा ट्विस्ट उघड

09:56 AM Jun 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘त्या’ खून प्रकरणात नवा ट्विस्ट उघड
Advertisement

मृतदेहाची विल्हेवाट, खुनाची जबाबदारी घेण्यासाठी 30 लाख रु. दिल्याचे स्पष्ट

Advertisement

बेंगळूर : अत्यंत व्रूरपणे रेणुकास्वामी याचा खून केल्याप्रकरणी बेंगळूर पश्चिम विभागाच्या पोलिसांनी अभिनेता दर्शन, अभिनेत्री पवित्रा गौडा यांच्यासह 13 आरोपींची कसून चौकशी चालविली आहे. या प्रकरणात आणखी चौघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून अटकेतील आरोपींचा आकडा 17 वर पोहोचला आहे. दरम्यान, रेणुकास्वामीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी दर्शनने एका टोळीला 30 लाख रुपये दिल्याची माहिती उघड झाल्याने नवीनच ‘ट्विस्ट’ उघड झाली आहे. चित्रदुर्गमधील रहिवासी रेणुकास्वामी याच्या खूनप्रकरणी पोलिसांनी बुधवारी आरोपींची कसून चौकशी केली, यावेळी महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली. खुनासाठी वापरलेली महिंद्रा स्कॉर्पिओ आणि जीप रँग्लर ही दोन वाहने जप्त करण्यात आली आहेत. सीसीटीव्ही फुटेजवरून ही वाहने रेणुकास्वामीला कोंडून ठेवण्यात आलेल्या शेडजवळ जात असल्याचे दिसून आले आहे. वाहनांची तपासणी केली असता एका वाहनात दारुची बाटली आणि वॅनिटी बॅग आढळली. वॅनिटी बॅग पवित्रा गौडाची असल्याचे समजते.

जीप रँग्लर दर्शनचा निकटवर्तीय विनय याच्या नावे नोंदणी आहे. हिच जीप दर्शन बेंगळूरमध्ये फिरण्यासाठी वापरत होता. रेणुकास्वामीचा खून झालेल्या रात्री याच वाहनातून तो राजराजेश्वरीनगर येथील शेडमध्ये गेल्याचे समजते. तर स्कॉर्पिओ दर्शनचा आणखी एक निकटवर्तीय प्रदोष याच्या नावावर नोंदणी झालेली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीवरून स्कॉर्पिओतून आरोपींनी रेणुकास्वामीचा मृतदेह सुमनहळ्ळी येथील नाल्यापर्यंत नेल्याचे उघडकीस आले आहे. जीप आणि स्कॉर्पिओ या वाहनाचे मालक विनय आणि प्रदोष हे देखील पोलिसांच्या ताब्यात आहेत. या वाहनांमधील ठसे फॉरेन्सिक लॅबच्या तज्ञांनी तपासणीसाठी घेतले आहेत. मृतदेह देखील नेण्यासाठी स्कॉर्पिओचा वापर केल्याने आणखी पुरावे गोळा केले जात आहेत. दोन दिवसात अटक करण्यात आलेल्या 17 आरोपींचे मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. फोन कॉल्सवरूनही प्रकरणाचा तपास केला जात आहे.

Advertisement

‘त्या’ आक्षेपार्ह संदेशानंतर दर्शन संतप्त

दर्शनचा चाहता असलेला रेणुकास्वामी हा फेब्रुवारी महिन्यापासून पवित्रा गौडा हिला अश्लील संदेश पाठवत होता. 7 जून रोजी त्याने अत्यंत आक्षेपार्ह फोटो पाठवून टिप्पणी केली होती. त्यामुळे पवित्राने तिच्या घरात काम करणाऱ्या पवनला माहिती देऊन याविषयी दर्शनला सांगू नको, असे सांगितले होते. मात्र, पवनने दर्शनला ही माहिती दिली. त्यामुळे संतप्त झालेल्या दर्शनने आपल्या गटातील सहकाऱ्यांच्या मदतीने रेणुकास्वामीला बेंगळुरला बोलावून त्याचा खून केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणात दर्शनवर खून, अपहरण आणि पुरावे नष्ट केल्याचा आरोप असून गुन्हा सिद्ध झाल्यास त्याच्यावर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.

मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी दुसऱ्या टोळीला जबाबदारी

प्रकरणात दुसरा आरोपी असणारा दर्शन याने रेणुकास्वामीचा मृतदेह फेकून देण्यासाठी आणि खुनाची जबाबदारी घेण्यासाठी तिघांना 30 लाख रुपये दिल्याचे समजते. बेंगळूर पश्चिम विभागाच्या पोलिसांनी केलेल्या तपासातून ही बाब समोर आली आहे. शेडमध्ये रेणुकास्वामी जबर मारहाण करून खून केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी दुसऱ्या टोळीला बोलावून घेण्यात आले. या टोळीला 30 लाख रुपये देऊन मृतदेह सोपविण्यात आला. टोळीने मृतदेह सुमनहळ्ळीतील नाल्यात फेकून दिला. मृतदेह पोलिसांच्या हाती लागताच भयभीत झालेल्या या टोळीने पोलिसांपुढे शरणागती पत्करली. पोलिसांच्या चौकशीदरम्यान त्यांनी खरा प्रकार सांगितला.

खून झालेल्या शेड परिसरात पंचनामा

बेंगळूरच्या अन्नपुर्णेश्वरीनगर पोलिसांनी कन्नड सिनेअभिनेता दर्शन, अभिनेत्री पवित्रा गौडा यांच्यासह अटकेतील सर्व 13 आरोपींना रेणुकास्वामी याचा खून करण्यात आलेल्या शेड परिसरात नेऊन पंचनामा केला. बुधवारी सकाळी दर्शन, पवित्रा गौडा वगळता इतर आरोपींना रेणुकास्वामी याचा मृतदेह फेकून दिलेल्या सुमनहळ्ळी नजीकच्या नाला परिसरात नेऊन पाहणी करण्यात आली.

चित्रदुर्गमध्ये दर्शनविरोधात मोर्चा, आंदोलन

रेणुकास्वामी याच्या खुनाचा निषेध नोंदविण्यासाठी चित्रदुर्गमध्ये बुधवारी विविध संघटनांनी आंदोलन केले. प्रकरण सीबीआयकडे सोपविण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. चित्रदुर्गमधील निलकंठेश्वर मंदिरापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून दर्शनच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली.

Advertisement
Tags :

.