झारापला शिवरायांच्या पुतळ्या नजीकच नवीन पुतळा उभारला
अ. भा.मराठा महासंघाचे कार्यकर्ते, शिवप्रेमी आक्रमक; 2 मार्चपासून आमरण उपोषणाचा इशारा.
कुडाळ -
मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर झाराप - जांभळं येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जुन्या पुतळ्या नजीक शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला अज्ञातांनी शिवाजी महाराजांचा बेकायदेशीर नवीन पुतळा उभारल्याने अखिल भारतीय मराठा महासंघाचे कार्यकर्ते व शिवप्रेमी आक्रमक झाले.त्यांनी यासंदर्भात बैठक घेत आपल्या संतप्त भावना आणि खेद व्यक्त केला. संबंधितांवर कायदेशीर कारवाई व्हावी तसेच जुन्या पुतळ्याबाबत राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या लेखी आश्वासनाप्रमाणे कार्यवाही होत नाही.या मागणीसाठी 2 मार्चपासून त्या पुतळ्याकडे मराठा महासंघाच्यावतीने आमरण उपोषण करण्याचा इशाराही देण्यात आला. दरम्यान, उपोषणाबाबतचे निवेदन कुडाळचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम व अन्य संबंधित विभागांना मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अँड सुहास सावंत व कार्यकर्त्यांनी दिले. महामार्गावर झाराप - जांभळ येथे शिवाजी महाराज यांच्या जुन्या पुतळ्याच्या नजिक काही विकृत प्रवृत्तीच्या अज्ञातांनी शिवजयंतीच्या आदल्या रात्री महाराजांच्या नवीन पुतळ्याची स्थापना केली. हा प्रकार निदर्शनाला येताच मराठा महासंघाचे कार्यकर्ते व शिवप्रेमीनी संताप व्यक्त केला. साळगाव येथील सावित्री मंगल कार्यालयात मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष ॲड सावंत यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची बैठक घेतली. विनय गायकवाड, रूपेश बिडये, अनुप नाईक, मनोहर येरम, शैलेश घोगळे,बंड्या काळप, संतोष परब, वैभव जाधव, प्रसाद दळवी, समीर पालव, संदीप सावंत, भिकाजी बागवे, वसंत गायकवाड, सूरज घाटकर, वैभव पवार, अमेय धुरी, एकनाथ धुरी, उमेश धुरी, महेश वारंग, विजय नाईक- सरमळकर, मिलिंद नाईक, ओंकार घाटकर, किरण म्हापदी, लक्ष्य शितप आदी कार्यकर्ते आणि शिवप्रेमी उपस्थित होते.
शिवाजी महाराज यांच्या तेथील जुन्या पुतळ्यांचे योग्य ठिकाणी स्थलांतर करून पूर्णाकृती स्मारक केले जात नाही,तोपर्यंत जुन्या पुतळ्याला हात लावणार नाही, असे लेखी आश्वासन महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले होते. त्यातच पूर्वीपासून तेथे असलेल्या महाराजांच्या पुतळ्याचे विधिवत विसर्जन करण्यापूर्वीच गटारावर धोकादायक ठिकाणी अयोग्य आणि बेकायदेशीर पणे रात्रीच्या वेळी काही विकृत प्रवृत्तींनी ठेकेदारांच्या अडचणी दूर करण्यासाठी पुतळा आणून ठेवला. आज त्या ठिकाणी बाजू - बाजुलाच दोन पुतळे झाले आहेत. ही महाराजांची आणि शिवप्रेमींची क्रूर चेष्टा केली आहे,अशा भावना बैठकीत व्यक्त करण्यात आल्या. तसेच पुढील लढ्याची रणनीतीबाबत चर्चा करून सर्व निर्णय घेण्याचे अधिकार एकमताने ॲड सावंत यांच्याकडे देण्यात आले. जोपर्यंत हा विषय कायमस्वरूपी मार्गी लागत नाही, तोपर्यंत झाराप - येथील जुन्या पुतळ्याच्या ठिकाणी 2 मार्चपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला. दरम्यान, अँड सावंत व महासंघाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासन व अन्य संबंधित शासकीय विभागांना निवेदन दिले.