For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

भारत-अमेरिका मैत्रीची नवी गरुडझेप

06:46 AM Oct 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारत अमेरिका मैत्रीची नवी गरुडझेप
Advertisement

जगातील दोन मोठे लोकशाही देश असूनही भारत-अमेरिका यांच्यातील संबंध कधी नव्हे ते आलेखाच्या खालच्या बिंदूवर पोहोचले होते. मैत्रीचा हा आलेख आता पुन्हा चढत्या क्रमाने विकसित होत आहे. आखातामधील वाढलेला तणाव होर्मुझची नाकेबंदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टाकलेले टेरिफ बॉम्ब यामुळे ताणलेले भारत-अमेरिका संबंध पुन्हा निवळत आहेत.

Advertisement

विशेषत: ट्रम्प महोदयांनी भारत-चीन व इतर काही देशांवर रशियन तेल खरेदीवरून लावलेले शंभर टक्के टेरिफचे अस्त्र तात्पुरते मागे घेतले आणि त्यामुळे पूर्णावस्थेत पोहोचलेला भारत-अमेरिका ट्रेड डील पूर्ण होण्याच्या दृष्टीने लागलेले ग्रहण सुटले असे म्हणायला वाव मिळाला. त्यातही अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांचा तीन दिवसांचा मुंबई दौरा यशस्वी ठरला व खुद्द ट्रम्प यांनीच म्हटल्याप्रमाणे भारत-अमेरिका आता सुंदर आणि मधुर संबंधासाठी खूप जवळ येत आहेत.

चार प्रमुख फलश्रुती

Advertisement

दोन्ही सरकारमधील ताणलेले संबंध कमी करणे हा या दौऱ्याचा प्रमुख उद्देश होता. पहिली बाब म्हणजे व्हिसा नियमात सवलती देण्याची गरज आहे. दुसरे म्हणजे आपल्याला आवश्यक अशा क्रिटिकल मिनरलचा पुरवठा करण्याचे अमेरिकेने मान्य केले आहे. त्यामुळे सोलर पॅनलबाबत चीनचे परावलंबन कमी होईल. तिसरे म्हणजे अंतिम टप्प्यावर असलेला ट्रेडही पूर्ण होण्याच्या मार्गाने पुढे जाईल. चौथे म्हणजे संरक्षण उत्पादन क्षेत्रातील भागीदारी दोन्ही देशांचे सामर्थ्य वाढवू शकेल.

या सर्व उपलब्ध फलितामुळे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांचा तीन दिवसांचा भारत दौरा सफल ठरला आहे आणि या दौऱ्यात अडकून पडलेले अनेक प्रवाह मोकळे झाले आहेत. त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे बरेच दिवस लटकलेला भारत-अमेरिका व्यापार करार आता लवकरच फलद्रुप होण्याची चिन्हे दिसत आहेत. दुसरे म्हणजे भारताने व्हेनेझुआलाकडून कच्च्या तेलाची खरेदी करावी आणि आपल्या शुद्धीकरण यंत्रणेतून हे तेल शुद्ध करून जगाला पुरवावे या प्रक्रियेला अमेरिका आता हिरवा कंदील दाखवत आहे. परराष्ट्र मंत्री महोदयांनी तर भारताचे वर्णन जागतिक तेल शुद्धीकरणाची राजधानी या शब्दात केले आहे. त्यामुळे शुद्धीकरण क्षेत्रात भारताचा क्रमांक पहिला आहे, हे सांगायला आता ज्योतिषाची गरज नाही. अमेरिकन परराष्ट्र मंत्र्यांच्या तीन दिवसीय मुंबई दौऱ्यानंतर मोठी कोंडी फुटली आहे व व्यापार कराराच्या मार्गातील धोंड किंवा अडचण दूर होण्याच्या मार्गावर आहे तसेच प्रामुख्याने दोन्ही देशातील आर्थिक व धोरणात्मक भागीदारी बळकट करण्याच्या दिशेने नवी पावले टाकली जात आहेत. हा दौरा त्यामुळे उभय देशातील ताणलेले संबंध सुरळीत करण्याच्या दिशेने एक दमदार पाऊल म्हणून महत्त्वाचा ठरला आहे. या दौऱ्याचे भूराजकीय दृष्टीने काय महत्त्व आहे व त्याचे संभाव्य परिणाम काय होतील याची चर्चा प्रस्तुत लेखात केली आहे.

मुंबईत अमेरिकन स्वातंत्र्याचा महोत्सव

दिनांक 20 ऑक्टोबर रोजी मुंबईमध्ये अमेरिकन स्वातंत्र्याचा 250 वा वर्धापन दिन अमेरिकन दूतावासाकडून उत्साहात साजरा करण्यात आला. भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर तसेच अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो आणि भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर व उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महोत्सव थाटामाटात साजरा झाला. यानिमित्ताने द्विपक्षीय व्यापार कराराचा आढावा घेण्यात आला. विस्तृत राजकीय चर्चेत भारत-अमेरिका संबंधांचे सिंहावलोकन करण्यात आले. आता व्यापार करार अतिशय जवळ आल्याचे अमेरिकन परराष्ट्र मंत्र्यांनी नमूद केले, दोन्ही नेत्यांनी 21 व्या शतकात भारत-अमेरिका यांच्यातील मैत्री अधिक भक्कम करण्याचा निर्धार व्यक्त केला. ऊर्जा, संरक्षण आणि नागरी विमान सेवा या क्षेत्रातील भव्य प्रगतीचा विशेष उल्लेख करण्यात आला.

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी भू राजनैतिकदृष्टीने भारत अमेरिका मैत्रीचे महत्त्व प्रतिपादन केले. ही असाधारण धोरणात्मक भागीदारी आहे. दोन्ही देश प्रत्येक मुद्यावर सहमत नाहीत. उभयतांनी आर्थिक आणि व्यावसायिक भागीदारीवर भर दिला आहे. गुंतवणुकीत आघाडीवर असलेल्या गुगल, मेटा आणि सिटी बँक यासारख्या पाचशेहून अधिक मोठ्या अमेरिकन कंपन्या मुंबईत कार्यरत आहेत. तसेच भारतीय शेअर बाजारातील परदेशी भांडवलामध्ये अमेरिकन संस्थात्मक गुंतवणूकदार हा सर्वात मोठा गट आहे. या संबंधाने विविध पैलूंवर चर्चा करण्यात आली.

ट्रेड डील कोंडी फुटण्याच्या मार्गावर सध्या भारत आणि अमेरिकेतील आर्थिक व्यापार 240 दशलक्ष डॉलर्स एवढा आहे तो पुढील पाच वर्षात 500 दशलक्ष डॉलर्सचा करावयाचा आहे. व्यापार दुप्पट करण्याचे हे आव्हान या नव्या ट्रेड डीलचे सर्वात मोठे यश असणार आहे. गेल्या दोन वर्षापासून भारत-अमेरिका ट्रेड डील म्हणजे व्यापार कराराचे गुऱ्हाळ चालू आहे. आखाती युद्धाची गुंतागुंत तसेच पाकिस्तानची लुडबुड व होर्मुझची नाकेबंदी, भारतीय जहाजावर झालेले हल्ले अशा अनेक अडचणी येत गेल्या व होता होता हा करार लांबणीवर पडत गेला.भारताचे व्यापार मंत्री पियुष गोयल यांनी जी-20 व्यापार मंत्र्यांच्या परिषदेत भाग घेतला आणि त्यांनी अमेरिकन उच्चस्थांशी चर्चा करून कोंडी फुटण्यासाठी चांगली वातावरण निर्मिती केली. आता त्यांच्या प्रयत्नास अधिक चांगले फळ येत आहे. आता व्यापार करार अंतिम टप्प्यात आला आहे. खुद्द परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी माध्यमांना अशी माहिती दिली की बहुप्रतिक्षेत असलेला हा व्यापार करार अंतिम टप्प्यात आलाय. केवळ काही तांत्रिक बाबतीत काही उपचार शिल्लक आहेत. पुढील काही आठवड्यात या करारावर स्वाक्षरी होण्याची दाट शक्यता आहे असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या या निवेदनाला लॉलीपॉप म्हणता येणार नाही. खरेच त्यामागे काही भक्कम सूत्रबद्ध प्रयत्न आहेत.  (पूर्वार्ध)

प्रा. डॉ. वि. ल. धारूरकर

Advertisement
Tags :

.