For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

भारत-अमेरिका मैत्रीची नवी गरुडझेप

06:40 AM Nov 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारत अमेरिका मैत्रीची नवी गरुडझेप
Advertisement

भारतीय शिष्टमंडळाने अनेक दिवसांपासून अमेरिकन तज्ञांशी सखोल चर्चा करून कराराला अंतिम रूप दिले आहे. पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचा असा आग्रह आहे की कुठल्याही परिस्थितीत भारतीय शेतकऱ्यांच्या हितांचे रक्षण झाले पाहिजे. भारतीय शेतमाल असो दुधाचे पदार्थ असो किंवा अमेरिकेतून होणारी संभाव्य शेतमालाची निर्यात असो याबाबतीत अमेरिकेचा आग्रह असूनही भारताने तो नाकारला आहे. शेतकऱ्यांच्या हितसंबंधाचे रक्षण करण्यासाठी भारत वचनबद्ध आहे, याची ग्वाही दिली आहे. त्यामुळे कुठल्याहीबाबतीत आपल्या राष्ट्रीय धोरणाची पायमल्ली होणार नाही यावर लक्ष देऊन हा करार केला जाणार आहे हे विशेष होय.

Advertisement

(उत्तरार्ध)

ऊर्जा, अन्नसुरक्षा आणि तंत्रज्ञान या नवीन जगापुढील तीन प्रमुख समस्या आहेत. हे आता अमेरिकेलाही पटले आहे. जगात ऊर्जा संकट निर्माण झाले तर पुरवठा साखळी तुटेल भाववाढ होईल आणि सारे जग अमेरिकेला शिव्यांची लाखोली वाहील. हा धोका त्यांनी ओळखला आणि त्यांनी अचानक निर्णय फिरवला व शंभर टक्के टॅरिफ रद्द केले. मार्को रुबियो यांच्या मुंबई भेटीनंतर दोन्ही देशांमध्ये ऊर्जा क्षेत्रातील सहकार्याचे नवयुग उदयास आले आहे. त्याचे कारण म्हणजे भारताची कच्च्या तेलाची शुद्धीकरण क्षमता हे होय. परराष्ट्र मंत्र्यांनी खुद्द स्वत: जामनगरला भेट दिली आणि तेथील शुद्धीकरण प्रकल्पांची पाहणी केली. त्यांना त्याची खात्री पटली आणि त्यांनी आता व्हेनेझुएलाकडून भारताला कच्च्या तेलाची खरेदी करण्यासाठी हिरवा कंदील दाखविला आहे.

Advertisement

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प महोदयांनी रशियाकडून घ्यावयाच्या भारताच्या संकल्पित योजनेस 60 दिवसांची तात्पुरती का होईना मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे पुढील दोन महिन्यात भारत कच्च्या तेलाचे शुद्धीकरण प्रकल्प त्वरेने पूर्ण करेल याची अमेरिकेलाही खात्री आहे. कोट्यावधी भारतीयांच्या ऊर्जा गरजा पूर्ण करण्यासाठी भारताला कच्च्या तेलासाठी रशियावर अवलंबून राहावे लागते. भारताचे हे रशियावरील अवलंबित्व कमी करता येत नाही हे अमेरिकेने प्रथमच मान्य केले आहे. जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर होणाऱ्या प्रतिकूल परिणामांचा अभ्यास करण्यासाठी ही सवलत देण्यात आली आहे. हे ट्रम्प यांचे सूत्र लक्षात घेण्यासारखे आहे. त्यामुळे भारताची आर्थिक राजधानी मुंबई आणि संपूर्ण जगावर होणाऱ्या ऊर्जा परिणामांचा विचार करता हा दौरा कलाटणी देणारा ठरला आहे.

भारत आणि जगाच्या अर्थकारणावर होणाऱ्या परिणामांचा विचार करून आणि ऊर्जा केंद्रांना प्राधान्य देण्याची अमेरिकेची भूमिका त्यामुळे लक्षणीय ठरली आहे. मुंबईमध्ये मार्को रुबियो यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन व्यापार तसेच संरक्षण तंत्रज्ञान क्षेत्रातील भागीदारीवर सुद्धा सविस्तर चर्चा केली आहे. अमेरिकन परराष्ट्र मंत्र्यांनी भारताची तेल शुद्धीकरण राजधानी जामनगरला भेट दिली आणि तेथील शुद्धीकरण प्रक्रियेचा अभ्यास केला. त्यामुळे त्यांना भारताच्या कच्च्या तेलाबाबतच्या मौलिक शुद्धीकरण क्षमतांची प्रत्यक्षात खात्री पटली आहे. व्हेनेझुएला येथे असलेला कच्च्या तेलाचा साठा भारताला उपलब्ध करून देऊन जागतिक बाजारपेठेत निर्माण झालेले ऊर्जा संकट कमी करता येईल, याची अमेरिकेला खात्री पटत आहे. शिवाय भविष्यकाळात अमेरिकेत तेल शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यासाठी सुद्धा अमेरिका भारत सरकारची मदत घेऊ शकते. त्याची चाचपणी करण्यासाठी सुद्धा हा दौरा महत्त्वाचा ठरला आहे.

चतुष्कोनी समिटबाबत नवे सुतोवाच

चीनचा वन बेल्ट वन रोड हा प्रकल्प आशिया प्रशांत क्षेत्रात नव्या समस्या निर्माण करत आहे तसेच वाढती सागरी चाचेगिरी अस्थिरता आणि दहशतवादी हल्ले पाहता या सर्व अडचणीवर मात करण्यासाठी क्वाड संघटनेचा जन्म झाला. अमेरिका आणि भारत हे क्वाडचे दोन प्रमुख शिल्पकार आहेत. आधारस्तंभ आहेत. दहशतवाद एक राक्षसी प्रवृत्ती आहे. नव्या संभाव्य संकटाशी मुकाबला करताना आणि दहशतवादास रोखण्यासाठी आता त्यामुळे या दोन देशांवर याबाबत खरी जबाबदारी येऊन पडते. याकरीता या समूहातील चारही देश समर्थ आहेत. विशेषत: हिंद प्रशांत क्षेत्रातील चीनच्या वाढत्या हालचालींना लगाम घालण्यासाठी म्हणून क्वाडचा चांगला उपयोग होतो. मागील दिल्ली परिषदेमध्ये क्वाड देशांनी एक नवी कृती योजना तयार केली. भारत, ऑस्ट्रेलिया, जपान, अमेरिका यांच्यातील क्वाड देशांची उच्चस्तरीय शिखर परिषद या वर्षाच्या अखेरीस फिलिपिन्सची राजधानी मनीला येथे आशियान परिषदेच्या निमित्ताने आयोजित केली जाण्याची शक्यता आहे. या परिषदेमध्ये भारत आणि अमेरिका संरक्षण भागीदारीच्या दिशेने अधिक समीप येत आहेत.

दोन्ही देशातील भूदल, नौदल आणि हवाई संरक्षण क्षेत्रातील संबंध तसेच आता सागर क्षेत्रातील ही सामाजिक भागीदारी अधिक उपयुक्त ठरणार आहे. शिवाय अंतराळ संशोधन क्षेत्रात दोन्ही देशांचे सहकार्य नित्यनेमाने पुढे चालू आहे. इस्रो आणि नासा यांच्यातील संयुक्त प्रकल्प हे जगातील मानव जातीच्या कल्याणासाठी महत्त्वाचे आहेत. विशेषत: हवामान बदलाचे धोके आणि नैसर्गिक आपत्तीबाबत उपयुक्त सूचना देणारा उपग्रह दोन्ही देशांनी तयार केला आहे. मागील दहा वर्षापासून याबाबतचे सहकार्य चालू होते. आता त्याबरोबरच माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम प्रज्ञा या क्षेत्रातील सहकार्यसुद्धा महत्त्वाचे ठरणार आहे. उद्याच्या समृद्ध अमेरिकेसाठी आजच्या प्रतिभाषाली भारताबरोबर सहकार्य केल्याशिवाय अमेरिकेला मागा म्हणजे ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ हे स्वप्न साकार करता येणे अशक्य आहे, हे हळूहळू अमेरिकेतील थिंक टॅंकला पटू लागले आहे.

जागतिक दहशतवादाचा धोका

दहशतवादाच्या राहुकेतुमुळे जागतिक लोकशाहीला खग्रास सूर्यग्रहण लागले आहे. हा धोका भारताने ओळखला आहे. आता अमेरिकासुद्धा भारताच्या सुरात सूर मिसळून दहशतवादाला विरोध करण्यासाठी पुढे सरसावली आहे ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. भारताने अमेरिकेला वारंवार याची जाणीव करून दिली आहे की अमेरिकेने एक समर्थ लोकशाही राष्ट्र म्हणून काम करताना जागतिक लोकशाहीला सूर्यग्रहण लावणाऱ्या देशांबाबत कमालीचे सावध असले पाहिजे आणि दहशतवादाच्या गंभीर प्रश्नाकडे अमेरिका दुर्लक्ष करते की काय असे वाटत होते परंतु प्रसार माध्यमांना दिलेल्या मुलाखतीमध्ये मार्को रुबियो यांनी अगदी ठामपणे स्पष्ट केले आहे की अमेरिका जागतिक स्तरावर कोणत्याही प्रकारच्या दहशतवादाचा कडाडून विरोध करते आणि दहशतवादाचा समूळ नायनाट करण्यावर अमेरिकेचा भर आहे. त्यावरून अमेरिकेची दहशतवाद विरोधातील भूमिका पुन्हा परखड व ठाम होत आहे काय असा प्रश्न विचारला जात आहे. युरोपातील दंगली आणि अस्थिरता याबाबतीत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प महोदयांनी अलीकडे केलेले विधान मोठे सूचक आहे. त्यांच्या मते युरोपातील अस्थिरतेला दहशतवादी प्रवृत्ती कारणीभूत आहेत. तेथील स्थलांतरितांचा प्रश्न त्यांनीच गंभीर बनवला आहे, हा त्यांचा स्पष्ट आरोप अमेरिकेच्या बदलत्या धोरणाच्याबाबतीत अधिक सूचक म्हटला पाहिजे.

प्रा. डॉ. वि. ल. धारूरकर

Advertisement
Tags :

.