‘रॅम्बो’चा नवा प्रीक्वेल येतोय
मुख्य भूमिका साकारणार नोआ सेंटिनियो
सिल्वेस्टर स्टेलोनचा गाजलेला चित्रपट ‘रॅम्बो’ सीरिजचा पुढील चित्रपट ‘जॉन रॅम्बो’ प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात नोआ सेंटिनियो मुख्य भूमिकेत आहे. ‘जॉन रॅम्बो’ हा चित्रपट ‘रॅम्बो’च्या प्रारंभिक दिवसांची कहाणी दाखविणार असून ती 1982 मध्ये प्रदर्शित या सीरिजचा पहिला चित्रपट ‘फर्स्ट ब्लड’च्या पूर्वीच्या काळावर आधारित आहे.
या चित्रपटात सिल्वेस्टर स्टेलोनच्या जागी आता नोआ सेंटिनियो मुख्य भूमिका ‘जॉनी रॅम्बो’च्या रुपात आहे. या चित्रपटात स्ट्रेंजर थिंग्ज फेम डेव्हिड हार्बर ‘मेजर ट्रॉटमॅन’च्या भूमिकेत आहे. त्यांच्यासोबत जेम्स फ्रँको, जेसन टोबिन आणि क्विंसी यशायाह यासारखे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
या चित्रपटाचे दिग्दर्शन जलमारी हेलँडर यांनी केले आहे. सिल्वेस्टर स्टेलोन आणि मार्वल फिल्मसाठी प्रसिद्ध दिग्दर्शक ‘रुसो ब्रदर्स’ या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत. ही पूर्ण सीरिज ‘जॉन रॅम्बो’ नावाच्या अमेरिकेच्या माजी सैनिकाच्या अवतीभवती घुटमळणारी आहे, जो व्हिएतनाम युद्धाच्या भयावह अनुभवांना तोंड देणारा आहे. स्वत:चे सैन्य प्रशिक्षण आणि कौशल्याचा वापर तो भ्रष्ट पोलीस, शत्रू आणि ड्रग माफियांच्या विरोधात लढण्यासाठी करतो. या सीरिजमध्ये आतापर्यंत 5 चित्रपट आले आहेत.