For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महायुतीत नव्या सत्तासंघर्षाची सुरूवात

06:57 AM Jun 22, 2026 IST | Tarun Bharat Portal
महायुतीत नव्या सत्तासंघर्षाची सुरूवात
Advertisement

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा लोकसभा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्षांतर केल्याचे आता जवळपास नक्की झाले आहे. ज्या एका खासदारामुळे ऑपरेशन A new power struggle begins within the Mahayuti.टायगरला ब्रेक लागण्याची शक्यता होती, त्या ओमराजे निंबाळकर यांनी आपली भूमिका जाहीर केल्यानंतर शिंदे यांची महाराष्ट्रातील आणि दिल्लीतील राजकीय ताकद वाढलेली आहे. खासदारांच्या संख्येत शिवसेना हा राज्यात आता मोठा भाऊ झाला आहे. ऑपरेशन टायगरनंतर एकनाथ शिंदे यांच्या भविष्यातील राजकीय महत्त्वाकांक्षांबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

Advertisement

महाराष्ट्राच्या राजकारणात जून 2022 मध्ये शिवसेनेच्या 40 आमदारांनी उध्दव ठाकरेंची साथ सोडत बंड केले होते, त्यानंतर पुन्हा एकदा बरोबर चार वर्षानंतर जून 2026 मध्ये उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या 6 खासदारांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचे निश्चित झाले आहे. 2019 ची विधानसभा निवडणूक ठाकरे भाजपसोबत महायुतीत लढले. मात्र निवडणूकीनंतर त्यांनी भाजपला सत्तेपासून दूर ठेवत काँग्रेस, राष्ट्रवादी या पक्षांना सोबत घेत महाविकास आघाडीचा नवा प्रयोग केला. या प्रयोगाचा निष्कर्ष आणि सिध्दांताची झळ सगळ्यात जास्त ठाकरेंना बसली, उध्दव ठाकरे यांच्या या एका निर्णयामुळे त्यांना भाजपने एकनाथ शिंदेंच्या साथीने धक्का दिला. आता पुन्हा एकदा शिंदे यांनी ठाकरे यांना दुसरा धक्का दिला आहे. यावेळी राज्यातील भाजपचा शिंदेना पाठिंबा होता की नाही माहित नाही, पण दिल्लीतील मोठ्या नेत्यांचा शिंदेना पाठिंबा होता. शिंदे यांनी केलेल्या ऑपरेशन टायगरमुळे लोकसभेत शिंदे गटाची संख्या वाढणार आहे. त्यामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीत शिंदे यांचे महत्त्व अधिक वाढण्याची शक्यता आहे. सहा खासदारांच्या बंडामुळे शिंदे यांचे राजकीय वजन वाढलेच, मात्र त्याचबरोबर राज्यातील महायुतीतील शिवसेना आणि भाजप यांच्यातील सत्तासंघर्षाची सुप्त स्पर्धा आता सुरू होण्याची शक्यता आहे.

मला हलक्यात घेऊ नका असे शिंदे नेहमी त्यांच्या भाषणात म्हणतात, ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून शिंदे यांनी हे सिध्द कऊन दाखवले आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राज्यातील वाढणारी ताकद, प्रभाव आणि कमी करण्यासाठी अमित शाहांनीच शिंदेंना बळ दिल्याचा आरोप विरोधक करताना दिसत आहेत. दिल्लीतील भाजपच्या नेत्याचे वैशिष्ट आहे की, ते कधीच कोणाला त्या राज्यात प्रस्थापित नेता होऊ देत नाहीत. तीन वर्षापूर्वी राजस्थान आणि मध्यप्रदेश विधानसभा निवडणूकीच्या वेळी हे दिसले, या राज्यात अनेक दिग्गज आणि प्रस्थापित नेत्यांना मागे टाकत राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी भजनलाल शर्मा आणि मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी डॉ.मोहन यादव यांना बसवले. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांचा वाढलेला राजकीय प्रभाव ना पक्षांर्तगत विरोधक, ना विरोधीपक्ष त्यामुळे राज्याच्या राजकारणात देवाभाऊ हे वन साईड आहेत. देवाभाऊ कधी शिंदेंना जवळ कऊन उध्दव ठाकरेंना शह देतात, तर कधी मिलिंद नार्वेकरांनी फोन केल्यावर महापालिकेत सुधार समितीत आलेले प्रस्ताव मंजुर होऊ न देता, उध्दव ठाकरेंना मदत करतात. त्यामुळे शिंदे हे अस्वस्थ होतात, नाशिकच्या विधानपरिषद निवडणूकीत शिंदेंच्या दराडेंचा भाजपने गेम केला. तिकडे साताऱ्यात शंभुराज देसाईंचा पण असाच गेम केला. त्यामुळे शिंदे यांना शह देण्याची एकही संधी भाजप सोडत नाही, मात्र शिंदे यांनी केलेल्या ऑपरेशन टायगरने राज्यातील भाजप नेत्यांसोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना शह दिला आहे. आता हा शह देण्यासाठी शाह यांचा पाठिंबा, फडणवीसांचे वाढणारे राजकीय वजन कमी करण्यासाठी असल्याचे बोलले जात आहे.

Advertisement

अमित शाह यांना उध्दव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाला कोणत्याही परिस्थितीत मुळापासून संपवायचे आहे आणि हे त्यांनी अनेकदा जाहिरपणे बोलून दाखवले की, शिवसेना को उखाड के फेक दो, कारण 2019 च्या विधानसभा निवडणूकीच्या वेळी मातोश्रीवर झालेल्या बंद दाराआडच्या चर्चेत शाह स्वत: हजर होते आणि ठाकरे यांनी शाह यांना खोटे ठरवले होते. त्यानंतर शहा यांनी शिवसेनेला संपवण्यासाठी राज्यातील नेत्यांना बळ दिले. शिवसेनेत फुट पडल्यानंतर उध्दव ठाकरे यांच्या नव्या पक्षाच्या मशाल चिन्हावर निवडून आलेल्या खासदारांना फोडण्यासाठी शाह यांनीच बळ दिल्याचे बोलले जात आहे. शिंदे यांची राजकीय महत्त्वाकांक्षा मोठी आहे, अडीच वर्षे शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. मुख्यमंत्री पदाची ताकद आणि किमया त्यांना माहीत आहे. शिंदे हे लोकप्रिय झाले ते या अडीच वर्षाच्या कालावधीतच. लाडकी बहीण योजना, आनंदाचा शिधा, ज्येष्ठांना तिर्थाटन अशा अनेक योजना त्यांनी लागू केल्या. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री होताच शिंदे यांची केवळ लाडकी बहीण योजना वगळता सगळ्या योजना बंद केल्या. मंत्रीमंडळाची निर्मिती, पालकमंत्री पदाचा निर्णय असो, महत्वाच्या पदांच्या वेळी वाटप करताना शिवसेनेला भाजपने दुय्यम वागणूक दिली. मात्र शिंदे यांनी कधी दरे तर कधी दिल्ली गाठत आपली नाराजी व्यक्त केली. एकनाथ खडसे किंवा सुधीर मुनगंटीवार सारखी जाहीर नाराजी व्यक्त करण्यात काही शहाणपण नसल्याचे शिंदेंना माहित आहे. आपल्याला जे हवं ते भाजपकडूनच मिळणार असल्याने त्यांनी वेगळोवेळी संयम ठेवला, परवा शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यात त्यांनी मोदी यांच्या बारा वर्षाच्या पंतप्रधान काळाचा गौरव केला. शाह आणि मोदी यांची स्तुती करण्याची एकही संधी शिंदे सोडत नाहीत. शिंदे आणि शाह यांचं एकमेव टार्गेट आहे, ते म्हणजे उध्दव ठाकरेंना संपवणे, ठाकरेंची शिवसेना संपवणे, शिंदे शाहांच्या कसोटीला उतरत असल्याने शिंदे हे शाहांचे ब्लू आय झाल्याची सध्या चर्चा आहे. ऑपरेशन टायगरनंतर पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला रविवारी झालेल्या चहापानाच्या वेळी शिंदे यांच्यात कमालीचा आत्मविश्वास दिसत होता. खासदारांचे वाढते समर्थन आणि संघटनात्मक विस्तार लक्षात घेता, भविष्यात एकनाथ शिंदे यांचे नाव पुन्हा मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेत येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

प्रवीण काळे

Advertisement
Tags :

.