For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आरसीपी सिंह यांच्याकडून नवा पक्ष

07:00 AM Nov 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
आरसीपी सिंह यांच्याकडून नवा पक्ष
Advertisement

वृत्तसंस्था/पाटणा

Advertisement

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे नाराज सहकारी माजी केंद्रीय मंत्री आरसीपी सिंह यांनी गुरुवारी ‘आप सब की आवाज’ नावाच्या पक्षाची घोषणा केली आहे. आगामी बिहार विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे.  ‘आप सब की आवाज’ (आसा)च्या बळावर आगामी विधानसभा निवडणुकीत उतरणार आहोत. या पक्षाकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक नेत्यांची संख्या आताच 140 वर पोहोचली असून ही संख्या अजून वाढणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. आमच्या पक्षाचा ध्वज हा तीन रंगांच असणार आहे. आयताकृती ध्वजात सर्वात वर हिरवा, मधल्या भागात पिवळा आणि खाली निळा रंग असणार आहे. मधल्या पिवळ्या रंगात निवडणूक चिन्ह रेखाटले जाणार असल्याचे आरसीपी सिंह यांनी सांगितले आहे. ‘आप सब की आवाज’चे संघटन राष्ट्रीय, राज्य, जिल्हा, तालुका आणि पंचायत स्तरापर्यंत निर्माण केले जाईल. सदस्यत्व अभियान मिस्ड कॉलच्या माध्यमातून राबविण्यात येईल. सदस्यत्व अभियानानंतरच संघटनेला प्रत्येक स्तरावर उभे करण्यात येईल. यानंतर प्रत्येक स्तराचे पदाधिकारी नियुक्त केले जातील अशी माहिती आरसीपी सिंह यांनी दिली.

यापूर्वी होते भाजपमध्ये

Advertisement

संजदमधून बाहेर पडल्यावर माजी केंद्रीय मंत्री आरसीपी सिंह हे मे 2023 मध्ये भाजपमध्ये सामील झाले होते. परंतु भाजपमध्ये महत्त्वाची जबाबदारी न मिळाल्याने त्यांनी स्वत:चा पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. आरसीपी सिंह हे ज्यावेळी भाजपमध्ये सामील झाले होते त्यावेळी त्यांचे विरोधक ठरलेले नितीश कुमार हे महाआघाडीत सक्रीय होते. त्या पार्श्वभूमीवर कुर्मी नेतृत्व आणि नितीश कुमार यांच्या मतपेढीला सुरुंग लावण्यासाठी भाजप आरसीपी सिंह यांना मोठी जबाबदारी देणारी असल्याचे मानले जात होते. परंतु कुठलीच मोठी जबाबदारी न मिळाल्याने सिंह हे निराश झाले होते. त्यानंतर नितीश कुमार हे रालोआत सामील झाल्याने सिंह यांचे राजकीय खच्चीकरण झाले होते.

संजदमधून हकालपट्टी

संजदमध्ये एकेकाळी दुसऱ्या क्रमांकाचे नेते आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले आरसीपी सिंह हे नितीश कुमार यांचे निकटवर्तीय होते. परंतु संजदमध्ये फूट पाडण्याच्या आरोपाच्या अंतर्गत आरसीपी सिंह यांची 2022 मध्ये पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती.

Advertisement
Tags :

.