व्हॅटिकनच्या धर्तीवर नवा मुस्लीम देश
महिलांना असणार पूर्ण स्वातंत्र्य : अल्बानियाच्या पंतप्रधांनी दिली माहिती
वृत्तसंस्था/ तिराना
व्हॅटिकन सिटीला जगातील सर्वात छोटा देश मानले जाते. पोप तेथूनच ख्रिश्चन धर्माशी निगडित प्रकरणांवर मतप्रदर्शन करत असतात. व्हॅटिकनला सिटीला एका देशाचा दर्जा प्राप्त आहे. याच धर्तीवर एका मुस्लीम नेत्याने एक देश निर्माण करण्याचा प्रयत्न चालविला आहे. हा देश अल्बानियाची राजधानी तिरानामध्ये असेल. हा जगातील सर्वात छोटा देश ठरणार असून याचे क्षेत्र न्यूयॉर्कसिटीच्या 5 ब्लॉक इतके असते. येथे मद्यपानाला मंजुरी असेल आणि महिलांना पूर्ण स्वातंत्र्य असणार आहे. त्यांच्यावर राहणीनामाशी निगडित कुठलेच निर्बंध नसतील. अल्बानियाच्या 24 लाख लोकांपैकी 1.15 लाख लोक बेक्टाशी ऑर्डरला मानतात.
तिराना नावाने स्वतंत्र देश निर्माण करण्याचा प्रयत्न मौलवी एडमंड ब्रहीमाज यांच्याकडून केला जात आहे. बाबा मोंडी या नावाने ते ओळखले जातात. हा देश 27 एकरमध्ये निर्माण होणार असून ज्याला अल्बानिया एक स्वतंत्र देश म्हणून विकसित करण्यास तयार आहे. याचे स्वत:चे प्रशासन असेल. सीमा निश्चित होतील आणि लोकांना पासपोर्टही जारी केले जातील असा दावा त्यांनी केला आहे.
अशा एका देशाविषयी आम्ही घोषणा करू. हा देश इस्लामच्या सूफी परंपरेशी निगडित बेक्टाशी ऑर्डरच्या नियमांना मानणार असल्याचे अल्बानियाचे पंतप्रधान ईदी रामा यांनी म्हटले आहे.
बेक्टाशी ऑर्डरची सुरुवात 13 व्या शतकात ऑटोमन साम्राज्याच्या काळात झाली होती. सध्या बेक्टाशी ऑर्डरचे प्रमुख बाबा मोंडी असून ते 65 वर्षांचे आहेत. अल्बानियाच्या सैन्यातही त्यांनी सेवा बजावली आहे. लाखो मुस्लिमांदरम्यान त्यांना मान्यात असून त्यांना हाजी डेडे बाबा या नावानेही ओळखले जाते. बेक्टाशी ऑर्डरचा संबंध शिया सूफी संप्रदायाशी असून याचे मूळ 13 व्या शतकाच्या काळात तुर्कियेत आढळून येते. परंतु आता या समुदायाचा तळ अल्बानियात आहे. नवा मुस्लीम देश आम्ही निर्माण करत आहोत, कारण इस्लामच्या उदारमतवादी चेहऱ्याला जगासमोर आणणे हा आमचा उद्देश आहे असे उद्गार अल्बानियाचे पंतप्रधना ईदी रामा यांनी काढले आहेत.
आम्हाला या ठेव्याचे रक्षण करावे लागेल. याचा अर्थ धार्मिक सहिष्णतेशी असून याला कधीच कमी लेखू नये. आम्ही जो नवा देश स्थापन करणार आहोत, तो पूर्व तिरानामध्ये असेल. याचा आकार व्हॅटिकन सिटीच्या एक चतुर्थांश इतका असेल. यात लोकांवर बंधने नसतील आणि त्यांना स्वत:च्या मनानुसार जगण्याची संधी मिळणार असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
ईश्वर आमच्यावर कुठलेच बंधन लादत नाही असे आम्ही मानतो. याचमुळे ईश्वराने आम्हाला विवेकबुद्धीनुसार काय चुकीचे आहे आणि काय बरोबर आहे हे ठरविण्याची शक्ती दिली असल्याचे बाबा मोंडी यांचे सांगणे आहे.
अल्बानियात बेक्टाशी परंपरा
इस्लामच्या बेक्टाशी प्रथेचा इतिहास 13 व्या शतकातील ओटोमन साम्राज्यामधून मिळतो. एक शतकापूर्वी तुर्किये प्रजासत्ताकचे संस्थापक मुस्तफा कमाल अतातुर्कने या प्रथांवर बंदी घातली होती. या बंदीमुळे बेक्टाशी ऑर्डरचे मुख्यालय तिरानामध्ये हलविण्यात आले. अल्बानियात बेक्टाशी ऑर्डरची दीर्घ रहस्यवादी परपंरा आहे. ही प्रथा कुणालाही काहीही करण्यास भाग पाडत नाही. नव्या देशात निर्णय प्रेम आणि दयेच्या भावनेसह घेतले जातील असे बाबा मोंडी यांनी म्हटले आहे. सध्या तज्ञांची एक टीम अल्बानियात एक सार्वभौम राज्याच्या स्थितीची व्याख्या करणाऱ्या कायद्यावर काम करत आहे. अमेरिका आणि पाश्चिमात्य देश आमच्या देशाच्या सार्वभौमत्वाला मान्यता देतील अशी अपेक्षा बाबा मोंडी यांनी व्यक्त केली आहे.