For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नवा डाव

06:01 AM Jun 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
नवा डाव
Advertisement

तामिळनाडू भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष व आक्रमक हिंदुत्ववादी चेहरा म्हणून प्रसिद्ध असलेल्या अण्णा मलाई यांनी भाजपपासून दूर जाण्याचा घेतलेला निर्णय धक्कादायकच म्हणता येईल. आता पुढच्या टप्प्यात नवा पक्ष काढण्याच्या हालचाली मलाई यांनी सुरू केलेल्या दिसतात. त्यामुळे राज्याच्या राजकारणात नवी उलथापालथ होण्याची चिन्हे आहेत.

Advertisement

तामिळनाडू हे दक्षिणेतील राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील राज्य. या राज्याचे राजकारण प्रामुख्याने द्रमुक व अण्णा द्रमुक या पक्षांभोवतीच फिरते. मात्र, थलपती निर्मित टीव्हीकेच्या विजयी एन्ट्रीनंतर या राज्याचे राजकारण मोठ्या प्रमाणात ढवळून निघालेले दिसते. अशातच अण्णा मलाई यांच्या भूमिकेने तामिळनाडूमध्ये नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. दक्षिणेत आत्तापर्यंत भाजपला मोठी मजल मारता आलेली नाही. अपवाद कर्नाटकचा. तामिळनाडूमध्ये पक्षाने प्रयत्न जरूर केले. पण, तिथे त्यांना यश मिळाले नाही. ज्यांचा चेहरा पुढे आणून हात पाय पसरण्याचा प्रयत्न केला, त्या अण्णा मलाईंनीही रामराम ठोकल्याने पक्षासाठी हा धक्काच मानावा लागेल. माजी आयपीएस अधिकारी असलेले अण्णा मलाई 2020 मध्ये भाजपमध्ये दाखल झाले. आक्रमक शैली, प्रभावी वक्तृत्व आणि भ्रष्टाचाराविरोधातील भूमिकेमुळे अल्पावधीतच त्यांनी स्वत:ची वेगळी ओळख तयार केली. त्यांच्या नेतृत्वामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा निर्माण झाली. मात्र, एआयडीएमकेशी आघाडी करण्यास विरोध असलेल्या अण्णा मलाई यांचे प्रदेशाध्यक्षपद अगदी विधानसभेच्या तोंडावर काढून घेण्यात आले. त्यांना उमेदवारीही देण्यात आली नाही. त्यामुळे प्रचारातही ते फारसे सक्रिय दिसले नाहीत. या पार्श्वभूमीवर अण्णा द्रमुक, भाजप व सहकारी पक्षांचा राज्यात दारूण पराभव झाला. अशातच पक्षात अस्वस्थ असलेल्या या नेत्याने वेगळी वाट धरल्याने भाजपमधील कार्यकर्त्यांचा व युवा समर्थकांचा एक गटही त्यांच्यासोबत बाहेर पडण्याची शक्यता आहे. मुळात अण्णा मलाई हे पक्षाचे सर्वाधिक लोकप्रिय नेते आहेत. स्वाभाविकच त्यांनी नवा पक्ष काढल्यास भाजपच्या दक्षिण भारत विस्तार मोहिमेला मोठा फटका बसू शकतो. तामिळनाडूमध्ये गेल्या काही वर्षांत पारंपरिक राजकारणाबद्दल नाराजी वाढताना दिसते. तऊण मतदारांमध्ये नवीन नेतृत्वाबद्दल आकर्षण आहे. विजय थलपती याच्या नेतृत्वाला मिळालेला पाठिंबा हे त्याचे ताजे उदाहरण. त्यामुळे अण्णा मलाई काही प्रमाणात पर्यायी राजकारणाचा चेहरा बनू शकतात. अद्याप तरी अण्णा मलाई यांच्या राजीनाम्याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. परंतु, त्यांच्या हालचालींकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. त्यांनी स्वतंत्र पक्षाची घोषणा केली, तर तामिळनाडूच्या राजकारणात द्रमुक, अण्णा द्रमुक आणि टीव्हीके यांच्यासोबत आणखी एक नवा भिडू मैदानात उतरेल. त्यामुळे तामिळनाडूची सत्तास्पर्धा आणखी टोकदार होण्याची शक्यता आहे. स्टॅलिन यांचा द्रमुक सध्या विरोधी पक्षात आहे. अण्णा मलाई यांचे नवे नेतृत्व म्हणून पुढे आल्यास द्रमुकपुढे आव्हान आणि संधीही उभी राहू शकते. मलाई यांच्या पक्षाचा रोख आजतरी सत्ताधारीच असू शकतील. परंतु, विरोधी पक्ष म्हणून आपल्यावरच फोकस कसा राहील, याची काळजी द्रमुकला घ्यावी लागेल. विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघम (टीव्हीके) पक्षाच्या आगमनामुळे तामिळनाडूच्या राजकारणात आधीच तिसरा पर्याय निर्माण झाला आहे. परंतु, पुढच्या पाच वर्षांत विजय कसे काम करतात, लोकप्रियता टिकवतात का, हे महत्त्वाचे असेल. त्यांच्या कारभारात त्रुटी राहिल्या, तर अण्णा मलाई यांची शैली पाहता ते संधी सोडणार नाहीत, हे नक्की. तामिळनाडूमध्ये नवीन पक्षाला तात्काळ सत्ता मिळवणे अवघड असते. विजय यांच्या मागे सिनेसृष्टीतील लोकप्रियता होती. अण्णा मलाईंची पाटी कोरी आहे. त्यांना संघटना मजबूत करतानाच नवा कार्यक्रम द्यावा लागेल. तरच तामिळनाडूच्या राजकीय क्षितिजावर मलाई चमकू शकतात.

Advertisement

Advertisement
Tags :

.