अडूर येथील ग्रामदेवता सुंकाईदेवी नवीन मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न
गुहागर
गुहागर तालुक्यातील अडूर गावातील चतु:सीमेची मालकीण अर्थात अडूर, कोंडकारूळ, बोऱ्या व बुधल गावची ग्रामदेवता श्री. सुंकाई मंदिराचा जीर्णोध्दार व नवीन पाषाणमूर्ती प्राणप्रतिष्ठापणा व कलशारोहण सोहळ्यास सुरुवात झाली आहे. दिनांक २८ फेब्रुवारी ते ०३ मार्च २०२५ या चार दिवसीय कालावधीत मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होत आहेत. नुकताच ग्रामदेवता सुंकाईदेवी मंदिराचा जिर्णोध्दार व कलशारोहण सोहळा मोठ्या थाटात पार पडला. काल दिनांक ०२ मार्च रोजी ग्रामदेवतेचा नवीन पाषाणमूर्ती प्राणप्रतिष्ठापणा सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
ग्रामदेवता सुंकाई मातेचे मंदिर हे अंदाजे १५ व्या शतकातील असावे असे सांगितले जाते. गुहागर- हेदवी सागरी महामार्गावरील अडूर फाट्यावरून बोऱ्या बंदराकडे जाणाऱ्या रोडवरील ५०० मीटर अंतरावर गावाच्या मध्यवर्ती बाजारपेठ ठिकाणी सहाणेपाशीच हे स्थान आहे. या मंदिरात सदैव शांतता असते. चतु:सीमेतील ग्रामस्थांचे श्रध्दास्थान, भक्तांच्या हाकेला धावणारी, नवसाला पावणारी व माहेरवाशींची पाठराखीण असलेली अशी तिची ओळख आहे.
ग्रामदेवता सुंकाई मातेच्या नवीन पाषाणमूर्ती प्राणप्रतिष्ठापणा सोहळा दरम्यान जुन्या मूर्त्या मधील कलशाच्या जलामधील दैवत्व नवीन देवतांमध्ये मंत्रोच्चाराच्या जयघोषात दैवत्व प्राप्त करण्यात आले. यावेळी होमहवन, देवीच्या नावाने जागर गोंधळ, स्थानिक विविध मंडळांची सुस्वर संगीत भजने पार पडली.