भारत-ऑस्ट्रिया संबंधात नवे ऐतिहासिक युग
ऑस्ट्रिया हा देश युरोपमध्ये भू-राजनैतिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा देश आहे.ऑस्ट्रियाने सदैव महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रियाला भेट दिली होती. त्यानंतर ऑस्ट्रियाचे चान्सलर हे चार दशकाच्या कालावधीनंतर प्रथमच भारत भेटीवर आले होते. त्यामुळे दोन्ही देशातील उबदार संबंधांचे महत्त्व लक्षात घेता हा दौरा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
विशेषत: भारत आणि युरोपियन युनियन दरम्यान झालेल्या व्यापारी करारानंतर सर्व युरोपीय देश भारताबरोबर सहकार्य करण्यासाठी आणि आर्थिक व राजकीय संबंध मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यापैकी ऑस्ट्रिया हा एक प्रमुख देश असून, तेथे कुलपती किंवा चान्सलर हे अत्यंत महत्त्वाचे राजकीय पद मानले जाते. त्यामुळे त्यांच्या भेटीचे वैशिष्ट्यापूर्ण स्थान लक्षात घेता विशेष महत्त्व दिले जात आहे.
सामंजस्य करारांचे वेगळेपण
ऑस्ट्रियाचे कुलपती किंवा चान्सलर डॉ. ख्रिश्चन स्टॉकर यांची 16 ते 20 एप्रिल ही चार दिवसांची भारत भेट राजकीय संबंधांना कलाटणी देणारी ठरली. या भेटीदरम्यान दोन्ही देशांनी संरक्षण तंत्रज्ञान आणि सुरक्षेसह 15 महत्त्वाच्या विषयांवर सामंजस्य करारांना अंतिम रूप दिले आहे व त्यावर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. पंतप्रधान मोदींनी स्टॉकर यांच्या या दौऱ्याला चार दशकानंतरचा अत्यंत महत्त्वाचा दौरा, असे म्हटले आहे. त्यांचे हे मत अर्थपूर्ण असून, तेवढेच भू-राजनैतिक दृष्टीने संबंध अधोरेखित करणारे आहे. संमत झालेल्या 15 करारांमध्ये काही महत्त्वाच्या करारांचा विशेष उल्लेख करावा लागेल. त्यामध्ये प्रामुख्याने दोन्ही देशाने संरक्षण स्टार्टअप, हायटेक तंत्रज्ञान, कृत्रिम प्रज्ञा आणि नवीकरणीय ऊर्जा तसेच सायबर सुरक्षा आणि उच्च शिक्षण संशोधन या क्षेत्रात सहकार्य वाढविण्याचे ठरविले आहे.
व्यापार आणि तंत्रज्ञानाला नवी गती
या भेटीच्या प्रमुख उपलब्धी कोणत्या क्षेत्रामध्ये असतील तर त्या व्यापार आणि तंत्रज्ञानात आहेत. उभय देशातील द्विपक्षीय व्यापार वाढविण्यावर भर देण्यात आला आहे तसेच भागीदारी अंतर्गत प्रगत तंत्रज्ञानाची देवाण-घेवाण आणि सहकार्यावर विशेषत्वाने नवी मांडणी करणारे आहे, असे करताना ऑस्ट्रिया हा भारताचा टनेलिंग पार्टनर म्हणून उदयास येत आहे. भारतामध्ये कठीण पर्वतामध्ये बोगदा निर्मिती करण्याचे काम असो तसेच डिजिटल नव प्रज्ञाशोध आणि अक्षय ऊर्जा तंत्रज्ञानाचा विस्तार करण्याचे काम असो तसेच खनिजे उत्पादन शोध याबाबतीत ऑस्ट्रियाच्या सहकार्यामुळे विशेष क्षमता वाढविण्यात येणार आहेत.
भारतामध्ये बोगदा निर्मिती क्षेत्रातील प्रगत ऑस्ट्रियन तंत्रज्ञान वापरले जाईल. त्यामुळे अनेक दुर्गम रस्त्यांमध्ये बोगदे तयार करण्याची सध्याच्या कालखंडात क्रिया सुलभ होणार आहे. सध्याच्या कालखंडात ऑस्ट्रियाच्या 160 कंपन्या भारतामध्ये गुंतवणूक करत आहेत व विविध उत्पादनांत सहकार्य नोंदवित आहेत. या भेटीदरम्यान भारत-ऑस्ट्रिया व्यापारी सहकार्य शिखर बैठकीचे उद्घाटन करण्यात आले आहे, ही गोष्ट सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. त्यामुळे पुढील आर्थिक सहकार्याची मुहूर्तमेढ रोवण्यात आली आहे.
मनुष्यबळ आणि कौशल्य विकास
आधुनिक जगामध्ये भारताचा उदय कौशल्य राजधानी म्हणून झाला आहे. दरवर्षी एक कोटी अभियंते भारतामध्ये निर्माण होत आहेत. त्यांच्या सेवासाठी संधी म्हणून आता सबंध जग हे एक नवे क्षितिज म्हणून उदयास आले आहे. ऑस्ट्रिया हा देश सुद्धा त्याला अपवाद नाही. भारत-युरोपियन संघामध्ये व्यापारी करार झाल्यानंतर आता सर्व युरोपीय देश भारताशी सहकार्य करण्यासाठी उत्सुक आहेत. ऑस्ट्रिया सुद्धा त्यास अपवाद नाही.
युरोपियन देश भारताकडे जगाची ‘कौशल्य राजधानी’ म्हणून मोठ्या आशेने पाहत आहेत. कारण युरोपातील बहुतेक सर्व देशांमध्ये एकतर लोकसंख्या कमी आहे, दुसरे म्हणजे प्रगत मनुष्यबळ उपलब्ध नाही. त्यामुळे जर्मनीपासून ऑस्ट्रियापर्यंत अनेक देशांना भारताचे संबंध वाढवून येथील प्रगत मनुष्यबळाचा त्यांच्या औद्योगिक विकासात उपयोग करावयाचा आहे. या दृष्टीने भारत ऑस्ट्रिया दरम्यान मोबिलिटी आणि स्किल म्हणजे कौशल्य विकास आहे. त्या संदर्भात अनेक महत्त्वाची पावले टाकण्यात आली आहेत. 2023 मधील स्थलांतर कराराचा एक भाग म्हणून
ऑस्ट्रियामधील उद्योग क्षेत्रात आता भारतीय तरुणांना मोठा वाव आहे. संधींचा विस्तार करून अलीकडे अनेक नव्या क्षेत्रांत भारतीय पावले टाकत आहेत. विशेषत:
नर्सिंग क्षेत्रात गतिमानता वाढवण्यावर भर देण्यात आला आहे. त्यासाठी आरोग्य सेवा क्षेत्रात विशेष सहकाऱ्यांची बैठक झाली. ऑस्ट्रियाच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने विविध क्षेत्रांत भारताच्या सहकार्याबद्दल केलेली चर्चा ही खरोखर फलदायी ठरली आहे.
नव्या संधी, नवी आव्हाने!
ऑस्ट्रियाबरोबर संमत झालेल्या 15 करारांमुळे भारतासाठी नव्या संधी खुल्या झाल्या आहेत तसेच त्यामुळे नवी आव्हानेही निर्माण झाली आहेत. व्यापार, तंत्रज्ञान तसेच स्टार्टअप सेमीकंडक्टर या उद्योगातील सहकार्याबरोबरच नवी आव्हाने सुद्धा त्यामुळे निर्माण होत आहेत. त्यांना सामोरे जाण्यासाठी दोन्ही देशांनी भक्कम तयारी केली पाहिजे. ऑस्ट्रियाच्या कुलपतीबरोबर आलेले 40 सदस्यांचे शिष्टमंडळ सर्व पैलूंचा बारकाईने अभ्यास करून करारांना अंतिम रूप देत आहेत, ही समाधानाची बाब होय. ही भागीदारी उभय देशांमध्ये एक नवा मैलाचा दगड ठरली आहे. कुलपती स्टॉकर यांनी सत्ता हाती घेतल्यानंतर आशियातील पहिली पसंती भारताला, असे त्यांनी आग्रहाने नमूद केले.
संरक्षण आणि तंत्रज्ञान भागीदारी
भारत आणि ऑस्ट्रिया दरम्यान संरक्षण उत्पादन क्षेत्रात तसेच प्रगत तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये लष्करी सहकार्य वाढविण्यावर भर दिला जात आहे. या संदर्भात एका सामंजस्य करारावर सह्या करण्यात आल्या. त्यानुसार प्रगत तंत्रज्ञान हस्तांतरण, सायबर सुरक्षा आणि स्टार्टअप उद्योग यासंदर्भात करार करण्यात आले आहेत. संरक्षण क्षेत्रातील भारतीय उत्पादने जगात कमालीची लोकप्रिय होत आहेत. भारतीय क्षेपणास्त्रs, लढाऊ विमाने यांना जगभर चांगली मागणी येत आहे. हे पाहून ऑस्ट्रिया सुद्धा भारताकडून अशी प्रगत शस्त्रs घेण्यासाठी वचनबद्ध आहे.
जागतिक दृष्टीने विचार करता भू-राजनैतिक सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. माहिती तंत्रज्ञान आणि या क्षेत्रात भारताचा वरचष्मा लक्षात घेता ऑस्ट्रिया या बाबतीत भारताकडून मार्गदर्शन घेण्यासाठी उत्सुक आहे.
संस्कृती आणि पर्यटन
भारत आणि ऑस्ट्रिया या देशांमध्ये सांस्कृतिक संबंध प्रस्थापित करून पर्यटनवाढीला कशी चालना देता येईल, याचाही विचार या दौऱ्यात करण्यात आला आहे. विशेषत: भारतातील अनेक अज्ञात पर्यटन स्थळांबाबत ऑस्ट्रियन जनतेमध्ये कमालीची जागरूकता आहे. जोपर्यंत दोन्ही देशांतील संस्कृती, कला, परंपरा यांच्याविषयी उभयतांमध्ये उत्सुकता व जिज्ञासा निर्माण होणार नाही, तोपर्यंत पर्यटन कसे वाढेल हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे ऑस्ट्रियातील लोकांना भारतीय संस्कृती, कला, परंपरा, संगीत, उत्सव यांचा परिचय करून देण्यासाठी एक मोठी योजना आखण्यात आली आहे. तसे झाले म्हणजे मग त्यानंतर ऑस्ट्रियातील पर्यटक भारताकडे मोठ्या संख्येने वळू लागतील आणि त्यामुळे भारताला परकीय चलनसुद्धा अधिक प्रमाणात प्राप्त होऊ शकेल. भारतातील सांस्कृतिक स्थळे आणि पर्यटनाच्या महत्त्वपूर्ण केंद्रांबाबत ऑस्ट्रियामध्ये आकर्षण वाढत आहे. अशावेळी भारत-ऑस्ट्रिया दरम्यान सांस्कृतिक पर्यटनाला गती देणे अत्यंत आवश्यक आहे. या दृष्टीने याबाबत करण्यात आलेल्या सामंजस्य कराराला विशेष संदर्भ आहे.
प्रा.डॉ.वि.ल.धारूरकर