चीन-अमेरिका व्यापार स्पर्धेस कलाटणी देणारा नवा घटक
गेल्या सोमवारी ट्रम्प यांच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील धमकी सत्रात आणखी एका धमकीची भर पडली आहे. ही नवी धमकी अमेरिकेचा व्यापारातील कट्टर प्रतिस्पर्धी चीनला देण्यात आली. जर चीनने एक नोव्हेंबरपर्यंत व्यापार करार अंतिम केला नाही तर अमेरिका आयात चिनी वस्तूंवर 155 टक्के कर लादू शकते, असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. ट्रम्प यांची ही घोषणा युक्रेनमधील रशियाच्या युद्धनीतीस, अप्रत्यक्षपणे इंधन व ऊर्जा व्यापाराद्वारे मदत करत असल्याचे मानले जाणाऱ्या देशांविरूद्ध अमेरिका कर धोरणांची तीव्रता दर्शवते.
मागील उपाय योजनेत रशियाकडून तेल आयात करणारा दुसऱ्या क्रमांकाचा देश भारतावर ट्रम्पनी 50 टक्के आयात कर व 25 टक्के दंड लादला होता. आता पहिल्या क्रमांकावर असलेल्या चीनला लक्ष्य केले गेले आहे. अर्थात, चीनला ट्रम्पनी केलेला हा विरोध केवळ भारतासारखा रशियन तेल आयाती संदर्भात नाही तर त्याच्याशी अनेक पैलू निगडीत आहेत. त्यापैकी एक आहे चीनकडे असलेली दुर्मिळ पृथ्वी धातूंची मक्तेदारी आणि आधुनिक जगास जाणवणारी त्यांची उणीव. दुर्मिळ पृथ्वी धातू हा अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी आवश्यक असलेल्या 17 रासायनिकदृष्ट्या समान धातू घटकांचा समूह आहे. जवळजवळ अविभाज्य, चमकदार चांदीसारखा पांढऱ्या मऊ-जड धातूंचा हा संच तत्वत: दुर्मिळ नाही. कारण ते संपूर्ण पृथ्वीच्या कवचात मुबलक प्रमाणात आढळतात. परंतु ते केवळ संयुगांमध्ये आढळतात, शुद्ध धातू म्हणून नाही. त्यांच्या भू-रासायनिक गुणधर्मांमुळे दुर्मिळ-पृथ्वी घटक सामान्यत: खनिजांवर विखुरलेले असतात. खनिजांमध्ये केंद्रीत आढळत नाहीत. ज्यामुळे आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य सांद्रतेमध्ये त्यांचे उत्खनन, प्रक्रियात्मक शुद्धीकरण आणि अंतिमत: धातूरूपी वापर हा उपक्रम खूपच कठीण आणि महागडा बनतो. पृथ्वी धातुंमध्ये अद्वितीय रासायनिक, चुंबकीय आणि प्रकाशकारी गुणधर्म आहेत. जे त्यांना विविध अत्याधुनिक तंत्रज्ञानात अपरिहार्य बनवतात. संगणक, लॅपटॉप, स्मार्ट फोन्स इ. ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, विद्युत वाहने, पवनचक्क्या, हार्ड ड्राईव्ह, प्रदूषण कमी करणारी कन्व्हर्टर, पॉवर स्टीअरिंग प्रणाली, वैद्यकीय क्षेत्रात एमआरआय, लेसर प्रणाली, कर्करोग, संशोधनासाठी चुंबकीय नॅनोपार्टीकल्स, त्याचप्रमाणे डिजीटल कॅमेरा, एलईडी लाईटस, सौर पंखे, हरीत ऊर्जा अशा अनेक वस्तूंत पृथ्वी धातूंचा वापर अटळ बनला आहे.
या प्रकारच्या उपयुक्तेव्यतिरिक्त लष्कर आणि सुरक्षा प्रणाली आणि कृत्रिम बुद्धीमत्ता क्षेत्रात पृथ्वी धातूंचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. लष्कर व सुरक्षा व्यवस्थेतील रडार प्रणाली, क्षेपणास्त्रs, नाईट-व्हीजन गॉगल, लेसर प्रणाली, ड्रोन्स व उपग्रह, लढाऊ विमाने, नौदल जहाजे व पाणबुड्या, माहिती व संदेशवहन अशा अनेक बाबतीतील आधुनिकीकरण पृथ्वी धातूंमुळे साध्य आहे. सध्या प्राथमिक अवस्थेत असलेले कृत्रिम बुद्धिमता तंत्रज्ञान हे भविष्यकालीन जगाचे क्रांतीकारक तंत्रज्ञान मानले जाते.
जगभरातील डेटा सेंटरमध्ये साठवलेल्या प्रचंड प्रमाणातील माहितीवर हे तंत्रज्ञान अवलंबून आहे. मोठ्या भाषा प्रारूपासारख्या प्रणाली चालवण्यासाठी आवश्यक माहिती साठा प्रक्रिया, उर्जेच्या गरजा सामान्य संगणकांपेक्षा खुपच क्षमतेच्या असाव्या लागतात. यामुळे शीतकरण यंत्रणा, अत्याधुनिक चुंबकीय प्रणाली व शाश्वत ऊर्जा स्त्राsतांची मागणी जास्त असते. या सर्वांसाठी दुर्मिळ पृथ्वी धातू अनिवार्य बनतो. एकूणच पृथ्वी धातूसंबंधीत अनिवार्यता आगामी विकासक्रमात इतकी वाढेल की, त्यामुळे पर्यावरणाचा विनाश होऊन किंवा तिसरे महायुद्ध होऊन पृथ्वीवरच संकटे येतील अशा शक्यता वर्तवल्या जात आहेत. परंतु स्पर्धेने पछाडलेल्या महासत्तांना त्याचे सोयर-सुतक नसल्याचेच जाणवते.
या पार्श्वभूमीवर, अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी चीनवर 155 टक्के आयात कर 1 नोव्हेंबरपासून लादण्याची जी धमकी दिली आहे ती ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्यासह दुर्मिळ पृथ्वी धातू आणि महत्त्वाच्या खनिजांबाबत उभय पक्षी करारांवर स्वाक्षरी केल्यानंतर लागलीच दिली आहे. हे ध्यानी घेणे गरजेचे ठरते. दुर्मिळ पृथ्वी घटकांचे अस्तित्व ऑस्ट्रेलियात मोठ्या प्रमाणात आहे. या संदर्भातील जागतिक, क्रमवारीत त्याचा क्रमांक भारतानंतर चौथा लागतो. (आपल्या भारताची याबाबतची सक्षमता भविष्यासाठी आश्वासक आहे.) अमेरिका-ऑस्ट्रेलिया कराराच्या प्रतीत म्हटले आहे की, दोन्ही देश पुढील सहा महिन्यांत पृथ्वी धातूंसाठी खाणकाम आणि प्रक्रिया प्रकल्पात प्रत्येक 1 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करतील. दोन्ही देशांच्या नेत्यांनी याप्रसंगी जो बायडेन काळात झालेल्या 239.4 अब्ज डॉलर्सच्या कारारावरही चर्चा केली. ट्रम्प-अल्बानीज करार होण्याआधी, काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चीनच्या दुर्मिळ पृथ्वी धातू निर्यात नियंत्रणांच्या विस्ताराचा निषेध केला होता. जागतिक पुरवठा साखळीसाठी अशा प्रकारचे नियंत्रण धोकादायक असल्याचे त्यांचे म्हणणे होते. काही महिन्यांपूर्वी युक्रेनी अध्यक्ष झेलेन्स्की यांच्यासह युद्ध थांबवण्यात मध्यस्थी करण्याप्रसंगी ट्रम्पनी जो करार प्रस्ताव पुढे केला त्यात युक्रेनमधील दुर्मिळ पृथ्वी घटक आणि खनिजे मध्यवर्ती होती. यावरून अमेरिकेची या संदर्भातील निकड व हेतूही पुरेसा स्पष्ट होतो.
दुर्मिळ पृथ्वी घटकांचे अस्तित्व, शुद्धीकरण प्रक्रिया आणि धातू निर्माण यात चीन प्रथम क्रमांकावरील देश आहे. यास्थिती सापेक्षतेत अमेरिका त्याच्या आसपासही नाही. अमेरिकेच्या 2020 ते 2023 च्या दुर्मिळ पृथ्वी घटक आणि धातू आयातीत 70 टक्के आयात चीनवर अवलंबून होती. 90 च्या दशकात चीनचे अध्यक्ष डेंग शिओपिंग यांनी, तेलासाठी मध्यपूर्वेवर अवलंबून असलेले जग यापुढे दुर्मिळ पृथ्वी घटकांसाठी चीनवर अवलंबून असतील असे म्हटले होते. तेंव्हापासून चीनने खाणी आणि खनिज प्रक्रियांमध्ये सातत्यपूर्ण मोठी गुंतवणूक केली आहे आणि आता तो कच्चा धातू, शुद्धीकरण तसेच या प्रवाहातील उत्पादनांवर आणि पुरवठा साखळीवर असामान्य नियंत्रण प्राप्त करून आहे. अमेरिकेने लादलेल्या आयात कर धोरणास उत्तर देताना चीनने 1 डिसेंबरपासून दुर्मिळ पृथ्वी घटकांबाबत नियंत्रण उपाययोजना जाहीर केली.
यानुसार परदेशी कंपन्यांना आता मुळच्या चिनी दुर्मिळ पृथ्वी घटकांचे अगदी कमी प्रमाण असलेले किंवा चिनी खाणकाम प्रक्रिया किंवा चुंबक बनवण्याच्या तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादित केलेले चुंबक निर्यात करण्यासाठी चीन सरकारची परवानगी घेणे आवश्यक असेल. याला दुर्मिळ पृथ्वी धातूंवरील समान अंतिम वापरकर्ता निर्बंध असेही म्हटले जाते. या प्रकारच्या निर्बंधांचा जबर परिणाम अमेरिकेच्या आयात-निर्यात क्षेत्रांवर होणार आहे. अमेरिकेतील ग्राहकोपयोगी वस्तूंपासून संरक्षण, अवकाश तंत्रज्ञान, जहाजे व पाणबुडी निर्माण हे उद्योग व व्यापार यामुळे बाधीत होण्याच्या शक्यता आहेत. जागतिक पुरवठा साखळीत यामुळे कहर होण्याची भीतीही व्यक्त होत आहे.
ट्रम्प यांनी चीनच्या या भूमिकेचा एकतर्फी आणि इतर देशांशी व्यवहारातील नैतिक अपमान म्हणत निषेध केला आणि वाढीव आयात करांची घोषणा केली. वास्तविक चीनने तेच केले आहे. जे अमेरिकेने चीनच्या बाबतीत त्याच्या सेमीकंडक्टर उद्योगास लक्ष्य करताना केले होते. दुसरे असे की, अमेरिका तेलाच्याबाबतीत रशियाकडून आयातीवर भारतासह अनेक देशांवर अशाच प्रकारचे बाह्य निर्बंध लादत आहे. भारत रशियाकडून तेल आयात करताना केवळ अमेरिका आणि तिच्या मित्र देशांच्या रशियावरील एकतर्फी निर्बंधांचे उल्लंघन करत आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार कायद्यांचे नाही. म्हणूनच, चीनच्या निर्बंधांबाबत ट्रम्प यांची आगपाखड ‘आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचे ते कार्टे’ या प्रकारची आहे. व्यवहारातील नैतिकता अमेरिकेने कधीच गमावली आहे. चीनने दुर्मिळ पृथ्वी घटक व धातूंच्या पुरवठ्यावर निर्बंध घालण्याची घोषणा केल्यानंतर अमेरिका आणि इतर देश स्वंयपूर्णता आणि पुरवठा साखळ्यांमध्ये विविधता आणण्यासाठी धडपडत आहेत. चीनने ट्रम्प कर धोरणाने अमेरिकेत खुंटलेल्या निर्यातीची भरपाई युरोपियन महासंघ, आग्नेय आशिया आणि आफ्रिकेशी निर्यात वाढवून केली आहे. परंतु दुर्मिळ पृथ्वी धातूंवर चीनचे वर्चस्व खंडीत करण्यासाठी अमेरिकेसह मित्र देशांना राजकीय इच्छाशक्तीतील सातत्य, अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करूनही दशकभराचा कालावधी लागेल असे अर्थतज्ञांचे मत आहे. तथापि, भविष्यकाळात एका महत्त्वपूर्ण अवलंबित्व कमी झाल्याने चीन-अमेरिका संघर्ष कमी होणार नाही नवी स्पर्धा क्षेत्रे आणि नव्या मूल्य साखळ्यात तो सुरूच राहण्याची चिन्हे आहेत.
- अनिल आजगांवकर