भारत-जपान संरक्षण भागीदारीचे नवे महापर्व
भारत आणि जपानमधील संरक्षण सहकार्य ही आशियाच्या सत्ता समतोलात एक महत्त्वाची घटना असून त्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष वेधले गेले आहे. चिनी ड्रॅगन विरुद्ध दोन आशियाई वाघ एकत्र आले आहेत आणि जबरदस्त गर्जना करत आहेत याचे भूराजनैतिक दृष्टीने आकलन करणे आवश्यक आहे तसा प्रयत्न या लेखात केला आहे.
जपानला उगवत्या सूर्याचा देश असे म्हटले जाते. भारत आणि जपान या दोन्ही देशांमध्ये प्राचीन काळापासून सांस्कृतिक संबंधांची भक्कम परंपरा आहे. बौद्ध धर्म आणि संस्कृतीचा जपानच्या लोकजीवनावर विलक्षण प्रभाव आहे. तसेच भारतीय स्वातंत्र्यलढ्यात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेला जपानचे विशेष सहकार्य लाभले होते. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जपानने संपूर्ण आशिया खंडाला वसाहतवादी पाश्चिमात्य सत्तेपासून मुक्त केले होते. आपल्या प्रगत तंत्रज्ञानाच्या आधारे जपानने बलाढ्या रशिया आणि चीनचा पराभव केला होता. त्याचे खरे कारण म्हणजे पहिल्या व दुसऱ्या महायुद्धानंतर जपानने प्रगत तंत्रज्ञानाच्या आधारे यशाचे शिखर गाठले. जपान संपूर्ण आशिया खंडाचा मित्र मार्गदर्शक आणि तत्त्वचिंतक बनला तसेच संरक्षक म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली.
स्वातंत्र्योत्तर प्रगतीचे नवे पर्व
भारत-जपान संबंधात गेल्या 75 वर्षात अनेक महत्त्वपूर्ण बदल झाले आहेत. विशेषत: पंतप्रधान मोदी यांच्या 2014 ते 26 या बारा वर्षाच्या कालावधीत जपानने भारतामध्ये मौलिक गुंतवणूक केली आहे. माजी पंतप्रधान शिंजो अबे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील मैत्रीचा भक्कम धागा दोन्ही देशांना नव्या वळणावर घेऊन जाणारा ठरला. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा प्रकल्प हा शिंजो अबे यांच्या सक्रिय सहकार्यामुळे गतिमान झाला. लवकरच हा प्रकल्प पूर्ण होईल तेव्हा त्याला भारत-जपान मैत्रीचे प्रतीक असे म्हणता येईल. जपानच्या नव्या पंतप्रधान सानेई ताकाइची यांनी जपानला पुन्हा बलाढ्या बलशाली राष्ट्र करण्याचा संकल्प केला आहे. आता त्यांनी अणुचाचण्या करण्याचे ठरविले आहे तसेच तैवान प्रश्नावर लाल चीनच्या विरोधात तैवान प्रजासत्ताकाला जपान सक्रिय सहकार्य करत आहे. भारत-जपान मध्ये कृषी, उद्योग, शिक्षण, माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम प्रज्ञा तसेच आता सागरी सामाजिक सामंजस्य करार झाले आहेत.
हिंद प्रशांत क्षेत्राचे स्थैर्य
भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि जपानचे संरक्षण मंत्री शिंजिरो कोईझुमी यांच्यात नवी दिल्ली येथे 20 ऑगस्ट रोजी झालेल्या द्विपक्षीय बैठकीनुसार भारत आणि जपानमध्ये सागरी सुरक्षा सहकार्य करार करण्यात आला आहे. दोन्ही देशांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्यानंतर आता दोन्ही देशातील संरक्षण भागीदारी अधिक मजबूत करण्यात आली आहे. दोन्ही देशांनी हिंद प्रशांत क्षेत्रामध्ये शांतता सहकार्य, मुक्त आणि सुरक्षित वातावरण ठेवण्यासाठी संकल्प केला आहे. तसेच भारत सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ आत्मनिर्भर भारत या तत्त्वाच्या आधारे अंतर्गत संरक्षण तंत्रज्ञानाच्या आधारे सह उत्पादन वाढविण्याच्या वचनबद्धतेचा दोन्ही देशांनी पुनरुच्चार केला आहे. ही भागीदारी दोन्ही देशांचे संरक्षण सामर्थ्य वाढविण्यासाठी वरदान ठरली आहे तसेच दोन्ही देशांनी सागर सुरक्षा क्षेत्रात दमदार पावले टाकली आहेत.
सागरी सुरक्षेला प्राधान्य
भारत-जपान दरम्यान झालेल्या या करारामध्ये सागरी सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे. भारतीय नौदल आणि जपानी संरक्षण दल यांच्यातील नवीन सामंजस्य करारावर प्रकाश टाकला असता असे दिसते की हा करार सागरी क्षेत्रातील जागरूकता आणि आपत्कालीन परिस्थितीत उत्तम प्रतिसादाला चालना देणारा आहे. त्यामुळे भारत आणि जपान कुठल्याही सागरी अडचणीप्रसंगी एकमेकांच्या मदतीला धावून जातील आणि चीनसारख्या शत्रू राष्ट्राने हिंद प्रशांत क्षेत्रात कोणत्याही हालचाली केल्या असता त्याला चोख उत्तर देण्याचे सामर्थ्य या दोन्ही देशांमध्ये असल्याचे त्यावरून सिद्ध होते.
संयुक्त सराव मोहिमा
या करारानुसार सागरी आरमार क्षेत्रात दोन्ही देश संयुक्त सराव मोहिमांची आखणी करून आपल्या नौदलात निपुणता आणि निष्णातता आणण्यावर भर देणार आहेत. जपानचे सामुराई आणि भारताचे अग्निवीर आता एकत्र प्रशिक्षण घेऊन नव्या जगात आपल्या शक्ती सामर्थ्याचे दर्शन घडवतील. नियमित सरावांमध्ये लष्करी सराव तसेच सागरी सराव त्यामध्ये वीरगार्डियन अधिक सुसज्य होतील आणि शत्रूच्या कोणत्याही हालचालीचा समर्थपणे मुकाबला करू शकतील हे या कराराचे एक प्रमुख वैशिष्ट्या आहे
संशोधन आणि विकास
प्रगत संशोधन आणि विकास हा भारत जपान संरक्षण कराराचा आत्मा आहे. जपानचे प्रगत संरक्षण तंत्रज्ञान आणि भारताचे ‘मेक इन इंडिया’ हे आत्मनिर्भर धोरण यातील सुसंवादावर यामध्ये भर देण्यात आला आहे. भारताची डिआरडीओ ही संरक्षण उत्पादन यंत्रणा आणि जपानचे एटीएलए यांच्यातील करारानुसार संयुक्त संशोधन व विकासाबरोबर जहाज बांधणी प्रणालीवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. नौदल क्षेत्रात लॉजिस्टिक आणि परस्पर प्रादेशिक सहकार्यावर या कराराने भर देण्यात आला आहे. पुरवठा आणि तत्सम सेवांची परस्परपूरक तरतूद करून आणि सामायिक वाढ उद्दिष्टाद्वारे दोन्ही देश समर्पित भावनेने कार्य करणार आहेत.
नवे समाजशास्त्राrय आकलन
भारत-जपान संरक्षण कराराचे नवे समाजशास्त्राrय दृष्टीने आकलन केले असता या कराराचे खरे महत्त्व अचूक व नेमक्या सुसंवादी वातावरणाला महत्त्व दिले पाहिजे. जेव्हा आजच्या जगाला अमेरिका-इराण तसेच रशिया-युक्रेन युद्धाने ग्रासलेले असताना अशावेळी हिंद प्रशांत क्षेत्रातील सागरी सुरक्षेला प्राधान्य देणारा एक महत्त्वपूर्ण करार भारत-जपान या दोन्ही देशांनी संमत केला आहे, हे नमूद केले पाहिजे. व्यापारी आणि व्यापक धोरणात्मक तरतुदींचे नवे आकलन केले असता असे लक्षात येते की उभय देशांनी संशोधन आणि विकासावर भर देऊन नव्या जगात आशियाची शक्ती वाढविण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.
या समाजशास्त्राrय आकलनाचे मुख्य सूत्र असे आहे की एकीकडे चीन आणि दुसरीकडे आशियातील इतर देश यांच्यातील ध्रुवीकरणाचे प्रभावी चित्र या करारात उमटले आहे. शत्रूचा शत्रू हा आपला मित्र या न्यायाने हिंद प्रशांत क्षेत्रातील अनेक भागीदार भारत व जपानच्या बाजूने वळतील असे त्या मागील समीकरण आहे.
प्रा. डॉ. वि. ल. धारूरकर