कर्नाटकात तरुणांच्या एका नव्या युगाची सुरुवात होईल : शिवकुमार
त. भा. प्रतिनिधी
बेंगळूर :
कर्नाटकातील जनतेचा माझ्यावर विश्वास आहे. मी शेतकरी, महिला आणि तरुणांसह समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन जाईन. कर्नाटकात तरुणांच्या एका नव्या युगाची सुरुवात होईल, असे काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते डी. के. शिवकुमार यांनी म्हटले आहे.
डी. के. शिवकुमार यांनी मंगळवारी नवी दिल्लीत एका वृत्तसंस्थेशी बोलताना वरील प्रतिक्रिया दिली. मी कोणत्याही गोष्टीला स्वप्न म्हणत नाही. मी त्याला कठोर परिश्रमाबरोबरच समर्पण म्हणतो. गांधी परिवाराने माझ्यावर विश्वास ठेवला. त्यांनी मला विविध संधी दिल्या. राजीव गांधींपासून ते आतापर्यंत, मी या परिवाराशी खूप एकनिष्ठ राहिलो आहे. नेहरू परिवारातील सदस्यांनी त्यांना मिळालेल्या विविध पदांचा त्याग केला आहे. सोनिया गांधींनीही उच्च पदाचा त्याग केला. त्या पंतप्रधान होऊ शकल्या असत्या. राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकले असते. पण त्यांनी तसे केले नाही. राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून रस्त्यावर उतरून पदयात्रा केली. कोणत्या नेत्याने इतका मोठा निर्णय घेतला? कोणी इतके कठीण काम केले? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
माझ्यावर ठेवलेल्या विश्वासाशी मी वचनबद्ध
माझ्यावर ठेवलेल्या विश्वासाशी मी पूर्णपणे वचनबद्ध आहे. मी खूप मेहनत करून सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करीन. हा मार्ग तितका सोपा नाही. तथापि, तो सांभाळावाच लागतो. मी माझे काम प्रामाणिकपणाने आणि निष्ठेने करेन. कर्नाटक हे देशातील एक महत्त्वाचे राज्य आहे. त्यामुळे जबाबदारी अधिक मोठी आहे, असे ते म्हणाले.