भारत-फिनलंड यांच्यातील दृढसंबंधांना नवी दिशा
फिनलंड हा नैसर्गिक साधन संपत्तीने युक्त असा एक तेजस्वी सांस्कृतिक परंपरा लाभलेला भूराजनैतिक दृष्टीने महत्त्वाचे स्थान असलेला देश होय. फिनलंडचे अध्यक्ष डॉक्टर अलेक्झांडर स्टब यांचा चार ते सात मार्च 2026 दरम्यान झालेला भारत दौरा अनेक अर्थाने वैशिष्ट्यापूर्ण ठरला आहे. द्विपक्षीय संबंधांमध्ये डिजिटलायझेशन आणि शाश्वत विकासाच्या दृष्टीने धोरणात्मक भागीदारीचा पाया मजबूत करून एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.
डॉक्टर अलेक्झांडर महोदय हे आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक असून त्यांनी लिहिलेला नववा त्रिकोण हा ग्रंथ जगाचे लक्ष वेधून घेणारा ठरला आहे. या ग्रंथामध्ये त्यांनी पूर्व, पश्चिम आणि दक्षिण अशी जगाची विभागणी होत असल्याचे नमूद केले आहे व त्यामध्ये दक्षिणेकडील देशाचा तेजस्वी तारा म्हणून भारताचा उदय झाला आहे, असे नमूद केले आहे. त्यांच्या मते आंतरराष्ट्रीय राजकारणात आता हितसंबंध, शक्तिस्थाने आणि विचारसरणी या तीन घटकांना विशेष महत्त्व प्राप्त होत आहे. भारत जगामध्ये नवी आर्थिक क्रांती नवा चमत्कार घडवित आहे याबद्दल फिनलंडच्या अध्यक्षांनी समाधान व्यक्त केले. भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. परराष्ट्र धोरण हे सन्माननीय आहे, प्रगतीशील आहे, प्रगमनशील आहे, हे सुद्धा त्यांनी मान्य केले. गेल्या दहा वर्षात रायसीना हे एक संवाद स्थळ बनले आहे व जग त्याकडे आकर्षित होत आहे, असे सांगून त्यांनी जागतिक व्यवस्थेत प्रांतदर्शी बदल होत आहेत व भारताचे स्थान वृद्धिंगत होत आहे, असे म्हटले आहे. पश्चिम आशिया आणि युक्रेनमध्ये संघर्ष वाढत आहे. युद्ध संपून शांतता निर्माण होणे ही सध्याची आवश्यकता आहे. बहुराष्ट्रीय व्यवस्थेत क्रांतिकारक बदल झाले पाहिजेत. संयुक्त राष्ट्रसंघात भारताला सुरक्षा परिषदेत कायमस्वरूपी सदस्यता मिळाली पाहिजे यावर त्यांनी भर दिला.
नवीन सैद्धांतिक मांडणी
अकराव्या रायसीना संवाद संमेलनात प्रमुख पाहुणे आणि सन्माननीय वत्ते म्हणून उपस्थित राहून त्यांनी नवी सैद्धांतिक मांडणी केली आहे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन त्यांनी स्वच्छ ऊर्जा आणि कृत्रिम प्रज्ञा या क्षेत्रातील वाढत्या अपेक्षित सहकार्यावर विशेष चर्चा केली आहे. त्यांनी आपल्या भाषणात भारताची दक्षिण विकास चळवळ महत्त्वाची असल्याचे सांगितले आणि पूर्व-पश्चिमेपेक्षा दक्षिणेला अधिक महत्त्व येणार आहे व ‘भारत’ हा दक्षिणेकडील देशांचे नेतृत्व करत आहे. रायसीना परिषदेतील त्यांचे भाषण हे प्रांत दर्शी आणि नवा सिद्धांत मांडणारे ठरले. त्यांनी आपल्या भाषणातून बदलत्या राजकीय शक्ती संतुलनावर आणि 21 व्या शतकातील वास्तवाचे सूत्र प्रतिनिधीत्व करताना आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता प्रतिपादन केली. त्यांच्या सिद्धांतातील तीन प्रमुख सूत्रे अशी होती की जागतिक दक्षिणेचा उदय होत आहे आणि पाश्चिमात्य वर्चस्व असलेल्या जगाचा प्रभाव संपला आहे. पुढील जागतिक व्यवस्थेमध्ये दक्षिण अधिक प्रभावी ठरत आहे. दुसरे म्हणजे भारताची मध्यवर्ती भूमिका यावर त्यांनी भर दिला. त्यांच्या मते नवीन जागतिक व्यवस्थेत भारत निर्णायक घटक ठरणार आहे. लोकसंख्या, आर्थिक प्रगती आणि धोरणात्मक राजनीती यामुळे भारताचे प्रभुत्व वाढत राहणार आहे. जागतिक प्रशासनात सुधारणा करण्याची गरज त्यांनी प्राधान्याने मांडली. जागतिक संस्था विशेषत: संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत अद्ययावत बदल केले पाहिजेत आणि त्यांनी भारताच्या कायमस्वरूपी सदस्यतेचा पुरस्कार केला. शक्तीचा त्रिकोण या कल्पनेत भारताचे प्रभुत्व दक्षिण विकास चळवळीत सातत्याने वाढत राहणार आहे, याचे संकेत दिले.
रायसीना परिषदेत त्यांनी असा कळीचा मुद्दा मांडला आहे की या जगात भारताचे प्रभुत्व एक निर्णायक शक्ती म्हणून उदयास येत आहे आणि भारत जगाला सर्व प्रकारच्या संकटातून मुक्त करू शकेल. उभय स्थलांतर आणि गतिशीलता तसेच प्रदूषण नियंत्रण कचरा व्यवस्थापन व अक्षय ऊर्जा विकास यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. शाश्वत वनीकरण आणि कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती प्रकल्प हे वर्तुळाकार अर्थव्यवस्थेत नवा चमत्कार घडवू शकतील. उदयोन्मुख तंत्रज्ञानाने या क्षेत्रात संशोधनाच्या नव्या दिशा उजळल्या आहेत. हवामान बदल आणि ग्रीन हायड्रोजन सौर आणि स्मार्ट ऊर्जा, जैव ऊर्जा या क्षेत्रातील सहकार्य हे शाश्वत विकासाकडे घेऊन जाणारे ठरेल. दोन्ही देशातील द्विपक्षीय व्यापार लक्षणीयपणे वाढविण्याचा आणि उच्च तंत्रज्ञान क्षेत्रात गुंतवणुकीचा विचार हा स्वागतार्ह आहे. विशेषत: संगणक संशोधनात काँटम कॉम्प्युटिंगमुळे दोन्ही देश नवी क्रांती घडवून आणू शकतील.
धोरणात्मक भागीदारीचे नवे पर्व
फिनलंडच्या सहकार्याने भारताने चिनाब नदीवर जगातील सर्वात मोठा पूल बांधला आहे तसेच बांबूच्या आधारे जैव ऊर्जा निर्माण करण्याचा मोठा प्रकल्पही फिनलंडच्या मदतीने कार्यान्वित करण्यात आला आहे. आता स्टब यांच्या भारत भेटीमुळे धोरणात्मक भागीदारीची अनेक नवी क्षेत्रे उदयास आली आहेत.
अलेक्झांडर स्टब यांच्या भारत भेटीमुळे उभय देशांमध्ये धोरणात्मक भागीदारीचे नवे पर्व उदयास आले आहे. विशेषत: त्यांनी उभय राष्ट्रातील भागीदारीला एका नव्या उंचीवर पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. सहकार्याची क्षितिजे वाढविणे आणि त्यातून उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि हरित ऊर्जा यासारख्या क्षेत्रांमध्ये परस्पर सहकार्याचा सेतू मजबूत करणे यावर सामंजस्य करारातून भर देण्यात आला आहे.
या सामंजस्य कराराच्या आदानप्रदानातून उभय राष्ट्रांनी डिजिटल संवाद प्रणाली आणि कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित केले आहे. परस्पर संवादातून 6जी संदर्भात कृत्रिम प्रज्ञा आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान या क्षेत्रात परस्पर हितवर्धक तंत्रज्ञान सहकार्यावर नवा प्रकाश टाकण्यात आला. अध्यक्ष स्टब महोदय यांनी भारताच्या 5जी क्रांतीमध्ये नोकिया या फिनलंडमधील कंपनीच्या महत्त्वपूर्ण भूमिकेची पावती नोंदविली. मागील दहा वर्षांपूर्वी नोकिया हा मोबाईल घराघरापर्यंत पोहोचला आणि त्याने हजारो भारतीयांच्या संवाद गरजा पूर्ण केल्या होत्या. आता 6जी युगामध्ये सुद्धा फिनलंड भारताच्या भ्रमणध्वनी क्षेत्रात कोणती क्रांती घडवून आणणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्राथमिक शाळेपासून उच्च माध्यमिक शाळेपर्यंत विज्ञान आणि गणित शिक्षणात फिनलंडचे मॉडेल भारतात अनेक राज्यातून कृतीमध्ये आणले जात आहे. शिक्षण क्षेत्रात गुणवत्ता सुधारण्यासाठी फिनलंडचे सहकार्य महत्त्वाचे ठरणार आहे. काही घटक राज्यातून याबाबतीत नव्या प्रयोगांना अलीकडेच प्रारंभ झाला आहे. उभय देशातील सहकार्य हे शिक्षण, तंत्रज्ञान विकास, संरक्षण, अंतराळ संशोधन तसेच सांख्यिकी आदान प्रदान या क्षेत्रात नवे दमदार पाऊल टाकणारे आहे. सेमीकंडक्टर आणि काँटम कॉम्प्युटिंग या क्षेत्रात सुद्धा नवे सहकार्य पर्व उदयास येत आहे.
सांस्कृतिक देवाणघेवाण व पर्यटन
भारत आणि फिनलंडमध्ये सांस्कृतिक देवाणघेवाण आणि पर्यटन वाढीला चालना देण्यासाठी चांगले प्रयत्न करण्यात येत आहेत. लोक संपर्क हा या भावी प्रयत्नांचा मुख्य आत्मा असणार आहे. सांस्कृतिक देवाणघेवाण वृद्धिंगत करण्यासाठी राष्ट्रपती अलेक्झांडर स्टब यांनी त्यांच्या भेटीदरम्यान पूर्वतयारी करण्यासाठी एक भारतीय चित्रपटही पाहिल्याचे विशेषत्वाने नमूद केले होते. त्यांच्यासमवेत आलेल्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने नवी दिल्ली व मुंबई येथे भारतीय उद्योजकांशी चर्चा करून अनेक क्षेत्रात सहकार्यासाठी पूरक संवाद साधला आहे. त्यामुळे भारतीय उद्योजक तेथे गुंतवणूक करू शकतील आणि तेथील उद्योजक भारतामध्ये रोजगार निर्मितीसाठी सहकार्य करतील. चित्रपट तसेच मनोरंजन क्षेत्रातसुद्धा दोन्ही देशातील सहकार्याचा सेतू हा अधिक भक्कम करण्यात येणार आहे. भारतीय नागरिकांमध्ये फिनलंडमधील पर्यटन स्थळांचे आकर्षण वाढत आहे आणि त्यामुळे उभय देशातील सांस्कृतिक संबंध अधिक मजबूत होणार आहेत.
समारोप
या सर्व चर्चेवरून हे स्पष्ट होते की अलेक्झांडर स्टब यांच्या भारत दौऱ्यामुळे द्विपक्षीय संबंध अधिक घट्ट झाले आहेत आणि त्यातून माहिती तंत्रज्ञान व्यापार तसेच नवोन्मेष संशोधनावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. भविष्यकाळात उभय देशातील संबंध अधिक उंचीवर नेण्यासाठी नवा प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. सामाजिक, आर्थिक तसेच सांस्कृतिक संबंधांना विविध क्षेत्रात गती देण्यासाठी करण्यात आलेले प्रयत्न हे खरोखरच स्पृहणीय आहेत. मनुष्यबळ विकास तसेच पर्यावरण संवर्धन सांख्यिकी क्षेत्रातील परस्पर आदान प्रदान यावर दोन्ही देशांनी भर दिला आहे. युक्रेन असो की पश्चिम आशियातील संघर्ष, जगातील कुठलाही प्रश्न संवादाने सोडविता येतो, अशी दोन्ही देशांची भावना आहे. दहशतवाद विरोधात 0 सहानुभूती एकसमान धोरण आहे. भारत फिनलंड दोन्ही देशात एक नवे सुवर्णयुग आणि नवे सोनेरी पर्व उदयास येत आहे.
- प्रा. डॉ. वि. ल. धारूरकर