कोकण-पश्चिम महाराष्ट्राच्या दळणवळणाला नवी दिशा
सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांना थेट जोडणाऱ्या आणि गेल्या चार दशकांहून अधिक काळापासून प्रलंबित असलेल्या महत्वाकांक्षी घोटगे-सोनवडे घाटमार्गाच्या उभारणीतील अंतिम अडसर आता दूर झाला आहे. या बहुप्रतीक्षित प्रकल्पाला केंद्रीय पर्यावरण समितीची अंतिम मंजुरी मिळाल्याने घाटमार्गाच्या प्रत्यक्ष उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील दळणवळण, व्यापार, पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे. हा घाटमार्ग दोन जिल्ह्यांना जोडणारा रस्ता न राहता, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील विकासाचा नवा कॉरिडॉर ठरणार आहे. आता फक्त प्रत्यक्ष कामाच्या शुभारंभाची प्रतीक्षा आहे.
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकल्पासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. त्यानंतर नव्या अलायनमेंटला डिसेंबर 2025 मध्ये आयआयटी मुंबईच्या स्थापत्य अभियांत्रिकी तज्ञांची मंजुरी मिळाल्यानंतर पर्यावरणीय प्रक्रियेलाही गती मिळाली. त्यानंतर आता केंद्रीय स्तरावर अंतिम मंजुरी मिळाल्याने प्रकल्पाच्या पुढील कामांना वेग येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. घोटगे-सोनवडे घाटमार्ग हा केवळ नवीन रस्ता नसून सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांना अधिक जवळ आणणारा महत्त्वाचा दळण-वळण प्रकल्प मानला जातो. या मार्गाचा प्रस्ताव पश्चिम घाट विकासाच्या योजनांमध्ये 1981-82 पासून विचाराधीन होता. पुढे महाराष्ट्र शासनाच्या स्तरावर 1996 मध्ये या प्रकल्पासाठी प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. मात्र, वनक्षेत्र, पर्यावरणीय परवानगी, मार्गाची तांत्रिक रचना, भूसंपादन आणि अन्य प्रशासकीय प्रक्रियांमुळे हा प्रकल्प अनेक वर्षे रखडला. त्यामुळे स्थानिक नागरिकांकडून सातत्याने या घाटमार्गाच्या कामाला गती देण्याची मागणी होत होती.
2017 मध्ये झालेल्या पर्यावरणीय जनसुनावणीमध्येही स्थानिक नागरिकांनी घाटमार्गाचे काम लवकर सुरू करण्याची मागणी केली होती. या प्रकल्पामुळे कुडाळ आणि कोल्हापूर यांच्यातील संपर्क अधिक सुलभ होईल, अशी भावना त्यावेळीही व्यक्त करण्यात आली होती. प्रकल्पाच्या जुन्या आराखड्यात बदल करून नव्या अलायनमेंटचा प्रस्ताव पुढे आला. डिसेंबर 2025 मध्ये आयआयटी मुंबईच्या स्थापत्य अभियांत्रिकी तज्ञांनी या नव्या अलायनमेंटला मंजुरी दिली. त्यानंतर पर्यावरणीय प्रक्रियेला पुढे नेण्यात आले.
मार्च 2026 मध्येही या नव्या अलायनमेंटला केंद्रीय पर्यावरण समितीची मंजुरी मिळाली होती. मात्र, मार्गाच्या रचनेत बदल झाल्यामुळे संबंधित गावांमध्ये नव्याने जनसुनावणीची प्रक्रिया आणि भूसंपादनासारख्या बाबी पुढे येणार असल्याचे त्यावेळी स्पष्ट करण्यात आले. नंतर आता ऑगस्ट 2026 मध्ये अंतिम पर्यावरणीय मंजुरी मिळाल्याने प्रकल्पाच्या अंमलबजावणीतील महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे.
घोटगे-सोनवडे घाटमार्गाची लांबी सुमारे 13 किमी असणार असून या मार्गामुळे कुडाळ ते कोल्हापूर हे अंतर सुमारे 40 किलोमीटरने कमी होण्याची अपेक्षा आहे. तसेच सध्या कुडाळ, कणकवलीसह सिंधुदुर्गातील अनेक भागांमधून कोल्हापूरकडे जाण्यासाठी कऊळ, फोंडा किंवा आंबोली घाटाचा वापर करावा लागतो. त्यामुळे प्रवासाचे अंतर आणि वेळ वाढतो. नवीन घाटमार्ग उपलब्ध झाल्यानंतर कोकणातून कोल्हापूरकडे जाणाऱ्या वाहनांना अधिक थेट मार्ग उपलब्ध होणार आहे. सुमारे 75 ते 80 किमी मार्गामुळे प्रवासाचा कालावधी दीड ते दोन तासांपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. परिणामी इंधनाचा खर्च, वाहनांचा प्रवासवेळ आणि वाहतूक व्यवस्थेवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे. घाटमार्गाचा सर्वाधिक फायदा स्थानिक शेतकरी आणि व्यापाऱ्यांना होणार आहे. सिंधुदुर्गातील हापूस आंबा, काजू, नारळ, सुपारी, भाजीपाला तसेच मत्स्य उत्पादन पश्चिम महाराष्ट्रातील बाजारपेठांमध्ये जलद पोहोचविणे शक्य होणार आहे.
कोल्हापूर ही पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाची व्यापारी बाजारपेठ आहे. कोल्हापूरमार्गे पुढे सांगली, सातारा, पुणे तसेच कर्नाटकातील बाजारपेठांशी संपर्क वाढविण्याची संधी निर्माण होऊ शकते. वाहतूक अंतर कमी झाल्यास मालवाहतुकीचा खर्चही कमी होणार आहे. त्यामुळे उत्पादकांना अधिक बाजारपेठा उपलब्ध होऊन स्थानिक कृषी अर्थव्यवस्थेला बळ मिळणार आहे. सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्यांना निसर्ग, ऐतिहासिक वारसा आणि धार्मिक पर्यटनाची मोठी पार्श्वभूमी आहे. घोटगे-सोनवडे घाटमार्ग सुरू झाल्यास दोन्ही जिल्ह्यांतील पर्यटनस्थळांना जोडणाऱ्या पर्यटन मार्गांना नवे पर्याय उपलब्ध होतील. सोनवडे परिसरातील निसर्गरम्य ठिकाणे, धबधबे आणि ऐतिहासिक वारसा यामुळे या भागात पर्यटनाच्यादृष्टीने मोठी क्षमता आहे. दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी, भुदरगड आणि परिसरातील पर्यटनस्थळांशी कोकणचा थेट संपर्क वाढणार आहे.
पर्यावरणीय मंजुरी मिळाल्याने प्रकल्पाचा महत्त्वाचा अडसर दूर झाला असला, तरी प्रत्यक्ष बांधकाम सुरू होण्यापूर्वी काही प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण कराव्या लागणार आहेत. यात भूसंपादन, आवश्यक परवानगी, तांत्रिक प्रक्रिया आणि निविदा प्रक्रिया यांचा समावेश आहे. मार्गासाठी ज्यांच्या जमिनी जाणार आहेत, त्यांना योग्य आणि पारदर्शक मोबदला मिळावा, अशी स्थानिकांची अपेक्षा आहे. घाटमार्गाच्या प्रारंभिक कामांसाठी 13 कोटी ऊपयांचा निधी मंजूर झाला आहे. मात्र, प्रत्यक्ष कामाला सुरुवात कधी होणार आहे, हा प्रश्न आहे.
घोटगे-सोनवडे घाटमार्ग पूर्ण झाल्यास तो केवळ कुडाळ-कोल्हापूरचे अंतर कमी करणारा रस्ता ठरणार नाही, तर कोकणच्या कृषी, पर्यटन, मत्स्य, व्यापार आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला पश्चिम महाराष्ट्राच्या बाजारपेठांशी अधिक वेगाने जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. त्यामुळे चार दशकांच्या प्रतीक्षेनंतर मिळालेल्या पर्यावरणीय मंजुरीनंतर आता नागरिकांचे लक्ष प्रत्यक्ष कामाच्या शुभारंभाकडे लागले आहे.
संदीप गावडे