हलशी भुवराह यात्रोत्सवात यंदा नवा रथ
55 लाख खर्चून रथाची आकर्षक बांधणी : यात्रोत्सव येत्या गुरुवारपासून चार दिवस
वार्ताहर/नंदगड
हलशी कदंबकालीन दुसरी राजधानी म्हणून ओळखली जात होती. येथे वर्षातून विविध सण समारंभ उत्साहाने साजरे करतात. दरवर्षी होणारी श्री भुवराह नृसिंह यात्रा येथील मोठा उत्सव आहे. यावर्षी या यात्रोत्सवात नव्याने बांधलेला रथ ओढण्यात येणार आहे. 55 लाख रु. खर्चून देणगीच्या माध्यमातून हा रथ बांधण्यात आला आहे. हलशी येथील श्री नृसिंह भुवराह मंदिर आठ शतकापासून कोणतीही पडझड न होता. भक्कमपणे उभे आहे. देवालयात प्रवेश करताच एक शिलालेख दृष्टीस पडतो. तो इतिहासातील हलशी शिलालेख म्हणून ओळखला जातो. याच शिलालेखानुसार 12 व्या शतकातील कदंब राजा परमाधी देव यांच्या विनंतीनुसार एक मठयोगी नावाच्या सत्पुरुषाने हे देवालय घेतले. व तेथे नृसिंह वराह देवाची स्थापना केली. मदिराला आज दक्षिण, उत्तर असे दोन दरवाजे आहेत. उत्सवाच्या वेळी मूर्तीची रथ, पालखी व इतर वाहनातून सवाद्य मिरवणूक काढली जाते. रथोत्सव व यात्रोत्सवाला मोठ्या संख्येने भाविक उपस्थित असतात.
यात्रोत्सव
हलशी येथील सुप्रसिद्ध नृसिंह भुवराह यात्रोत्सव गुरुवार दि. 17 पासून चार दिवस होत आहे. दि. 17 रोजी नवीन रथाची पूजा व रथोत्सव, दि. 18 व शनिवार दि. 19 रोजी यात्रोत्सव, रविवार दि. 20 रोजी, दुपारी 4 वा. कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे.