भारत-क्रोएशिया सांस्कृतिक संबंधांचा नवा अध्याय!
क्रोएशिया आणि भारत या उभय देशांमध्ये प्राचीन सांस्कृतिक संबंधांना आता नवा राजकीय उजाळा मिळाला आहे. कारण 1990 या दशकात स्थापन झालेल्या या स्वतंत्र प्रजासत्ताक देशाला भेट देणारे नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत. उभय देशांमधील सामंजस्य करार आणि अर्थपूर्ण देवाण-घेवाण यामुळे या भेटीला विशेष महत्त्व आहे. तसे पाहिले तर क्रोएशिया या देशाचा इतिहास प्राचीन मध्ययुगीन काळापासून संपन्न आणि समृद्ध आहे. या देशातील अभ्यासकांनी संस्कृत भाषेचा अभ्यास करून मोलाची भर टाकली आहे तसेच वर्तमान काळातसुद्धा या देशातील विद्यापीठातून प्राच्य विद्येचे संशोधन मोठ्या प्रमाणात केले जात आहे.
आता आधुनिक काळात विज्ञान, तंत्रज्ञान, कृषी उद्योग, संरक्षण यासारख्या अनेक महत्त्वाच्या क्षेत्रात दोन्ही राष्ट्रे सहकार्यासाठी वचनबद्ध झाली आहेत. या दोन्ही राष्ट्रांच्या परस्परपूरक मैत्रीचा आणि आर्थिक सहकार्याचा नवा सेतू पंतप्रधान मोदी यांच्या क्रोएशिया भेटीमुळे बांधला गेला आहे.
वैशिष्ट्यापूर्ण असे स्थान
क्रोएशियन प्रजासत्ताकाचे युरोपच्या भू-राजनीतिक व्यवस्थेत महत्त्वपूर्ण व वैशिष्ट्यापूर्ण असे स्थान आहे. या देशाभोवती असलेल्या अन्य युरोपियन देशांची रचना पाहिल्यास असे दिसते की, युरोपमधील अॅड्रीयाटिक समुद्राच्या उंबरठ्यावर हा देश उभा आहे. त्याच्या वायव्येस स्लोवाकिया, ईशान्येस हंगेरी, पूर्वेस सर्बिया, आग्नेय दिशेला बोसनिया व हरजगोनिया तसेच मोंटे निग्रो हे देश आहेत व पश्चिमेस इटलीच्या सीमासुद्धा समाविष्ट आहेत. या देशाची राजधानी तेथील सर्वात मोठे शहर जगरेब आहे. या प्रदेशात सुमारे 20 जिह्यांचा समावेश आहे. नागरी वस्ती व घनदाट लोकसंख्येमुळे या प्रदेशाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
प्राचीन काळात सहाव्या शतकापासून या देशाचा सलग इतिहास उपलब्ध होतो. तेथे प्रारंभी रोमन संस्कृतीचा ठसा पाहावयास मिळतो. त्यानंतर मध्ययुगात अनेक उलथापालथी होऊन या देशाने आपले अस्तित्व कायम टिकविले आहे व वाढविले आहे. क्रोएशिया हा शब्द क्रोयटस लॅटिन शब्दापासून बनला आहे. क्रोएशिया शब्दाचा अर्थ रक्षक किंवा संरक्षक असा होतो. या नावाप्रमाणे या देशाचा इतिहाससुद्धा तेवढाच अर्थपूर्ण व सुसंगत असा आहे.
या देशाची लोकसंख्या 3.87 दशलक्ष असून, पर्यटनदृष्ट्या अत्यंत विकसित अन् संपन्न असा हा देश आहे. भारतीय लोकसुद्धा या देशास पर्यटनासाठी मोठ्या संख्येने हजेरी लावतात. शेती, उद्योग, शिक्षण आणि प्रगत तंत्रज्ञान या क्षेत्रांतील प्रगतीमुळे या देशाचे दरडोई उत्पन्न अधिक आहे तसेच मानवनिर्देशांकही उच्च आहे. त्यामुळे या देशाशी व्यापार उदीम व शैक्षणिक आदान-प्रदानास मोठी संधी आहे, हे लक्षात घेऊन पंतप्रधान मोदी यांनी उच्चस्तरीय शिष्टमंडळासह तेथील नेत्यांची भेट घेऊन या देशाच्या आर्थिक संपन्नतेचा आणि समृद्धतेचा भारताच्या मैत्रीमुळे कसा लाभ होऊ शकेल, याची गणिते उत्तम प्रकारे मांडली आहेत.
क्रोएशिया भेटीचे फलित
क्रोएशियाला भेट देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान आहेत. त्यांच्या या भेटीमुळे सर्वात मोठी फलश्रुती काय असेल, तर उभय देशातील सांस्कृतिक संबंध पुनश्च्च भक्कम झाले आहेत, ही होय. क्रोएशियाचे पंतप्रधान अंधरेज प्लेनकोविक यांनी काही शतकापूर्वी वेझदिन यांनी संपादन केलेल्या संस्कृत व्याकरणाची पुर्नमुद्रित प्रत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुपूर्द केली, हा एक अनमोल ठेवा आहे. दोन्ही देशातील नेत्यांनी आर्थिक सहकार्य व सांस्कृतिक संबंध वाढविण्यावर सर्वअंगाने चर्चा केली व विविध क्षेत्रांतील 4 सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आली. भारत व क्रोएशिया यांच्यातील राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक संबंधांमधील एक महत्त्वाचा सुवर्णक्षण त्यामुळे नोंदविण्यात आला आहे. द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यासाठी ही भेट फलदायी ठरली आहे. जगरेब या शहराला पंतप्रधानांनी पहिल्यांदा भेट दिली आणि क्रोएशियन पंतप्रधानांनी भेट दिलेले दुर्मिळ संस्कृत व्याकरण हे एक प्रतिकात्मक असे महत्त्वाचे पुस्तक आहे. कारण त्यामुळे दोन्ही देशातील सांस्कृतिक संबंधांची शतकानुशतके जुन्या परंपरांचे आदान-प्रदानाचे प्रतीक म्हणून त्याकडे पाहिले जात आहे. वेझदिन या लॅटिन पंडिताने क्रोएशियामध्ये लॅटिन भाषेत लिहिलेले हे पहिले छापिल संस्कृत व्याकरण आहे. ते 1790 यावर्षी लिहिले गेले. क्रोएशियन विद्वान आणि मिशनरी फिलिप वेझदिन यांनी भारताला भेट देऊन संस्कृत भाषेचा सखोल अभ्यास केला व हे व्याकरण प्रकाशित केले होते. क्रोएशिया आणि भारत यांच्यातील सांस्कृतिक संबंधांचा एक सुवर्ण धागा म्हणून या व्याकरणाकडे पाहिले जात आहे. क्रोएशियन राजदूत सिनिसा ग्रगिक यांनी लिहिलेले ‘क्रोएशिया अँड इंडिया : बायलॅटरल नेविगेटर फोर डिप्लोमॅट्स अँड बिझनेस’ हा ग्रंथ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना क्रोएशियाच्या पंतप्रधानांनी भेट दिला. या ग्रंथामध्ये दोन्ही देशाच्या संबंधांबाबत, भविष्यकालीन संधींबाबत अभ्यास करण्यात आला आहे. किंबहुना हा ग्रंथ म्हणजे दोन्ही देशातील मैत्रीचा रोडमॅप म्हटला पाहिजे.
महत्त्वाचे बिंदू कोणते?
उभय देशांमधील मैत्री संबंध पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी झालेल्या सामंजस्य करारांचे आगळे-वेगळे महत्त्व आहे. विशेषत: या करारानुसार दोन्ही नेत्यांनी व्यापार, गुंतवणूक तसेच पर्यटन आणि आर्थिक वाणिज्य सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत.उभय देशांतील करारामुळे कृषी, सांस्कृतिक आदान-प्रदान, विज्ञान-तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, क्रिटिकल इंजिनिअरिंग यांसारख्या विविध क्षेत्रांत करारांवर सह्या करण्यात आल्या, त्यामुळे हा दौरा अनेक अर्थाने फलदायी आणि रचनात्मक सहकार्याचे एक नवे पर्व घेऊन आला आहे. पंतप्रधान प्लेनकोविक यांनी म्हटल्याप्रमाणे भारताशी झालेल्या करारामुळे उभय देशातील व्यापार-उदीम अधिक वाढणार आहे. एक भक्कम व्यापारी भागीदार म्हणून क्रोएशियाने भारताला मान्यता दिली आहे तसेच भारत हा क्रोएशियासाठी एक महत्त्वाचा आशियाई व्यापारी भागीदार म्हणून उदयास आला आहे. गेल्या वर्षी उभय राष्ट्रातील आर्थिक व व्यापारी देवाण-घेवाण 242 दशलक्ष अमेरिकन डॉलर एवढी पोहोचली होती, तर मागील तीन महिन्यांत हा व्यापार दहा टक्क्यांनी वाढला आहे, हे सुद्धा विशेषत्वाने नमूद केले पाहिजे. उभय राष्ट्रांमधील आर्थिक संबंधांचे मूळ सांस्कृतिक मैत्रीमध्ये आहे. क्रोएशियाला भेट देणाऱ्या भारतीय पर्यटकांची संख्या सातत्याने वाढत आहे. विशेषत: मागील काही वर्षात भारतीय पर्यटक मोठ्या संख्येने क्रोएशियाकडे वळत आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या भेटीमुळे झालेल्या सकारात्मक चर्चेनुसार संबंधांची नवी क्षेत्रे उदयास आली आहेत आणि विशेषत: इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी तसेच औषध, उद्योग, आयुर्वेद आणि सागरी वाहतूक तसेच अंतराळ संशोधन यासारख्या क्षेत्रांत सहकार्य मजबूत करण्यासाठी विशेष प्रयत्नांची दिशा ठरविण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी यांचा पहिला दौरा असला तरी हा दौरा अनेकदृष्टीने निर्णायक व नवे वळण देणारा ठरला आहे. जगरेब या महानगरीत मोदी यांचे विशेष स्वागत झाले, तसेच त्यांच्या प्रतिनिधी मंडळाने तेथील विविध स्तरातील उद्योजक, शिक्षण तज्ञ आणि वैज्ञानिक इत्यादींबरोबर चर्चाही केली. प्रतिनिधी मंडळ स्तरावरील चर्चा ही पुढील विकासाची दिशा ठरविणारी ठरली आहे. ‘एक्स’ वर केलेल्या एका पोस्टमध्ये क्रोएशियन नेत्यांनी असे म्हटले की, आम्ही भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जगरेबमध्ये उस्फूर्त स्वागत केले. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या व चौथी अर्थसत्ता असलेल्या देशाचे पंतप्रधान हे क्रोएशियाला भेट देतात, याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. भारत-क्रोएशियाचा एक महत्त्वाचा आर्थिक व व्यापारी भागीदार बनला आहे.
भू-राजनैतिक महत्त्व
भू-राजकीय दृष्टीनेसुद्धा हा दौरा अशा एका महत्त्वाच्या क्षणी होत आहे की, संपूर्ण युरोपियन युनियनचे सर्व सदस्य देश भारताशी सहकार्य करण्यासाठी उत्सुक आहेत. त्यामुळे हा दौरा उभय देशांमध्ये अनेक क्षेत्रांत विशेषत: आर्थिक, सांस्कृतिक आणि तंत्रज्ञान विषयक क्षेत्रात एक नवा मैलाचा दगड ठरणार आहे व द्विपक्षीय सहकार्य मजबूत करण्यासाठी अनुरूप, अनुकूल अशी परिस्थिती उदयास येत आहे. दहशतवाद हा दोन्ही देशांमध्ये समान महत्त्वाचा मुद्दा म्हणून चर्चिला गेला. पंतप्रधान मोदी म्हणाले की, दहशतवाद हा मानवतेचा शत्रू आहे. त्यामुळे दहशतवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सर्व लोकशाही राष्ट्रांनी एकत्र आले पाहिजे.
- डॉ. वि. ल. धारूरकर