भारत-अफगाणिस्तान संबंधाचा नवा अध्याय
गेल्या आठवड्याच्या आरंभी दोन महत्त्वपूर्ण घटना घडल्या आहेत. ज्या आंतरराष्ट्रीय राजकारणात कोणीच कोणाचा कायमस्वरुपी मित्र वा शत्रु नसतो हे तत्व अधोरेखीत करणाऱ्या आहेत. दुसऱ्या बाजुने हा घटनाक्रम त्यांच्या विशिष्ट वेळेतून योगायोगाचे दर्शन न घडवता अफगाणिस्तान भारत आणि पाकिस्तान या शेजारी देशांतील परस्पर संबंधांच्या बदलत्या दिशा दर्शवतो. अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री अमीर खान मुत्ताकी यांचे मागच्या गुरूवारी भारतात आगमन झाले. अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारला पाठिंबा देणारा एकमेव देश रशियाचा दौरा आटपून ते भारतात आले हे विशेष महत्त्वाचे आहे.
मुत्ताकी आठ दिवसांच्या दीर्घ भारत दौऱ्यावर आले होते आणि परवा 16 तारखेस ते मायदेशी परतले. भारत दौऱ्यात त्यांनी भारतीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्यासोबत दोन्ही देशातील व्यापार, उद्योग, दळणवळण, विमानसेवा, आर्थिक मदत अशा अनेक मुद्यांवर सकारात्मक चर्चा केली. भारताकडून मुत्ताकींना अफगाणिस्तानात भारताचा अधिकृत दुतावास पुन्हा सुरू करण्याची संमतीही मिळवता आली. राजनैतिक पातळीवरील देवाण-घेवाण त्याचप्रमाणे अफगाणिस्तानच्या समृद्ध खनिज क्षेत्रात भारतास गुतंवणूकीची संधी या महत्त्वपूर्ण मुद्यांवर उभयतात एकवाक्यता दिसून आली. या दरम्यान शुक्रवारी मुत्ताकी यांनी एक पत्रकार परिषद बोलावली. त्यात महिला पत्रकारांचा अंतर्भाव नव्हता. अफगाणिस्तानातील तालिबान सरकार त्याच्या मध्ययुगीन कट्टरवादी स्त्राr विषयक दृष्टीकोनामुळे टीकेचा विषय ठरले आहे. अफगाण स्त्रियांवरील जाचक धर्मवादी बंधने आणि त्यांचे उल्लंघन केल्यास देण्यात येणाऱ्या अमानवी शिक्षा हा तालिबानला आंतरराष्ट्रीय मान्यतेपासून वंचित ठेवणारा एक कळीचा मुद्दा बनला आहे. त्याचे प्रतिबिंब भारतातील पत्रकार परिषदेत दिसताच विरोधक व भारतीय प्रसारमाध्यमातून या मानसिकतेवर टीकेची झोड उठविण्यात आली. यामुळे भारत म्हणजे अफगाणिस्तान नव्हे, येथे स्त्रियांचा सन्मान राखला जातो याचे भान मुत्ताकी आणि तालिबानी राजवटीस आले. यातून पुढील 48 तासातच रविवारी दुपारी पत्रकार परिषद बोलावण्यात आली. ज्यात महिला पत्रकार मोठ्या संख्येने होत्या आणि त्यातील बऱ्याच मुत्ताकींच्या थेट समोर पहिल्या रांगेत बसल्या होत्या. या परिषदेत मुत्ताकींनी आधीच्या बैठकीत महिलांना वगळणे ही तांत्रिक समस्या होती आण हेतुपुरसर कृत्य नव्हते, असे स्पष्टीकरण दिले. पत्रकार परिषदेतील महिला पत्रकारांनी मुत्ताकींना अफगाण मुली आणि महिलांच्या अधिकारांबद्दल तिक्ष्ण व खुले प्रश्न विचारले. निर्बंधाकडे लक्ष वेधले. त्यावर मुत्ताकींनी न पटणारे स्पष्टीकरण दिल्याने पुन्हा पुराव्यानीशी प्रश्नांची सरबत्ती झाली आणि मुत्ताकींच्या दाव्यावर शंका उपस्थित करण्यात आल्या. एकंदरीत अफगाण परराष्ट्रमंत्र्याची उत्तरे समाधानकारक नव्हती. तथापि, त्यांना स्त्राr-पुरूष समतेच्या मुद्यावर उत्तरे द्यावी लागली हीच तालिबानसाठी सुधारणा व भविष्याच्या दृष्टिने समाधानकारक बाब म्हटली पाहिजे.
आरंभी उल्लेख केलेली दुसरी महत्त्वपूर्ण घटना अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा भारत दौरा सुरू असतानाच घडली. गेल्या शनिवारी रात्री पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर तीव्र चकमकी सुरू झाल्या. पाकिस्तानने एक दिवस आधी राजधानी काबूलसह अफगाणिस्तानच्या भूभागावर हवाई हल्ले केले होते. त्याचे प्रत्युत्तर अफगाण तालिबानने पाकिस्तानच्या वायव्य सीमेवरील पाक लष्करी चौक्यांवर जबर गोळीबार करुन दिले. त्यानंतर उभय देशातील लष्करी संघर्ष काही काळ जारी राहिला. पुढे पाकिस्तानने 200 तालिबानी दहशतवादी मारल्याचा दावा केला तर अफगाणिस्तानने 58 पाकिस्तानी सैनिक मारल्याचे आणि केवळ 8 तालिबानी सैनिक ठार झाल्याचे स्पष्ट केले. अलीकडच्या काळात अफगाणिस्तान-पाकिस्तान संबंध बिघडत चालले आहेत. सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की 1994 साली तालिबानची स्थापना होण्याच्या आधीपासून स्थापना प्रक्रियेत पाकिस्तानचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. तालिबानचा संस्थापक मुल्ला उमरला अफगाणिस्तानमधील नॉर्दन अलायन्स सरकार आणि त्याला पाठिंबा देणाऱ्या सोव्हिएत रशियाच्या फौजा यांच्याविरुद्ध लढ्यासाठी ‘मुजाहिदीन’ प्रशिक्षण शिबिरात पाकिस्ताननेच तयार केले होते. 1996 मध्ये जेंव्हा अफगाणिस्तानातील यादवीवर वर्चस्व मिळवून तालिबानने देशाची सत्ता हाती घेतली तेंव्हा तालिबानी सत्तेस मान्यता देणारा पहिला देश पाकिस्तानच होता. दरम्यानच्या काळात तालिबान्यांना लढण्यासाठी पाकिस्तानने शस्त्रs, गुप्तचर माहिती, लष्करी आणि राजकीय पाठिंबाही पुरवला होता. 9/11 चा अमेरिकेवरील दहशतवादी हल्ला दहशतवादी संघटना अल कायदाचे तालिबानशी घनिष्ट संबंध आणि अफगाणिस्तानातील अल कायदाचे तळ या परस्पर संबंधांमुळे 2001 साली अमेरिकेने अफगाणी तालिबानी राजवट संपुष्टात आणली. अमेरिकेच्या सहाय्याने तेथे हमीद करझाई यांच्या नेतृत्वाखाली नवे लोकशाही सरकार स्थापन झाले. महत्त्वाची बाब ही की, आधीचे तालिबानी सरकार पाकिस्तानशी संबंधीत असल्याने भारताचा त्या राजवटीस विरोध होता. मात्र, करझाईंच्या नव्या लोकशाहीवादी राजवटीचे भारताने स्वागत केले होते. करझाई आणि त्यानंतरचे राष्ट्र प्रमुख घानी यांच्या काळात भारत-अफगाणिस्तान संबंध संमिश्र स्वरुपांचे राहिले.
2021 साली लोकशाहीवादी सरकार उलथवून तालिबानने अफगाणिस्तानवर पुन्हा सत्ता प्रस्थापित केली. आपल्याबद्दल तालिबानने सदैव उपकृत राहिले पाहिजे आणि सहकार्य केले पाहिजे, अशी पाकिस्तानची भावना राहिली आहे. परंतु तालिबानला पाकिस्तानचे संधीसाधू धोरण आणि त्याने अफगाणिस्तानातील गतकालीन स्थित्यंतरात घेतलेली अमेरिका धार्जिणी भूमिका चांगलीच परिचित आहे. अमेरिकेच्या मार्गदर्शनाखाली आणि अमेरिकन फौजा अफगाणिस्तानात तैनात असताना जे लोकशाहीवादी सरकार तेथे कार्यरत होते, त्याच सुमारास पाकिस्तान-अफगाणिस्तानात तेहरिक-ए-तालिबान, या वेगळ्या कट्टरवादी संघटनेचा उदय झाला.
अमेरिकेचे वर्चस्व असलेले सरकार अफगाणिस्तानात असताना पाकिस्तान दुहेरी किंवा दुट्टप्पी भूमिका बजावत होता. त्या काळात तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तानने अफगाणी तालिबानला बहुमोल मदत केली होती आणि उघडपणे पाकिस्तानविरोधी भूमिका घेतली होती. तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान ही पश्तूनी राष्ट्रवादी संघटना पाकिस्तानमध्ये दहशतवादी कारवाया करत आहे. बलुच बंडखोरांना चिथावणी देत आहे हे पाकिस्तानचे आक्षेप आहेत. पाक-तालिबान संबंध जेंव्हा मधूर होते आणि अफगाणिस्तानातील अंतर्गत संघर्ष तीव्र होता त्या 80-90 च्या दशकात, संघर्षामुळे आश्रयास आलेल्या अफगाणी नागरिकांना पाकिस्तानने मुक्तपणे आश्रय दिला. त्यातील काहींना तालिबानच्या बाजुने लढण्यासाठी प्रशिक्षितही केले. मात्र आता जेंव्हा तालिबान पुन्हा सत्तेवर आला तेंव्हापासून पाकिस्तानी तालिबानच्या कृत्यांपासून हैराण आणि देशांतर्गत आर्थिक समस्यांमुळे त्रस्त झालेल्या पाकिस्तानने आपल्या देशातील अफगाणी नागरिकांना एकतर्फी निर्णय घेत मोठ्या संख्येने हुसकावून लावण्यास सुरूवात केली. युनोच्या मानवाधिकार समितीनेही स्थलांतरीतांना परत पाठवण्याच्या पाकिस्तानच्या या कृतीचा निषेध नोंदवून तंबी दिली आहे.
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानला विभागणाऱ्या 1600 कि.मी.च्या सीमारेषेस ड्युरंड रेषा म्हणून ओळखले जाते. या रेषेवरील काही मार्ग व प्रवेशस्थाने जी अफगाणिस्तानसाठी इराण व मध्य आशियाशी व्यापार आणि मानवी वाहतुकीसाठी उपयुक्त आहेत ती पाकिस्तान सातत्याने एकतर्फी बंद करुन अफगाणिस्तानवर दबाव आणत आहे. पाकिस्तानबाबत भ्रमनिरास झालेल्या तालिबान राजवटीने भारत, रशिया आणि चीनशी संबंध जोडण्यास सुरूवात केली आहे. त्यातही तालिबानचा भारताशी संबंध प्रस्थापित करण्याचा इरादा हा पाक-अफगाण संबंधांच्या सद्यकालीन शवपेटीवर ठोकलेला अखेरचा खिळा ठरावा इतका महत्त्वपूर्ण ठरला. प्रक्षोभित पाकिस्तानने नेमकी अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री मुत्ताकी भारत दौऱ्यावर येण्याची वेळ साधून अफगाणिस्तानमध्ये हवाई हल्ले केले आणि आपला निषेध नोंदविला. मुत्ताकी यांचा भारत दौरा संपताच शस्त्रसंधी झाली. एकंदरीत अफगाणिस्तान आणि पाकिस्तान संबंध ढासळताना तालिबानने भारतापुढे केलेला मैत्रीचा हात भारतासाठी उपयुक्त ठरु शकतो.
अनिल आजगांवकर