सीमाप्रश्नी तरुणाईचा नवा अध्याय
हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून दाखवली मराठी अस्मिता : सीमावासियांनी बंधने झुगारून सायकल फेरी केली यशस्वी
प्रतिनिधी/ बेळगाव
‘उष:काल होता होता,
काळ रात्र झाली,
अरे पुन्हा आयुष्याच्या
पेटवा मशाली’
असे म्हणत काळ्यादिनाच्या सायकल फेरीतून सीमाप्रश्नाचा नवा अध्याय तरुणाईने लिहिला. 1 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देत हजारोंच्या संख्येने मराठी भाषिक एकवटले. केंद्र सरकारकडून करण्यात आलेल्या अन्यायाविरोधात निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून मराठी भाषिक अस्मिता आजही तरुणांमध्ये जागृत आहे, हे दाखवून दिले.
राज्योत्सवाच्या नावाखाली कन्नड संघटनांचा धुडगूस सुरू असताना दुसरीकडे मात्र महाराष्ट्र एकीकरण समितीने शांततेने आपला निषेध व्यक्त केला. सायकल फेरी काढून मागील 69 वर्षांत झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यात आली. काळ लोटला असला तरी आजही सीमाप्रश्नाची धग, तसेच भाषेबद्दलची आपुलकी अजूनही तशीच आहे, हे दिसून आले. पोलिसांनी अनेक बंधने घातली. परंतु, ती झुगारून मराठी भाषिकांनी निषेधफेरी यशस्वी करून दाखवलीच.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली सकाळी ठीक 9.30 वाजता धर्मवीर संभाजी उद्यान येथून काळ्यादिनाच्या सायकल फेरीची सुरुवात झाली. यावर्षी तानाजी गल्ली रेल्वेगेट बंद करण्यात आल्याने फेरीच्या मार्गामध्ये बदल करावा लागला. शनिवारी सकाळपासूनच या संपूर्ण परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. फेरी सुरू झाली तेव्हा मोजकेच कार्यकर्ते असल्याने समिती पदाधिकाऱ्यांच्या मनात धाकधूक निर्माण झाली. त्यानंतर मात्र हळूहळू प्रत्येक गल्लीमध्ये कार्यकर्ते जोडले गेले.
तानाजी गल्ली रेल्वेगेट बंद असल्याने महाद्वार रोड मार्गे एसपीएम रोड, तेथून कपिलेश्वर उ•ाणपूल असा नवा मार्ग यावर्षी जोडला गेला. काळ्या टोप्या, काळे शर्ट, काळ्या साड्या, दंडाला काळ्या रिबिन बांधून सीमाभागावर झालेल्या अन्यायाचा निषेध करण्यात आला. ‘रहेंगे तो महाराष्ट्र में, नहीं तो जेल में’, ‘बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’, ‘कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय रहात नाही’ यासह असंख्य घोषणांनी फेरीचा मार्ग दणाणून निघाला.
मराठी भागातून काढण्यात आलेल्या सायकल फेरीला पुढे सरकत जाईल तसा प्रतिसाद वाढत गेला. सुरुवातीला शंभर-दोनशे इतकेच कार्यकर्ते असलेली फेरी नंतर मात्र आठ ते दहा हजारांपर्यंत पोहोचली होती. हातामध्ये काळे झेंडे घेऊन आपल्या लहानग्यांसोबत सीमावासीय सहभागी झाले होते. एसपीएम रोड येथे पाऊस येऊन देखील कार्यकर्ते मागे हटले नाहीत. मराठा मंदिरपर्यंत पावसात भिजूनच फेरी पूर्ण करण्यात आल्याने कार्यकर्त्यांच्या जिद्दीचे कौतुक करण्यात आले.
ठिकठिकाणी अडवणूक तरी उपस्थिती वाढली
युवक सायकल फेरीपर्यंत पोहोचू नयेत, यासाठी शिवाजी उद्यान, कपिलेश्वर रोड, शनिमंदिर रोड या परिसरात ठिकठिकाणी पोलिसांनी बॅरिकेड्स लावून अडवणूक केली. त्यामुळे फेरीमध्ये पोहोचण्यासाठी युवकांना धडपड करावी लागली. इतर मार्गांनी पोलिसांची हुकूमशाही झुगारून युवकांनी फेरीमध्ये प्रवेश केला. तरीदेखील बरेच तरुण पोलिसांच्या अडवणुकीमुळे फेरीला मुकले. काळ्या रंगाचे कपडे परिधान करून येणाऱ्यांना तुम्ही कोठे चालला आहात? असा प्रश्न करून अडवणूक करण्याचा प्रयत्न सुरू असल्याने अनेक ठिकाणी वादावादीचे प्रकार घडले.
80 टक्के तरुणांचीच उपस्थिती
सीमालढ्याच्या या चळवळीमध्ये तरुण दूर जात आहेत, अशी आरोळी प्रत्येकवेळी दिली जाते. परंतु, शनिवारी झालेल्या 1 नोव्हेंबरच्या निषेध फेरीमध्ये युवकांनी आपली उपस्थिती दाखवून अनेकांची बोलती बंद केली. फेरीमध्ये 80 टक्क्यांहून अधिक तरुणांचाच सहभाग होता. केवळ मध्यवर्ती म. ए. समितीच्या एका आवाहनावर हजारोंच्या संख्येने तरुण सहभागी झाले होते. केवळ म. ए. समितीच नाहीतर राष्ट्रीय पक्षांच्या विचारसरणीशी जोडले गेलेले तरुणही निषेध फेरीमध्ये सहभागी झाल्याने ही भविष्यासाठी नांदी ठरणार, हे निश्चितच.
समिती नेत्यांचा सहभाग
सायकल फेरीमध्ये मध्यवर्ती म. ए. समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, माजी नगरसेवक नेताजी जाधव, रमाकांत कोंडुसकर, युवा समिती सीमाभागाचे अध्यक्ष शुभम शेळके, युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, युवा नेते आर. एम. चौगुले, अॅड. अमर येळ्ळूरकर, किरण गावडे, महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर, माजी महापौर सरिता पाटील, माजी जि. पं. सदस्या सरस्वती पाटील, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, नगरसेविका वैशाली भातकांडे, माजी नगरसेविका सुधा भातकांडे, माजी नगरसेवक मनोहर हलगेकर, विनायक गुंजटकर, विजय भोसले, राजू बिर्जे, राकेश पलंगे, आप्पासाहेब पुजारी, वैशाली हुलजी, मदन बामणे, गणेश दड्डकर, अमित देसाई, दिगंबर पवार, श्रीधर खन्नूकर, नितीन खन्नूकर, सुनील बोकडे, अॅड. एम. जी. पाटील, अॅड. सुधीर चव्हाण, सिद्धार्थ चौगुले, निखील देसाई, सुरज कुडूचकर, सचिन केळवेकर, अनंत पाटील, प्रतीक पाटील, सुनील बाळेकुंद्री, तालुका म. ए. समितीचे मनोहर संताजी, मनोहर हुंदरे, विठ्ठल पाटील, लक्ष्मण होनगेकर, नानू पाटील, राजू किणयेकर, शंकर कोणेरी, सुधीर पाटील, महादेव गुरव, विनायक पाटील, आर. के. पाटील, जोतिबा अंबोळकर, जोतिबा बांडगी, शिवाजी हंगीरगेकर यांच्यासह बेळगाव शहर, तालुका तसेच इतर भागातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.
आता थापा बंद करा; फलक ठरले लक्षवेधी
सायकल फेरीमध्ये युवावर्गाने तयार केलेले फलक लक्षवेधी ठरले. रामलिंगवाडी, गोवावेस येथील मंडळाने तयार केलेला ‘जोपर्यंत बेळगाव घेत नाही, तोपर्यंत शांत बसत नाही’ हा फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. त्याचबरोबर चिमुकल्यांनी हातामध्ये फलक घेऊन पाचवी पिढी या लढ्यामध्ये सक्रिय असल्याचे दाखवून दिले. ‘महाराष्ट्र माझे मायबाप हो, माझे आजोबा-बाबा यांनी फार थापा ऐकल्या, आता थापा बंद करा’, असे महाराष्ट्र सरकारचे डोळे उघडणारा फलक घेऊन एक चिमुकला सायकल फेरीमध्ये सहभागी झाला होता.
फेरीचे नेतृत्व महिलांकडेच
निषेधफेरीच्या अग्रभागी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महिला होत्या. त्यांनीच या फेरीचे नेतृत्व केले. ज्या-ज्या ठिकाणी पोलिसांकडून आडकाठी आणण्याचा प्रयत्न झाला, त्या-त्या ठिकाणी महिलांनी चोख भूमिका बजावली. महिला आघाडीच्या अध्यक्ष रेणू किल्लेकर, माजी महापौर सरिता पाटील, माजी जि. पं. सदस्या सरस्वती पाटील, प्रेमा मोरे, माजी नगरसेविका सुधा भातकांडे, नगरसेविका वैशाली भातकांडे, शिवानी पाटील, नीरा काकतकर, कमल मन्नोळकर, रुक्मिणी निलजकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी महिला यावेळी उपस्थित होत्या.
काळे कपडे, टोप्या परिधान करून घेतला मिरवणुकीत सहभाग
संपूर्ण परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त