घटप्रभा नदीवरील लोळसूर येथे नव्या पुलाची होणार उभारणी
पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचे आदेश
बेळगाव : अतिवृष्टीमुळे गोकाक तालुक्यातील लोळसूर पूल पाण्याखाली गेला होता. त्यामुळे नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन पुढील सहा महिन्यांत नव्या पुलाचे काम सुरू करण्याची सूचना पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी केली. घटप्रभा नदीवर हा पूल आहे. गोकाक शहर व परिसरातील विविध वसाहतींच्या विकासासाठी पालकमंत्र्यांनी पावले उचलली आहेत. प्रत्येक पावसाळ्यात लोळसूर पूल पाण्याखाली येतो. त्यामुळे नागरिकांचा त्रास कमी करण्यासाठी नवा पूल उभारणार आहे. नव्या पुलाच्या आराखड्याची पाहणी करून सतीश जारकीहोळी यांनी सहा महिन्यांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली. संकेश्वर-यरगट्टी राज्यमार्गावरील जुना पूल पाण्याखाली जात असल्यामुळे पावसाळ्यात त्रास सहन करावा लागतो. ही गोष्ट लक्षात घेऊन नव्या पुलासाठी 40 कोटी रुपये अनुदान मंजूर झाले असून सर्व प्रक्रिया पूर्ण करून पुढील सहा महिन्यांत पुलाच्या कामाला सुरुवात करणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.