For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारत-अफगाणिस्तान संबंधांची नवी सुरुवात

06:03 AM Oct 22, 2025 IST | Tarun Bharat Portal
भारत अफगाणिस्तान संबंधांची नवी सुरुवात
Advertisement

काबूलमधील टेक्निकल मिशन दूतावासामध्ये अपग्रेड

Advertisement

वृत्तसंस्था/ काबूल

भारत आणि अफगाणिस्तानच्या संबंधांची नवी सुरुवात झाली आहे. अलिकडेच अफगाणिस्तानचे विदेशमंत्री अमीर खान मुत्तकी यांच्या दौऱ्यानंतर आता भारताने मंगळवारी काबूल येथील टेक्निकल मिशनचा दर्जा तत्काळ प्रभावाने दूतावासाच्या स्तरावर अपग्रेड केला आहे. हा निर्णय परस्पर हितांच्या सर्व क्षेत्रांमध्ये अफगाणिस्तान सोबत द्विपक्षीय संबंधांना दृढ करण्याच्या भारताच्या संकल्पाला दर्शवित असल्याचे विदेश मंत्रालयाने एक पत्रक जारी करत म्हटले आहे.

Advertisement

काबूल येथील भारताच्या टेक्निकल मिशनला दूतावासात अपग्रेड करण्याच्या निर्णयाची घोषणा विदेशमंत्री एस. जयशंकर आणि अफगाणिस्तानचे विदेशमंत्री अमीर खान मुत्तकी यांच्यातील चर्चेनंतर करण्यात आली. यापूर्वी अफगाणिस्तानचे विदेशमंत्री 9-16 ऑक्टोबरपर्यंत भारत दौऱ्यावर होते. अफगाणिस्तानच्या समावेशक विकास, मानवीय सहाय्य आणि क्षमतानिर्मिती पुढाकारांमध्ये दूतावास सकारात्मक भूमिका बजावणार असल्याचे विदेश मंत्रालयाने म्हटले आहे.

ऑगस्ट 2021 मध्ये तालिबानने अफगाणिस्तानची सत्ता हाती घेतली होती. यानंतर भारताने स्वत:चा तेथील दूतावास बंद करण्याचा निर्णय घेतला होता. तर 2022 मध्ये भारताने अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथे टेक्निकल टीम तैनात करण्याचे पाऊल उचलले होते, तर आता भारताने याला पूर्ण दूतावासाचा दर्जा देत अफगाणिस्तानची एक मागणी पूर्ण केली आहे.

भारत आणि अफगाणिस्तानने  द्विपक्षीय व्यापार संबंध वृद्धींगत करण्यावर सहमती दर्शविली असून यात खासकरून खाणक्षेत्रातील सहकार्य वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. थेट व्यापारासाठी हवाई वाहतूक कॉरिडॉर पुन्हा कार्यान्वित करण्यात येणार आहे. याचबरोबर भारत-अफगाणिस्तान व्यापार इराणच्या चाबहार बंदरामार्गे करण्यासाठी सहकार्य करण्याची तयारी तालिबानने दाखविली आहे.

भारताने अफगाणिस्तानातील 6 प्रकल्पांना बळ पुरविण्याचा निर्णय घेतला असून यात काबूलच्या बगरामी जिल्ह्यातील रुग्णालय उभारण्यात येणार आहे. तसेच अफगाण जनतेसाठी अन्नधान्य सहाय्य करण्यात येणार आहे. तर 2021 पूर्वी भारताने अफगाणिस्तानातील 500 हून अधिक विकास आणि पायाभूत प्रकल्प हाती घेतले होते. यात ऊर्जा तसेच पाणीपुरवठा, शिक्षण आणि आरोग्य विषयक प्रकल्प सामील होते.

Advertisement
Tags :

.