सोन्यापेक्षाही महाग घरटे
पक्ष्यांचे जग माणसाला नेहमीच आकर्षक वाटत आलेले आहे. अनेक लहान आकाराच्या पक्षांमध्येही इतकी क्षमता असते, की माणूसही आश्चर्यचकित होतो. असाच ‘मूर्ती लहान पण कीर्ती महान’ या प्रकारचा ‘स्विफ्टलेट’ नामक पक्षी अत्यंत वैशिष्ट्यापूर्ण आहे. इतर पक्षी आपले घरटे गवतकाड्यांनी बनवितात. पण हा पक्षी आपल्या घरट्याची निर्मिती स्वत:च्याच लाळेपासून करतो. या घरट्यापासून पिण्याचे ‘सूप’ बनविले जाते, जे अत्यंत चवदार असते, असा अनेकांचा अनुभव आहे. अनेक आशियायी देशांमध्ये हे सूप आवडीने घेतले जाते. पण हे सूप हे वैशिष्ट्या नसून या घरट्याची किंमत हे महत्वाचे वैशिष्ट्या आहे. सोन्याची किंमत किती असते, याची आपल्यापैकी प्रत्येकाला जाणीव असतेच. हे घरटे सोन्यापेक्षाही महाग किमतीला विकले जाते. या घरट्याला जगभरात प्रचंड मागणी आहे. त्या मानाने या घरट्यांची उपलब्धता बरीच कमी असल्याचे किंमत इतकी मोठी आहे. जेव्हा हा पक्षी घरटे निर्माण करण्यासाठी आपल्या चोचीतून लाळ बाहेर काढतो आणि त्या लाळेच्या धाग्यांनी घरटयाची रचना करण्यास प्रारंभ करतो, तेव्हा बाहेरच्या वायूच्या संपर्काने या लाळेचे तंतू घट्ट बनतात. या तंतूंपासून एक कपासारखा आकार निर्माण होतो. हेच या पक्ष्याचे घरटे असते. मात्र, हा पक्षी हे घरटे झाडांवर बांधत नाही. तर उंचावरचे खडक, अंधाऱ्या गुहा किंवा तशाच दुर्गम आणि उंच भागांमध्ये ही घरटी बांधली जातात. ती निर्माण होण्यासाठी अनेक दिवसांचा कालावधी लागतो. एक खाद्यपदार्थ म्हणून या घरट्यांची मागणी असल्याने ती मोठ्या प्रमाणात तोडली जातात. यामुळे अनेक देशांमध्ये या पक्ष्यांची संख्या कमी होत आहे. काही देशांमध्ये तो नामषेश होण्याच्या मार्गावर आहे. विशेषत: या पक्ष्याची अंडी किंवा पिले घरट्यात असताना ती तोडण्यात आली, तर पुढची पिढी धोक्यात येते. म्हणून अनेक देशांनी घरटी तोडण्यावर निर्बंध आणले गेले आहेत.
