झाडाच्या खोडातून वाहतो नैसर्गिक जलफवारा
मॉन्टेनेग्रोतील 100 वर्षे जुन्या झाडाचे अनोखे रहस्य
निसर्गाच्या कुशीत अनेक अदभूत रहस्ये दडलेली असतात, याचीच प्रचिती युरोपमधील मॉन्टेनेग्रो या देशातील डिनोसा या छोट्याशा गावात येते. येथे मुसळधार पाऊस पडताच एका जुन्या झाडाच्या खोडातून चक्क पाण्याचा जोरदार प्रवाह बाहेर पडतो. त्यामुळे हे झाड एखाद्या नैसर्गिक पाण्याच्या फवाऱ्यासारखे दिसते.
डिनोसा गावातील हिरव्यागार परिसरात असलेले हे झाड अंदाजे 10-150 वर्षे जुने असल्याचे सांगण्यात येते. विशेष म्हणजे गेल्या 20-25 वर्षापासून मुसळधार पावासाच्या काळात या झाडाच्या खोडातून पाणी बाहेर पडताना दिसते. झाडाच्या खोडातील मोठ्या पोकळीतून पाणी काही फूट उंचीवर असलेल्या छिद्रातून वेगाने बाहेर पडते.
जमिनीखालील पाण्याचा दबाव कारणीभूत
या अनोख्या घटनेमागे कोणताही चमत्कार नसून नैसर्गिक जलप्रवाह आणि जमिनीखाली निर्माण होणारा पाण्याचा दबाव कारणीभूत असल्याचे तज्ञांचे मत आहे. मुसळधार पावसामुळे जमिनीखालील जलस्रोत आणि पाण्याचे मार्ग भरून जातात, त्यामुळे जमिनीखालील पाण्याचा दाब वाढतो.
वाढलेल्या दाबामुळे पाणी वरच्या दिशेने प्रवाहित होते. जुन्या झाडाच्या मूळांभोवती आणि खोडातील पोकळ भागातून या पाण्याला मार्ग मिळतो. परिणामी खोडातील छिद्रातून पाणी जोराने बाहेर पडते आणि एखाद्या फवाऱ्यासारखे दृश्य निर्माण होते. पावसाचा जोर वाढला की परिसरातील इतर लहान छिद्रांमधूनही पाणी बाहेर पडताना दिसते. त्यामुळे संपूर्ण परिसरात पाण्याचे प्रवाह तयार होतात
एस्टोनियातही दिसतो असाच प्रकार
अशाच प्रकारची आणखी एक प्रसिद्ध नैसर्गिक घटना एस्टोनियातील तुहाला गावात पहायला मिळते. येथे भूमिगत नदीच्या वर असलेल्या एका विहिरात मुसळधार पावसाच्या काळात पाणी उसळते. पाण्याचा प्रवाह इतका वाढतो की, विहिरीतून सुमारे अर्धा मीटर उंचीपर्यंत पाण्याचा फवारा बाहेर पडतो. या विहिरीला ‘विचेस वेल’ (चेटकिणींची विहिर) असे म्हटले जाते. स्थानिक लोक यामागे एक रंजक लोककथा सांगतात, त्यांच्या मते जमिनीखाली सौना येथे चेटकिणी एकत्र येताता आणि एकमेकींना बर्चच्या फांद्यांनी मारतात, त्यामुळे पाणी जमिनीला फोडून बाहेर पडते, अशी त्यांची समजूत आहे. मात्र वैज्ञानिक दृष्ट्या पाहता, तुहाला येथील पाण्याचा फवारा हा भूमिगत जलप्रवाहातील वाढलेला पाण्याचा दाबा आणि मुसळधार पावसामुळे निर्माण होणाऱ्या नैसर्गिक परिस्थितीचा परिणाम आहे. निसर्गाच्या या अनोख्या घटना आजही जगभरातील पर्यटक आणि संशोधकांचे लक्ष वेधून घेत आहेत.