For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘भारतातही व्हावे बांगलादेशसारखे आंदोलन’

06:03 AM Jan 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘भारतातही व्हावे बांगलादेशसारखे आंदोलन’
Advertisement

भारतीय राष्ट्रीय लोकदल नेते चौताला यांची इच्छा : वादग्रस्त व्यक्तव्याने टीका

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

भारतात बांगला देश, नेपाळ आणि श्रीलंकेसारखे आंदोलन होण्याची आवश्यकता आहे, असे वादग्रस्त विधान हरियाणातील नेते आणि भारतीय राष्ट्रीय लोकदलाचे सर्वेसर्वा अभय चौताला यांनी केले आहे. भारतात सध्या असलेले सरकार जाणे आवश्यक आहे. त्याकरिता, अशा आंदोलनाची आवश्यकता आहे. भारताच्या शेजारच्या देशांमधील आंदोलनांचे नेतृत्व युवकांनी केले होते. भारतातील युवकांसाठी ही आंदोलन आदर्श ठरु शकतात, अशी मल्लीनाथी त्यांनी केली आहे.

Advertisement

चौताला यांच्या या विधानांचा व्हिडीओ सध्या गाजत आहे. भारतातील सध्याचे सरकार घालविण्यासाठी याच मार्गांचा अवलंब करण्यात आला पाहिजे. येथील असेच तंत्र उपयोगात आणण्यात आले पाहिजे. आपल्याही देशात अशी क्रांती होऊ शकते. युवकांनी ही क्रांती करण्याचे मनावर घेतले पाहिजे, असे चौताला यांचे म्हणणे आहे. त्यांची ही विधाने देशात अराजक माजविण्यासाठी असून जनता अशा प्रक्षोभक विधानांना भीक घालणार नाही, अशी टीका भारतीय जनता पक्षाने केली.

पूनावाला यांचा आरोप

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी चौताला यांच्या विधानांचा चांगलाच समाचार घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेत्यांची चरफड होत आहे. सनदशीर मार्गाने निवडणूक जिंकण्याची क्षमता त्यांनी गमावली आहे. त्यामुळे ते घटनाबाह्या, हिंसक आणि अनैतिक मार्गांचा उपयोग करुन सत्तेवर येण्याचा प्रयत्न करतात. त्यांना भारताच्या लोकशाहीची कोणतीही बूज नाही. त्यांचा उद्देश काहीही करुन सत्ता प्राप्त करा, असा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार देशाच्या विकासासाठी उत्कृष्ट कार्य करीत असून ते विरोधकांना बघवत नाही. त्यामुळे त्यांचा जळफळाट आहे, असा घणाघात शहजाद पूनावाला यांनी शुक्रवारी केला.

नैराश्यातून विरोधकांची जळफळ

विद्यमान केंद्र सरकार जनतेची कामे करीत आहे. जनतेला हेच सरकार हवे आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा, किंवा त्यांच्या सरकारचा निवडणुकीच्या माध्यमातून पराभव करता येणे शक्य नाही, याची जाणीव विरोधी पक्षांना झाली आहे. त्यामुळे विरोधी पक्षांचे नेते नैराश्याच्या गर्तेत पडले आहेत. त्यामुळे घटनाबाह्या आणि लोकशाहीविरोधी मार्गांनी सत्तेवर येण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र, या देशातील जनता विरोधकांच्या चाली ओळखून असून विरोधकांचा प्रत्येक घटनाबाह्या डावपेच जनतेच्या आधारानेच हाणून पाडला जाईल. विरोधी नेत्यांनाच हा देश सोडून पलायन करावे लागेल, असा प्रतिटोला भारतीय जनता पक्षाचे आणखी एक राष्ट्रीय प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी विरोधकांवर लगावला आहे. हरियाणातील भारतीय जनता पक्षाचे मंत्री क्रिशन बेदी यांनीही चौताला यांना धारेवर धरले असून हिम्मत असेल तर निवडणुकीच्या मैदानात हारवून दाखवा. बाष्कळ गप्पा मारुन स्वत:चे समधान करुन घेऊ नका, असे आव्हान दिले आहे.

Advertisement
Tags :

.