अमेरिकेकडून चालढकल, रशियाची मोठी ऑफर
लढाऊ विमानांच्या इंजिन पुरवठ्याला विलंब
वृत्तसंस्था/ मॉस्को
अमेरिकेने रशिया आणि गुरपतवंत सिंह पन्नूवरून सुरू असलेल्या द्विपक्षीय तणावादरम्यान तेजस लढाऊ विमानावरून पुन्हा एकदा भारताला झटका दिला आहे. अमेरिकेतील जीई एअरोस्पेस कंपनीने भारताच्या स्वदेशी तेजस एमके1ए लढाऊ विमानासाठीच्या इंजिन पुरवठ्याला आता 2025 पर्यंत टाळले आहे. यामुळे भारतीय वायुदलाच्या आधुनिकीकरणाच्या कार्यक्रमाला मोठा झटका बसला आहे. भारतीय मिग-21 विमाने ताफ्यातून निवृत्त होत असताना आणि दुसरीकडे चीन तसेच पाकिस्तान मोठ्या प्रमाणात स्वत:च्या वायुदलात अत्याधुनिक लढाऊ विमाने सामील करत असताना अमेरिकेने हा झटका दिला आहे. अमेरिकेच्या ‘विश्वासभंगा’दरम्यान रशियाने भारताला स्वत:च्या नव्या आणि अत्याधुनिक सुखोई विमानांवरून मोठी ऑफर दिली आहे.
रशियाने स्वत:चे सर्वात आधुनिक आणि घातक सुखोई-75 ‘चेकमेट’ आणि सुखोई-35 वरून भारताला ही ऑफर दिली आहे. रशियाने स्वत:च्या पाचव्या पिढीचे लढाऊ विमान संबोधिण्यात येणाऱ्या सुखोई-75 च्या भारतातील निर्मितीची ऑफर दिली आहे. रशिया हा भारताचा सर्वात मोठा शस्त्रास्त्र पुरवठादार देश आहे. तर अमेरिका आता भारताने एफ-35 लढाऊ विमान खरेदी करावे असा आग्रह करत आहे. सुखोई-75 ला अमेरिकेच्या एफ-35 स्टील्थ लढाऊ विमानाच्या तोडीस तोड मानले जाते.
सुखोई-75 तुलनेत स्वस्त
सुखोई-75 लढाऊ विमानात अत्याधुनिक एवियानिक्स आणि एआयचा अंतर्भाव आहे. विमानाची किंमत सुमारे 30-35 दशलक्ष डॉलर्स आहे. अमेरिकन एफ-35 च्या तुलनेत (82.5 दशलक्ष डॉलर्स) याची किंमत निम्म्यापेक्षा कमी आहे. रशिया अन् भारत यांच्यात लढाऊ विमानांवरून करार झाला तर दोन्ही देशांचे संबंध अधिकच मजबूत होणार आहेत. तर यामुळे रशियाच्या अर्थव्यवस्थेलाही मजबुती मिळणार आहे. हा क्यवहार झाला तर आशियात रशियाचा रणनीतिक प्रभाव वाढेल तर भारत या विमानाची निर्यात करून विदेशी चलन मिळवू शकणार आहे.
द्विपक्षीय संबंध मजबूत
रशिया दशकांपासून भारताला मिगपासून सुखोईपर्यंत अनेक लढाऊ विमाने पुरवत आला आहे. 2025 मध्ये होणाऱ्या एअरो इंडिया प्रदर्शनात रशियाकडून सुखोई-75 विमान सादर केले जाणार आहे. रशिया भारताला या अत्याधुनिक विमानाच्या निर्मितीची ऑफर देणार आहे. यामुळे भारत या विमानाची विक्री अन्य देशांना करू शकणार आहे. चीनची पर्वा न करता रशियाकडून ही भारताला ऑफ दिली जात आहे.