कोलगावातील शिंदे कुटुंबांसमोर संकटाचा डोंगर !
घरच्या कर्त्या पुरुषालाच दुर्धर आजारानं वेढलं ; आता गरज तुमच्या मदतीच्या हातांची
ओटवणे । प्रतिनिधी
सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव निरुखेवाडीत वास्तव्यास असलेल्या शिंदे कुटुंबांसमोर नियतीनं संकटांचा डोंगरच जणू उभा करून ठेवला आहे. घरच्या कर्त्या पुरुषालाच दुर्धर आजारानं ग्रासल्यानं कुटुंबासमोर उदरनिर्वाहाची मोठी समस्या उभी राहिली आहे. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेनं त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांच दुःख जाणून घेत त्यांना धीर दिला. तसेच शासकीय योजनांचा लाभ त्यांना मिळवून देण्यासाठी ही संस्था प्रयत्नशील आहे. या असाहाय्य कुटुंबाला स्वतःच्या पायावर उभे राहण्याकरिता समाजातील दानशूर व्यक्तींनी मदतीची हात देण्याच आवाहन सामाजिक बांधिलकीनं केलं आहे.मूळ शिवापूर सारख्या दुर्गम भागातून सावंतवाडी शहराच्या शेजारी असलेल्या कोलगाव निरुखेवाडीत हे शिंदे कुटुंब वास्तव्यास आहे. सेंटरिंगच्या कामावर या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालायचा. परंतु, कुटुंबांचा कणा असलेल्या 45 वर्षीय अर्जुन नारायण शिंदे यांना दुर्धर आजारानं ग्रासलं अन् स्वावलंबी कुटुंबावर परावलंबनाची वेळ कापर काळजाच्या नियतीनं आणली. २०१६ पर्यंत शिंदे कुटुंबाचा सुखाचा संसार सुरु होता. पत्नी अश्विनी, सात वर्षाची मोठी कन्या विंदा आणि पाच वर्षाची छोटी कन्या पियुषा अस छोट अन् सुखी, समाधानी हे कुटुंब. पण, या सुखी संसाराला ग्रहण लागाल अन् कर्त्यासवर्त्या कुटुंबप्रमुखालाच दुर्धर आजाराने ग्रासले. अर्जुन शिंदे यांना उपचारादरम्यान किडनीच्या आजाराचे पहिले निदान झाले.
हा आजार समजताच निराश, हताश आणि उद्विग्न झालेल्या शिंदेंना पॅरेलीसचा झटका आला. त्यांच्या रोजगारावर गदा आली. शेजारच्या मंडळींनी त्यांना गोवा मेडिकल कॉलेजमध्ये काही काळ इलाजासाठी दाखल केले. होतीनव्हती तेवढी आर्थिक पुंजी पतीच्या व्याधीवरील उपचारासाठी कुटुंबियांनी संपविली. राबणारे हात अचानक थांबल्यान आर्थिक चणचण भासू लागली. आर्थिक परिस्थितीमुळे उपचारही थांबवणे भाग पडले. परिणामी आजार बळावला. उभे राहून चालणे सुद्धा कठीण झालं. सर्व कुटुंबाची ससेहोलपट सुरू झाली. शेजारच्या मंडळींनी थोड्याफार प्रमाणात मदतीचा हात दिला. परंतु, त्याला देखील मर्यादा पडल्या. आज हे कुटुंब हालाखीचं आणि उपासमारीचे जीवन जगत आहे. एक वेळचे अन्न मिळणेही दुरापस्त झाले आहे. जगण्यासाठी त्यांचा चिरंतन संघर्ष चालू आहे. एकविसाव्या शतकात आपण भारत जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था म्हणून डंगोरा पिटतो. दरडोई उत्पन्नात दुपटीने वाढ झाल्याच्या गप्पा करतो. याच देशात आजही हजारो लोक भुकेने मरतात हे जळजळीत आणि विदारक वास्तव आहे. दरवर्षी तीव्र भूक आणि उपासमार, रोगामुळे अनेक लोक बळी पडत आहेत. त्यात सर्वाधिक संख्या ही कुपोषित बालकांची आहे. या मध्येच गणल जाणार हे एक अभागी कुटुंब आहे. नशिबाने डोक्यावर छप्पर आहे. परंतु, भूक भागवण्यासाठी अन्न नाही. दोन्ही लहान मुलींच्या पुढील शिक्षणासाठी लागणारी मदत खूपच गरजेची आहे. या कुटुंबाला भावनिक आणि आर्थिक आधाराची नितांत गरज आहे.
दरम्यान, संजय सावंत यांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान सारख्या सेवाभावी संस्थेन या कुटुंबापर्यंत पोहचून त्यांना मदतीचा हात पुढे केला. त्यांना काही शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. या भेटीदरम्यान आपली करूण कहाणी सांगताना शिंदे उभयतांच्या डोळ्यातून अश्रुचा महापूर पाहायला मिळाला. स्वावलंबी लोकांवर नियतीनं आणलेलं परावलंबी जीवन हे काळीज पिळवटून टाकणारं होतं.या कुटुंबाला लागणाऱ्या काही जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठाही या संस्थेने केला आहे. यावेळी सामाजिक बांधिलकीचे अध्यक्ष प्रा. सतिश बागवे, उपाध्यक्ष प्रा.शैलेश नाईक, कार्याध्यक्ष संजय पेडणेकर, रवी जाधव, रूपा मुद्राळे, श्याम हळदणकर, सुजय सावंत, शरदनी बागवे आदी उपस्थित होते. या असाहाय्य शिंदे कुटुंबाला स्वतःच्या पायावर उभे राहण्याकरिता समाजातील दानशूर व्यक्तींकडून मदतीची गरज आहे. यासाठी मदतीचा हात पुढे करावा असं आवाहन सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान सावंतवाडीनं केलं आहे.
शिंदे कुटुंबांना मदतीसाठी.
Bank of India
Name: ASHWINI ARJUN SHINDE
Account No -141010510001995
IFSC code - 8K100001410