‘विकसित भारत’ मेसेज पाठविण्यास स्थगिती
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोग आता अॅक्शन मोडमध्ये दिसून येत आहे. मागील काही दिवसांपासून ‘विकसित भारत’ या नावाने पाठविण्यात येणारा व्हॉट्सअॅप मेसेज मोदी सरकारचा प्रचार करत असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात आला होता. आता आयोगाने हा मेसेज पाठविण्यास स्थगिती दिली आहे. आयोगाने आचारसंहिता लागू झाल्यावर लोकांकडे विकसित भारताशी निगडित संदेश जात असल्यास ते त्वरित रोखा असा निर्देश इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयाला दिले आहेत. तसेच आयोगाने यासंबंधी करण्यात आलेल्या कारवाईची माहिती सादर करण्यास सांगितले आहे. लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाल्यावर आणि आदर्श आचारसंहिता लागू झाल्यावरही नागरिकांच्या फोनवर अशाप्रकारचे मेसेज येत असल्याच्या तक्रारी आयोगाला प्राप्त झाल्या होत्या. हे मेसेज आदर्श आचार संहिता लागू होण्यापूर्वी पाठविण्यात आले होते, परंतु यातील काही मेसेजिस सिस्टीम आणि नेटवर्कच्या समस्यांमुळे लोकांना विलंबाने डिलिव्हर झाल्याचे स्पष्टीकरण इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने दिले आहे. तर आयोगाने याप्रकरणी त्वरित कार्यवाही अहवाल सादर करण्याचा निर्देश संबंधित मंत्रालयाला दिला आहे.