For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘वॉरेन बफेट’ नावाचे पैशाचे झाड

12:14 AM Jan 10, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘वॉरेन बफेट’ नावाचे पैशाचे झाड
Advertisement

माणसाचे धावणे मुख्यत्वे करून पैशाच्या मागेच राहिले आहे. पैसा मिळवण्याचे असे बरेच मार्ग आहेत, जे ‘यशात’ मोडत नाहीत. आपल्याला फक्त चांगल्या मार्गांनी बक्कळ पैसा कमवणाऱ्यांबद्दल मात्र खूपच आकर्षण असते. आजकाल बहुतेकांना यशापेक्षा अधिक इंटरेस्ट पैशातच दिसून येतो. समजा परमेश्वर प्रसन्न झाला आणि त्यानं ‘फक्त एकदाच काय हवं ते माग’ असे विचारले तर अनेकजण एकच मागतील-पैसा. ‘आमच्या प्रयत्नांना यश लाभू दे किंवा मला सर्जनशीलता लाभू दे असं कुणीही म्हणणार नाहीत’. कसेही करून भरपूर पैसा आयुष्यात लाभू दे असाच अनेकांचा प्रयत्न असतो. पैसा हवाच. म्हणजेच तो कमवायलाच हवा. पण तो कसा कमवायचा हे कळायला हवे. आपल्या प्रयत्नाने, कष्ट करून पैसा हा निर्माण करावा लागतो. प्रत्येकानेच आपले आर्थिक व्यवहार, आपली गुंतवणूक हा आपला स्वत:चा पैसा कमवण्याचा ‘उद्योग’ मानला पाहिजे. वॉरेन बफेट या असामान्य असामीने आपल्या गुंतवणुकीतून अक्षरश: पैशाचे झाड निर्माण केले.

Advertisement

वॉरेन बफेट गुंतवणूक क्षेत्रातील जगातील सर्वात मोठंच नाही तर धनवान मंडळींच्या मांदियाळीतीलही अग्रेसर नाव. त्यांनी सर्व संपत्ती ही स्वत: कमावलेली आहे. स्वत:जवळचे 21.5 अब्ज डॉलर्स दान देऊन सुद्धा 87.5 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह ते जगातील तिसरे श्रीमंत व्यक्ती आहेत. वॉरेन बफेट यांना जगातील एक सर्वात यशस्वी इन्व्हेस्टमेंट बँकर, यशस्वी अमेरिकन उद्योगपती आणि जगातील एक अत्यंत दानशूर, अब्जावधी डॉलर्सची संपत्ती गरजूंवर खर्च करणारी महान परोपकारी व्यक्ती म्हणून जगभरात ओळखले जाते.

वॉरेननी स्वत:च्या वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी आपला पहिला शेअर खरेदी केला आणि आता त्यांना खूप वाईट वाटतं की आपण किती उशीर केला! त्यावेळी वस्तू खूप स्वस्त होत्या हो. आता किमान तुम्ही तुमच्या मुलांना लहान वयापासून गुंतवणूक करायला प्रोत्साहन द्या, असे ते सांगतात. वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी वृत्तपत्र विक्री करून काही बचत केली आणि त्यातूनच एक छोटं शेत खरेदी केले. छोट्या बचतीतून माणूस अनेक गोष्टी खरेदी करू शकतो. नोकरीच्या मागे लागण्यापेक्षा तुमच्या मुलांना एखादा व्यवसाय करण्यासाठी उत्तेजन द्या, असे त्यांचे सांगणे आहे.

Advertisement

बफेट हे अमेरिकेतील सर्वोच्च सीईओंमध्ये गणले जात होते आणि काही राष्ट्राध्यक्षांचे जवळचे सल्लागार होते. दरवर्षी, हजारो भागधारक ओमाहा येथे होणाऱ्या कंपनीच्या वार्षिक बैठकीत बफेट यांचे गुंतवणुकीवर मार्गदर्शनपर भाषण ऐकण्यासाठी एकत्र येत असत. त्यांच्या गुंतवणुकीच्या यशाचा अंदाज यावरून लावता येतो की 1965 ते 2024 दरम्यान, बर्कशायरच्या शेअर्समध्ये दरवर्षी 20 टक्के वाढ झाली, तर त्याच काळात एस अँड पी-500 निर्देशांकाची सरासरी वाढ सुमारे 10 टक्के होती. बफेटच्या चांगल्या कामगिरीमुळेच ते बाजारात मोठे व्यवहार करू शकले आहेत, वॉरेन बफेट यांच्या नेतृत्वात बर्कशायर

हॅथवेने गेल्या काही दशकांमध्ये वेगाने प्रगती केली आहे. त्यांनी त्यांचे विश्वासू सहाय्यक आणि उपाध्यक्ष चार्ली मॅन्जर यांच्या सहकार्याने कंपनीच्या पोर्टफोलिओसाठी गुंतवणूक आणि संपादनाचे निर्णय घेतले. बर्कशायर हॅथवेला 1.16 ट्रिलियन

डॉलर्सपेक्षा जास्त किमतीची कंपनी बनवणारे आणि आपल्या गुंतवणूक कौशल्य आणि विनोदी शैलीसाठी प्रसिद्ध असलेले वॉरेन बफेट यांनी आपल्या निवृत्तीची घोषणा केली  आहे. आज, बर्कशायर

हॅथवेकडे विविध व्यवसाय आहेत. ज्यामध्ये बीएनएसएफ रेल्वे, ऑटो विमा कंपनी गीको, ऊर्जा क्षेत्रातील दिग्गज आणि डेअरी क्वीन आणि सीज कँडीज सारखे रिटेल ब्रँड यांचा समावेश आहे. 2024 मध्ये, या सर्व कंपन्यांनी एकत्रितपणे सुमारे 47.4 अब्ज डॉलरचा ऑपरेटिंग नफा कमावला. यासोबतच, बफेट यांनी बर्कशायर अंतर्गत एक मजबूत स्टॉक पोर्टफोलिओ देखील तयार केला, ज्यामध्ये अॅपल आणि अमेरिकन एक्सप्रेस सारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे. यामुळे बर्कशायरला अशा कंपन्यांच्या नफ्यात वाटा मिळतो, ज्यामध्ये त्यांनी पूर्ण हिस्सेदारी घेतलेली नाही परंतु निश्चितच मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. त्यांचे दीर्घकालीन गुंतवणूक रेकॉर्ड खूपच प्रभावी राहिले आहे, ज्यामुळे त्यांचे जगभरात चाहते वाढले आहेत. दरवर्षी, हजारो लोक ओमाहा येथील एका प्रमुख्य क्रीडा क्षेत्रात त्यांच्या वार्षिक बैठकीला उपस्थित राहतात, जिथे बफेट आणि मुंगेर शेअर बाजारापासून ते क्रिप्टोकरन्सी आणि जीवनातील अनुभवांपर्यंतच्या विषयांवर उघडपणे चर्चा करतात. या घटनेला ‘भांडवलदारांसाठी वुडलँड’ असे म्हणतात.

बफेट आणि चार्ली मुंगर यांच्या नेतृत्वाखाली, बर्कशायर हॅथवे एका संघर्षशील कापड कंपनीपासून 1.11 ट्रिलियन डॉलर्सच्या समूहात रूपांतरित झाले आहे. इतकेच नाही तर, कंपनीकडे आता 347.7 अब्ज डॉलरचा विक्रमी रोख राखीव निधी आहे. याशिवाय, बफेट यांचे वार्षिक पत्र जगभरातील गुंतवणूकदारांवर खूप प्रभाव पाडत आहे कारण ते त्यात गुंतवणूक करण्यासोबतच जीवनाचे धडेही शिकवतात. वॉरेन बफेट म्हणतात, ‘जेव्हा इतर लोभी असतात तेव्हा घाबरा आणि जेव्हा इतर घाबरलेले असतात तेव्हा लोभी व्हा.’ काही वर्षांपूर्वीच त्यांनी लोवातील (अमेरिकेतील एक राज्य) जगातील सर्वात मोठ्या पवनऊर्जा प्रकल्पात 3.5 अब्ज डॉलर्स गुंतवण्याची घोषणा केली होती. तसेच त्यांनी आपल्या संपत्तीचा 99 टक्के हिस्सा दान करण्याची प्रतिज्ञा केली आहे. याआधीच 2006 पासून आजपर्यंत त्यांनी जवळपास 21.5 अब्ज डॉलर्सचा निधी बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशनला दान स्वरुपात दिला आहे. वॉरेन यांनी गुंतवणूक करताना नेहमी दीर्घकालीन गुंतवणुकीला प्राधान्य दिले. ते नेहमी म्हणतात, “तुम्हाला प्रतिष्ठा कमवायला 20 वर्षे लागतात आणि गमवायला फक्त 5 मिनिटे पुरेशी आहेत. तुम्ही जर ही गोष्ट लक्षात ठेवली तर तुम्ही प्रत्येक गोष्ट वेगळ्या प्रकारे कराल”, पैशाने आणि मनाने असलेल्या श्रीमंतीच्या उच्चस्थानी ते इतक्या वर्षांपासून विराजमान आहेत. त्यांचे म्हणणे आहे की स्वत:च्या मुलांना देखील इतकीच संपत्ती द्या ज्यातून ते स्वत:चे राज्य स्वत:च्या अक्कलहुषारीने, हिमतीने उभारू शकतील. तुमचा पैसा तुम्ही मरेपर्यंत वापरा आणि नंतर पैसा दान करून टाका. मुलांना जन्माआधीच, विना मेहनत श्रीमंत आणि आयतोबा बनवू नका. पैशांचे, यशाचे महत्त्व त्यांना पटवून द्या.. प्रयत्न करण्यास प्रोत्साहन द्या.. भावी पिढी स्वावलंबीच असू द्या..

बर्कशायर हाथवे या त्यांच्या कंपनीच्या मालकीच्या आणखी 63 कंपन्या आहेत. या सर्व कंपन्यांच्या मुख्यधिकाऱ्यांना ते वर्षातून फत्त एकदाच एकच पत्र लिहितात. वर्षाअखेरीपर्यंत गाठण्यासाठी उद्दिष्ट ठरवून देतात. ते वारंवार त्यांच्याशी बोलत नाहीत किंवा त्यांच्या बैठकाही घेत नाहीत. ज्या ज्या कामासाठी त्या त्या पात्रतेची माणसं नेमली, की मालकाला काळजीचं कारण उरत नाही, असे त्यांचे ठाम मत आहे. कंपनीच्या प्रत्येक सीईओसाठी त्यांनी कायमचेच दोन नियम घालून दिले होते.

नियम क्रमांक 1 : तुमच्या एकाही भागधारकाच्या एकाही पैशाचे नुकसान होता कामा नये.

नियम क्रमांक 2 : नियम क्र. 1 चे कधीही विस्मरण होता कामा नये.

निश्चित उद्दिष्ट ठेवा आणि कर्मचाऱ्यांना त्यावर लक्ष केंद्रित करू द्या !

संपूर्ण जगाचे गुंतवणूक ‘गुरु’ असलेल्या वॉरेन बफेट यांनी आपल्या अथक प्रयत्नातून अक्षरश: ‘पैशाचे झाड’ निर्माण केले. त्यांची कहाणी सगळ्यांसाठीच खूपच प्रेरणादायी निश्चितच आहे.

प्रा. डॉ. गिरीश नाईक      

Advertisement
Tags :

.