पीएसएलव्ही-सी62 च्या अपयशादरम्यान चमत्कार
स्पेनचा ‘किड’ कॅप्सूल पोहोचला अंतराळात
वृत्तसंस्था/ बेंगळूर
इस्रोचे रॉकेट पीएसएलव्ही-सी62 प्रक्षेपण सोमवारी अयशस्वी ठरले हेते. हा रॉकेट डीआरडीओकडून रणनीतिक उद्देशांसाठी विशेष स्वरुपात डिझाइन करण्यात आलेला ईओएस-एन1 (अन्वेषा) पृथ्वी अवलोकन उपग्रह आणि 15 अन्य आंतरराष्ट्रीय उपग्रहांना घेऊन रवाना झाला होता. रॉकेटचे पहिले तीन टप्पे यशस्वी राहिले, परंतु चौथ्या टप्प्यात प्रक्षेक स्वत:च्या ठरलेल्या मार्गावर भरकटला. इस्रोच्या या अयशस्वी पीएसएलव्ही-सी62 मोहिमेदरम्यान एक चमत्कार समोर आला आहे.
स्पॅनिश स्टार्टअप ऑर्बिटल पॅराडाइमचा केस्ट्रेल इनिशियल डेमोंस्ट्रेटर (किड) कॅप्सूल या अपयशानंतरही सुरक्षित राहिला आहे. उपग्रह वेगळा होणे, अत्याधिक प्रतिकूल स्थिती आणि पृथ्वीवर महत्त्वपूर्ण डाटा परत पाठविल्यावर हे शक्य झाले. हा 25 किलो वजनाचा फुटबॉलच्या आकाराचा प्रोटोटाइप तिसऱ्या टप्प्याच्या गडबडनंतर रॉकेटच्या चौथ्या टप्प्यापासून ‘सर्व अडथळ्यां’च्या विरुद्ध वेगळा झाल्याचे स्पॅनिश स्टार्टअपने सांगितले आहे.
आमचा किड कॅप्सूल पीएसएलव्ही-सी62 पासून विभक्त होत सक्रीय झाला आहे. तसेच 3 मिनिटांपेक्षा अधिक काळापर्यंत डाटा प्रसारित करत राहिला. आम्ही प्रक्षेपण पथाची पुननिर्मिती करत आहोत. आमच्याकडे अंतर्गत तापमानाची माहिती आहे. यासंबंधीचा पूर्ण अहवाल लवकरच जारी केला जाणार असल्याचे ऑर्बिटल पॅराडाइमने म्हटले आहे.
सतीश धवन अंतराळ केंद्रावरून इस्रोचे चालू वर्षातील पहिले प्रक्षेपण पीएसएलव्ही-सी62 भारतीय प्रमाणवेळेनुसार सोमवारी सकाळी 10.17 वाजता झाले. यात डीआरडीओचा रणनीतिक इमेजिंग उपग्रह ईओएस-एन (अन्वेषा) आणि कक्षेत इंधन भरण्यासाठी आयुलसॅट समवेत 15 उपग्रह तसेच मॉरीशस, नेपाळ आणि अन्य देशांचे आंतरराष्ट्रीय पेलोड सामील होते.
पीएसएलव्ही-सी62 मिशनच्या पहिल्या तीन टप्प्यांची कामगिरी पूर्णपणे सामान्य होती, त्यानंतर एक विसंगती दिसून आली आणि प्रक्षेपक स्वत:च्या निर्धारित मार्गापासून भटकल्याने मोहीम अयशस्वी ठरली. वैज्ञानिक डाटाचे विश्लेषण करत असून लवकरच अपयशाच्या अचूक कारणांची विस्तृत माहिती दिली जाणार असल्याचे इस्रोचे प्रमुख डॉ. व्ही. नारायणन यांनी सोमवारी सांगितले होते.