तेलंगणात अल्पवयीन मुलीवर बलात्कार
जमावाने पेटविले आरोपीचे घर
वृत्तसंस्था/ सिद्दीपेट
तेलंगणात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील सिद्दीपेट जिल्ह्यातील गुरवन्नपेटा गावात 7 वीच्या विद्यार्थिनीवर गावातील युवकानेच बलात्कार केला. या घटनेची माहिती पीडितेच्या कुटुंबीयांना कळताच त्यांनी आरोपीचे घर पेटवून दिले आहे. तसेच घराबाहेर उभ्या असलेल्या वाहनांना जाळले आहे. गावातील तणावाची स्थिती पाहता मोठ्या संख्येत पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
आरोपीच्या घराबाहेर मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तणाव कमी करणे आणि शांतता प्रस्थापित करण्यासाटी पोलीस अधिकारी ग्रामस्थांसोबत चर्चा करत आहेत. तर पीडित परिवार आणि स्थानिक लोक आरोपीच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी करत आहेत.
ऑगस्ट महिन्यात देखील 3 वर्षीय मुलीवर बलात्काराचा प्रकार घडला होता. या घटनेतील आरोपी हा उत्तरप्रदेशचा रहिवासी होता. तेलंगणात राहून मजुरीचे काम करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली होती.