‘कन्कशन’ झालेल्या खेळाडूस किमान 7 दिवसांचा कालावधी
मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये नवीन वाईड-बॉल नियमाची चाचणी : आयसीसीकडून घोषणा
वृत्तसंस्था/ दुबई
आयसीसीने शुक्रवारी क्रिकेटच्या सर्व स्वरुपांत नवीन खेळण्याचे नियम जाहीर केले असून त्यानुसार, डोक्यावर किंवा शरीरावर इतरत्र आदळलेल्या चेंडूमुळे मेंदूला दुखापत (कन्कशन) झालेल्या खेळाडूस किमान सात दिवसांचा कालावधी देण्यात येईल तसेच मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये नवीन वाइड-बॉल नियमाची चाचणी घेतली जाईल. याशिवाय सीमेवरील झेलाच्या बाबतीत बदल केले आहेत.
क्रिकेटच्या जागतिक प्रशासकीय संस्थेने त्यांच्या वेबसाइटवर म्हटले आहे की, 2025-2027 च्या नवीन जागतिक कसोटी स्पर्धेच्या सुरुवातीपासून नवीन खेळण्याच्या अटी लागू करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेच्या अंतर्गत 17 ते 21 जूनदरम्यान गॉल येथे श्रीलंका-बांगलादेश हा पहिला कसोटी सामना खेळविण्यात आला. दोन्ही देशांमधील आगामी मर्यादित षटकांच्या मालिकांतून एकदिवसीय आणि टी-20 साठीच्या नवीन खेळण्याच्या अटी लागू होतील. श्रीलंका आणि बांगलादेश 2 जुलैपासून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळतील आणि त्यानंतर 10 जुलैपासून तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळवण्यात येईल.
‘कन्कशन’च्या संदर्भात, आयसीसीने म्हटले आहे की, दोन बदल आहेत. संघांना आता प्रत्येक सामन्यासाठी कन्कशन रिप्लेसमेंट खेळाडूंची नियुक्ती करावी लागेल. आयसीसीने ‘कन्कशन’चे निदान झालेल्या कोणत्याही खेळाडूसाठी किमान सात दिवसांचा स्टँड-डाऊन कालावधी देखील जाहीर केला आहे. सामनादरम्यान कन्कशनचे निदान झालेल्या खेळाडूने खेळात परतण्यापूर्वी किमान सात दिवसांचा स्टँड-डाऊन कालावधी पाळला पाहिजे. खेळाडूंच्या सुरक्षिततेला आणि आरोग्याला पाठिंबा देण्यासाठी आयसीसी वैद्यकीय सल्लागार समितीने हा बदल करण्याची शिफारस केली आहे, असे आयसीसीने म्हटले आहे.
आयसीसीने म्हटले आहे की, ऑक्टोबर, 2025 पासून सहा महिन्यांच्या कालावधीसाठी पूर्ण सदस्यांकडून दोन नवीन नियमांची चाचणी घेतली जाईल. त्यात एकदिवसीय आणि टी-20 साठी एक नवीन वाइड-बॉल नियम समाविष्ट आहे. चेंडू टाकण्याच्या आधी किंवा दरम्यान फलंदाज हालचाल करताना दिसल्यास गोलंदाजाला काही प्रमाणात दिलासा देण्यासाठी हा नियम आणला जात आहे. त्यानुसार चेंडू टाकण्याच्या वेळी फलंदाजाच्या पायांची स्थिती, जरी फलंदाज नंतर ऑफ साईडला गेला, तरीही आता वाइडसाठी संदर्भ बिंदू म्हणून वापरली जाईल, असे आयसीसीने म्हटले आहे.
‘चाचणीत लेग स्टंप आणि संरक्षित क्षेत्राच्या मार्करमधील पॉपिंग क्रीजमधून जाणारा चेंडू वाइड म्हणता येणार नाही. यामध्ये मदत करण्यासाठी संरक्षित क्षेत्र मार्कर लाइन पॉपिंग क्रीजपर्यंत वाढवली जाईल आणि पंचांसाठी ती मार्गदर्शक ठरेल, असेही आयसीसीने स्पष्ट केले आहे. चेंडू पॉपिंग क्रीजवर पोहोचताना फलंदाजाच्या पायांच्या मागून आणि रेषेच्या बाहेर जाणारी कोणतीही ‘लेग साईड डिलिव्हरी’ अजूनही वाईड म्हणता येईल, असे आयसीसीने म्हटले आहे.