For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वीस मिनिटांमध्ये कोट्याधीश...

06:56 AM Jan 11, 2026 IST | Tarun Bharat Portal
वीस मिनिटांमध्ये कोट्याधीश
Advertisement

भाग्यवंतांची संख्या जगात पुष्कळ आहे. भाग्य फळफळण्यासाठी काही क्षण पुरेसे असतात. तथापि, ते योग्य प्रकारे साधण्याचे कौशल्य मात्र दाखवावे लागते. असाच एक प्रसंग एका ‘ट्रेडर’च्या (समभागांची खरेदी-विक्री करणारा) संदर्भात घडला आहे. सध्या शेअरबाजारातील सर्व व्यवहार डिमॅट अकाऊंटच्या माध्यमातून केले जातात. डिमॅट अकाऊंट असणाऱ्या प्रत्येकाला ट्रेडिंग करण्याची एक मर्यादा दिलेली असते. या ट्रेडरच्या संदर्भात असे घडले होते, की या ट्रेडरशी संबंधित वित्त कंपनीच्या सॉफ्टवेअरमध्ये एक तांत्रिक चूक झाली आणि या ट्रेडरची मर्यादा 40 कोटी रुपयांपर्यंत वाढली. या ट्रेडरने झटपट या संधीचा लाभ उठविला आणि अवघ्या 20 मिनिटांमध्ये समभाग व्यवहार करुन 1 कोटी 75 लाख रुपयांचा नफा कमावला. काही वेळाने या वित्त कंपनीच्या लक्षात तिची  चूक आली.

Advertisement

या कंपनीने मग या ट्रेडरच्या खात्यातील सर्व रक्कम काढून घेतली. त्यात नफ्याची रक्कमही होती. तसेच, त्याला केवळ 50 लाख रुपये घेऊन गप्प बसण्याची सूचना केली.  या ट्रेडरने नफ्याची रक्कम कंपनीकडे परत मागितली. पण ती देण्यास कंपनीने नकार दिल्याने त्याने कंपनीविरोधात न्यायालयात दाद मागितली. या ट्रेडरच्या खात्यात चुकीने 40 कोटी जमा झाले होते, त्यामुळे ते आमचे पैसे आहेत आणि त्या पैशांवर ट्रेडरने मिळविलेला नफाही आमचाच आहे, असा युक्तीवाद कंपनीने केला. तथापि, केवळ पैसे खात्यात आल्याने नफा होतोच असे नाही. समजा, जर तोटा आला असता, तर कंपनीने तो या ट्रेडरकडूनच वसूल केला असता. त्यामुळे कंपनीचा अधिकार 40 कोटी रुपयांवर आहे. पण त्यावर मिळविलेल्या नफ्यावर नाही, असा युक्तीवाद ट्रेडरकडून करण्यात आला. तो मान्य करुन न्यायालयाने ट्रेडरच्या बाजूने निर्णय दिला आहे. तसेच कंपनीला संपूण नफा 12 टक्के व्याजासह ट्रेडरला द्यावा, असा आदेश दिला आहे. मूळ चूक कंपनीचीच असल्याने कंपनी या चुकीसाठी ट्रेडरला उत्तरदायी ठरवू शकत नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. ही घटना 2022 मधली आहे. तेव्हापासून न्यायालयाच्या निर्णय येण्याच्या काळापर्यंतचे व्याजही आता कंपनीला द्यावे लागणार आहे. त्यामुळे हा ट्रेडर खऱ्या अर्थाने भाग्यवान ठरला, असे निश्चित म्हणता येते.

Advertisement
Advertisement
Tags :

.