प्रतिवर्षी एक लाख कोटी सायबर हल्ले!
तज्ञांचा इशारा, भारताने सावध होण्याची आवश्यकता : सुरक्षिततेचे उपाय आवश्यक
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतावर होणाऱ्या ‘सायबर हल्ल्यां’चे प्रमाण चिंताजनक पद्धतीने वाढत आहे. ते रोखण्यासाठी वेळीच उपाययोजना केली नाही तर 2033 पर्यंत प्रतिवर्षी 1 लाख कोटी सायबर हल्ल्यांना तोंड द्यावे लागेल, असा इशारा तज्ञांनी दिला आहे. तसेच भारतीय स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षापर्यंत या हल्ल्यांची संख्या प्रतिवर्ष 17 लाख कोटीपर्यंत वाढण्याचा धोका आहे, असेही या क्षेत्रातील तज्ञांनी स्पष्ट केले.
भारतात डेजिटायझेशन अतिशय वेगाने वाढत आहे. तितक्याच प्रमाणात सायबर हल्ल्यांचा धोकाही वाढत आहे. त्यामुळे या हल्ल्यांपासून आपली संगणकीय प्रणाली आणि डाटा सुरक्षित ठेवण्यासाठी प्रभावी उपाय शोधण्याची आवश्यकता आहे. सध्या यावर युद्धपातळीवर काम केले जात आहे. पण या कामाचा वेग वाढविण्याची आवश्यकता भविष्यकाळात भासणार आहे, असे तज्ञांचे म्हणणे आहे.
2023 मध्ये 8 कोटी हल्ले
2023 या वर्षात भारतावर जवळपास आठ कोटी (7.9 कोटी) सायबर हल्ले झाले आहेत. 2022 पेक्षा हे प्रमाण 15 टक्के अधिक होते. याच वेगाने सायबर हल्ल्यांमध्ये वाढ होत राहिल्यास येत्या 10 वर्षांमध्ये हे प्रमाण वर्षाला 1 लाख कोटी इतके होणार आहे. तर स्वतंत्र भारताच्या शताब्दी वर्षात, अर्थात 2047 पर्यंत हेच प्रमाण प्रतिवर्ष 17 लाख कोटी इतके होणार आहे. या हल्ल्यांपासून वाचण्याची योजना त्वरित क्रियान्वयित झाली नाही, तर संगणकीय प्रणाली कोलमडू शकते. त्यामुळे सावधानता आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
सर्व उद्योगक्षेत्रांना इशारा
भारतात आता सर्व उद्योग क्षेत्रांमध्ये संगणकीय प्रणालीचा उपयोग वाढला आहे. अनेक उद्योगक्षेत्रे हिशेबापासून संपर्कापर्यंत सर्व व्यवहारांसाठी संगणकावर अवलंबून आहेत. वित्तीय क्षेत्रात तर अतिशय वेगाने डिजिटलायझेशन होत आहे. त्यामुळे या सर्व क्षेत्रांना आपली संगणकीय यंत्रणा आणि संगणकांमध्ये साठविलेली माहिती, विदा किंवा डाटा सुरक्षित ठेवण्यासाठी सायबर हल्ल्यांपासून वाचविणारी चोख यंत्रणा स्थापित करण्याची आवश्यकता असल्याचे दिसून येत आहे.
भारताचे प्रयत्न
भारतात सध्या सायबर सुरक्षेची स्थिती समाधानकारक असल्याचे पहावयास मिळते. तथापि, सायबर हल्ल्यांचे प्रमाण ज्या वेगाने वाढत आहे, त्या तुलनेत ही सुरक्षा यंत्रणा पुरेशी आहे काय, हा प्रश्न आहे. अनेक तज्ञांच्या मते भारताला सायबर सुरक्षा क्षेत्रात अधिक वेगाने आणि अधिक प्रभावशाली पद्धतीने काम करण्याची आवश्यकता आहे. लोकांनीही संगणकीय प्रणालींचा उपयोग करताना सावधानता बाळगावी असे प्रतिपादन या क्षेत्रातील मान्यवर तज्ञांनी केले आहे.
दोन प्रकारांचे सायबर हल्ले
सायबर हल्ल्याचे दोन प्रकार प्रामुख्याने आहेत. प्रथम प्रकारात संगणकीय यंत्रणेतील दोष किंवा त्रुटी शोधून त्यांचा सायबर गुन्हेगारांकडून त्यांचा गैरफायदा उठविला जातो आणि नागरीकांच्या बँकांमधील पैसे लाटले जातात. अनेक नागरीकांच्या अज्ञानाचा आणि बेसावधपणाचा लाभही हे गुन्हेगार उठवितात. दुसऱ्या प्रकार अधिक धोकादायक आहे. या प्रकारचे सायबर हल्ले लोकांच्या मनात दहशतवाद आणि धर्मांधता रुजविण्यासाठी, त्यांना दहशतवादी कृती करण्यास प्रवृत्त करण्यासाठी तसेच त्यांचे ‘ब्रेनवॉश’ करण्यासाठी केले जातात. यासाठी नागरीकांचे ब्लॅकमेल केले जाते. त्यांना भेडसावले जाते किंवा धमक्या दिल्या जातात.
बेटिंग आणि गेमिंग अॅप्स
बेकायदेशीर बेटिंग किंवा गेमिंग अॅप्सचा उपयोग नागरीकांना फसविण्यासाठी केला जातो. गेमिंग अॅप्सचा उपयोग मनी लाँडरिंग साठी केला गेल्याची अनेक उदारहणे घडलेली आहे. गेमिंग अॅप्सच्या नादी लागून एका रात्री 25 लाख रुपये ते कित्येक कोटी रुपये गमावल्याची उदाहरणे घडली आहेत. पैशाचे ऑन लाईन व्यवहार अतिशय वेगाने होत असल्याने या संदर्भांमध्ये अनभिज्ञ किंवा अज्ञानी असणाऱ्या लोकांना सावरण्यासाठी वेळही मिळत नाही. त्यामुळे पैशाची ऑन लाईन फसवणूक कशी चालते, याची माहिती प्रत्येकाने करुन घेणे आवश्यक आहे. तसेच सावधगिरीच्या उपायांसंबंधी प्रबोधन होण्याची आवश्यकता तज्ञ स्पष्ट करतात.
सर्वसामान्यांचे प्रबोधन आवश्यक
ड सायबर हल्ल्यांपासून वाचण्यासाठी यंत्रणेचा भक्कमपणा आवश्यक
ड सर्वसामान्यांनी सायबर गुन्हे पद्धतीची माहिती करुन घेणे आवश्यक
ड डिजिटायझेशच्या वाढत्या वेगासमवेत प्रभावी सुरक्षा यंत्रणाही आवश्यक