जागा वाटपाचा घोळ
महाराष्ट्रात महायुती आणि महाआघाडी या दोन्ही तंबूत जागावाटप या विषयावरुन धुमशान सुरु आहे. लहान भाऊ, मोठा भाऊ, सर्वे आणि चेहरा असे वेगवेगळे नियम सांगत आतल्या आत रेटारेटी सुरु आहे. या सर्वाचा भाजपाला आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला फटका बसण्याची शक्यता दिसते आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षात घुसमट सुरु आहे. मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे आणि अजितदादा यांच्या चाली आणि शरद पवार गेम खेळत असले तरी हे पद पदरात पाडून घ्यायचेच असा काँग्रेसचा मनसुबा आहे आणि या शर्यतीत काँग्रेसकडून डॉ. विश्वजीत कदम यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. शिक्षकदिनी पाच सप्टेंबरला कडेगांव येथे दिवंगत नेते डॉक्टर पतंगराव कदम यांच्या स्मारकाचे उदघाटन कॉंग्रेस नेते राहुल गांधी करणार आहेत. यावेळी शरद पवार आणि महाआघाडीच्या घटक पक्षांचे नेते हजर राहणार आहेत. हे महाआघाडीचे आणि कॉंग्रेसचे शक्ती प्रदर्शन असणार आहे. या मेळाव्यात कॉंग्रेसला आपला अंदाज येईलच पण महाआघाडीला आपला मोठा भाऊ आणि चेहरा लक्षात येईल असा सांगली पॅटर्न राबवला जात आहे. या मेळाव्याला झाडून सारे कॉंग्रेस नेते हजर राहणार आहेत. आणि या मेळाव्यातून शक्ती घेऊन सत्ताप्राप्तीचा मार्ग रुंदावला जाणार हे स्पष्ट आहे. महाआघाडीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा उद्धव ठाकरे ठरवा. शिवसेनेला जागावाटपात मोठा वाटा मिळावा यासाठी शिवसेना ठाकरे गट आग्रही आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रवत्ते संजय राऊत ठाकरे शिवाय महाराष्ट्राला पसंत पडेल असा दुसरा चेहरा आहेच कोण? असे विचारत चेहरा जाहीर करा अशी मागणी करत आहेत. राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना दिल्ली दरबारी नेऊन कॉंग्रेस नेत्यांना भेटवले पण कॉंगेसने शुन्य प्रतिसाद दिला. महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उद्धव ठाकरे यांच्या चुका वेळोवेळी त्यांच्या पदरात घातल्या आहेतच पण ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा घाईघाईने राजीनामा दिला यांचाही त्यांना राग आहे. पृथ्वीराज चव्हाणांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाला त्यांची जागा दाखवत तुम्ही महाआघाडीत तिसऱ्या स्थानी आहात असं जाहीरपणे सांगितले आहे. कॉंग्रेसने अंतर्गत महाराष्ट्राचा सर्वे करुन घेतला त्यामध्ये कॉंगेसला 100 जागा, राष्ट्रवादी शरद पवार गटाला 60 जागा आणि ठाकरे यांना 30-35 जागी विजय दाखवला आहे. थोडक्यात महाआघाडीत शिवसेनेचा अंकुश हटला आहे. ठाकरे यांना कॉंग्रेसने आरसा दाखवल्याने त्याची अवस्था सांगता येत नाही, सहन होत नाही अशी झाली आहे. शिवसेना फुटली आणि पन्नास आमदार एकनाथ शिंदे सोबत गेले पण ठाकरे यांनी महाराष्ट्र पिंजून गेलेल्या आमदारांच्या मतदारसंघात पर्याय उभे केले नाहीत. उलट शरद पवार यांनी या वयातही पक्षाची नव्याने मांडणी करत युवकांची फळी उभी केली. समरजीतसिंग घाडगे, हर्षवर्धन पाटील ही पुढे आलेली नावे पण भाजपाचे 24 आमदार शरद पवारांची तुतारी वाजवणार असे बोलले जाते आहे. शरद पवार यांनी आमचा पक्ष तूर्त मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही. भाजपला हटवणे हाच मुख्य कार्यक्रम आहे. नंतर बघू मुख्यमंत्री कोण? असं म्हणत ठाकरे यांना एकाकी पाडले आहे. ठाकरेना अंधारात ठेऊन शरद पवार यांनी दोनवेळा घेतलेली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट पडद्यामागे काही तरी शिजते आहे हे सांगणारी आहे. ओघानेच एकीकडे शिवसेना ठाकरे गट आणि दुसरीकडे भाजप अडचणीत दिसतो आहे. एकनाथ शिंदे हे आपला गट घट्ट धरून आहेत. शंभर जागांची त्यांची मागणी आहे. गेल्या भावात त्यांना सत्तर जागा तरी मिळतील अजितदादानाही 80 जागा हव्या आहेत त्यांना सोबत आलेल्या आमदारांना पन्नास जागा आणि कॉंग्रेसचे दोन आमदार त्यांच्यासोबत आहेत त्यांच्यासाठी जागा द्यावी लागेल. अजितदादाना सोबत घेतले म्हणून समरजीतसिंग घाडगे आणि हर्षवर्धन पाटील भाजप सोडत आहेत, असे 24 आमदार आहेत. भाजपाचे 105 आमदार आहेत आणि गेल्यावेळी भाजपाने महायुतीतून 160 जागा लढवल्या होत्या. यावेळी भाजपला जागा मिळतील पण जिंकून येतील अशा जागा कमी मिळतील असे दिसते. अजित पवार यांना महायुतीत घेतल्याचा तो फटका बसणार आहे. कॉंग्रेसने केलेल्या सर्वेक्षणात महायुतीत भाजपला 80 जागा, एकनाथ शिंदे यांना 30 जागा आणि अजितदादा यांना आठ जागा दाखवण्यात आल्या आहेत.
महायुतीला लाडकी बहीण योजना गेम चेंजिंग पॉइंट ठरेल असे वाटते, शेतकरी विद्युत बील माफी व मोफत वीज या निर्णयामुळे महायुतीला सहानुभूती मिळेल, भरभरून मते मिळतील असा कयास आहे. पण मालवणमधील पुतळा आणि बदलापूरमधील संतापजनक घटना यामुळे ही सहानुभूती कोसो मैल दूर गेली आहे. मराठा आरक्षण प्रश्न आणि जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा आणि भाजपचा पाय ठेचायचा बांधलेला चंग यामुळे भाजप अडचणीत दिसते आहे. वंचीतचे प्रकाश आंबेडकर तिसऱ्या आघाडीच्या प्रयत्नात आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वतंत्र लढणार आहे. गणेशोत्सव झाला की पक्ष पंधरवडा असतो. त्यामुळे त्याआधी किंवा नंतर लगेचच जागावाटप तिकीट वाटप जाहीर होईल. तिकीट वाटप होताच तूल्यबळ इच्छुक इकडे तिकडे उड्या मारतील. घरवापसी, मेगाभरती अशी त्याला नावे दिली जातील पण कॉंग्रेसने आणि शरद पवार यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही आपला गट आणि जोर कायम ठेऊन आहेत. भाजप आणि उद्धव ठाकरे यांना अडचणी दिसत आहेत. प्रत्येक मतदारसंघात इच्छुक संख्या मोठी आहे. काही मंडळी विजयासाठी उभी आहेत तर काही मंडळी कुणालातरी पाडण्यासाठी, मते खाण्यासाठी दंड थोपटू लागली आहेत. मतदार राजाच्या मनात काय आहे हे कळेना झाले आहे. तूर्त जागावाटपाचा घोळ सुरु आहे आणि कॉंग्रेसचे युवराज सांगली कडेगावातून दंड थोपटून महाराष्ट्र जिंकायला सरसावत आहेत.