हुतात्मा बाळा मापारींचे स्मारक उभारणार
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची घोषणा : हुतात्मा बाळा मापारी यांना अभिवादन
वार्ताहर/रेवोडा
गोवा मुक्तीलढ्यात अवघ्या 26 साव्या वर्षी पोर्तुगीजांकडून हौतात्म्य पत्करलेले बाळा राया मापारी यांचे बलिदान भावी पिढीला प्रेरणादायी ठरावे आणि त्यांचे स्मरण चिरंतन रहावे यासाठी शिवोली येथे त्यांचे स्मारक उभारणार असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जाहीर केले. हुतात्मा बाळा मापारी यांच्या सत्तराव्या बलिदानदिनी काल मंगळवारी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अस्नोडा येथील त्यांच्या स्मारकावर पुष्पचक्र वाहुन त्यांना आदरांजली अर्पण केली. यावेळी त्यांच्या समवेत जलसिंचनमंत्री सुभाष शिरोडकर, पशुसंवर्धनमंत्री नीळकंठ हळर्णकर, हुतात्मा बाळा मापारी यांच्या कन्या लक्ष्मी आगरवाडेकर, शिरसई जिल्हा पंचायत सदस्य दीक्षा कांदोळकर, भंडारी समाज अध्यक्ष देवानंद नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांबद्दल नाराजी
यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांबद्दल नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की काही स्वातंत्र्यसैनिकांच्या घरात तीन ती सरकारी नोकऱ्या देण्यात आलेल्या आहेत. मात्र अशी मुले भारतीय स्वातंत्र्यदिन, गोवा मुक्तिदिन, प्रजासत्ताक दिन, गोवा क्रांतिदिन किंवा अन्य सोहळ्यामध्ये सहभागी होत नाही, एवढेही सौजन्य त्यांनी का दाखवू नये? हे वागणे बरोबर नाही, असेही ते म्हणाले. जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर, पशुसंवर्धनमंत्री नीळकंठ हळर्णकर यांनीही मापारी यांच्या स्मृतीला अभिवादन केले. यावेळी बोलताना मंत्री सुभाष शिरोडकर यांनी स्वातंत्र्यलढ्यात हौतात्म्य पत्करलेलल्या स्वातंत्र्यसेनानींच्या बलिदानाचा इतिहास जागृत ठेवण्याची गरज असल्याचे सांगितले. मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. जिल्हा पंचायत सदस्या दिक्षा कांदोळकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. अस्नोडा पंचायतीचे सरपंच चोडणकर यांनी आभार मानले.