For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पोर्तुगीजांनी पाडलेल्या मंदिरांचे दिवाडीत स्मारक

01:17 PM May 12, 2026 IST | Tarun Bharat Portal
पोर्तुगीजांनी पाडलेल्या मंदिरांचे दिवाडीत स्मारक
Advertisement

मुख्यमंत्री सावंत यांची घोषणा : जुने गोवेत ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ साजरे

Advertisement

तिसवाडी : पोर्तुगीजांनी गोव्यातील एक हजार मंदिरे पाडली आणि भारतीय सनातन संस्कृतीवर घाला घालण्याचा प्रयत्न केला. आजच्या काळामध्ये या सर्व मंदिरांचे स्मरण म्हणून दिवाडी येथे कोटी तीर्थ या ठिकाणी या सर्व मंदिरांचे मिळून एक मंदिर उभारण्याचे काम लवकरच सुरू केले जाईल, असे निवेदन करून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, भारतीय सनातन संस्कृती व धर्म हा नव्या ‘जेन जी’ पर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. सरकार सनातन संस्कृती रक्षक तयार करण्यासाठी मदत करणार आहे.

भारतीय सनातन संस्कृतीचे संवर्धन करणे आवश्यक असून त्यासाठी नव्या युवा पिढीला तयार केले जाईल. या कामी गोवा सरकार पुढाकार घेईल, असे मुख्यमंत्री पुढे म्हणाले. जुने गोवे येथे काल सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, आमदार राजेश फळदेसाई, कला व संस्कृती संचालक विवेक नाईक, सरपंच मेधा मेघश्याम पर्वतकर उपस्थित होते.

Advertisement

गोमंतकीय संस्कृतीचे संवर्धन

मुख्यमंत्री म्हणाले की, पोर्तुगीज काळात गोव्यातील अनेक मंदिरे नष्ट करण्यात आली आणि अनेक गोमंतकीय कुटुंबांना स्थलांतर करावे लागले. अनेकांनी आपल्या कुलदैवतांच्या मूर्ती सुरक्षित ठेवण्यासाठी राज्याबाहेर आश्रय घेतला. त्या इतिहासाची आठवण पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावी आणि गोमंतकीय संस्कृतीचे संवर्धन व्हावे, हा या प्रकल्पामागील उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

 ऐतिहासिक वारशाचे प्रतीक

दिवाडी बेटावर उभारण्यात येणारे मंदिर संकुल हे केवळ धार्मिक स्थळ नसून सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचे प्रतीक असेल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. येथे गोव्याच्या परंपरा, कला, इतिहास आणि धार्मिक वारसा यांचे दर्शन घडवणारे विविध उपक्रम राबवले जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. या कार्यक्रमाला विविध सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गोव्यात धार्मिक पर्यटनाला प्रोत्साहन

सध्या गोव्यात मंदिर पर्यटनाला मोठी चालना मिळत आहे. देशभरातून तसेच परदेशातून येणारे पर्यटक गोव्याच्या मंदिरांनाही भेट देत असून यामुळे राज्याच्या सांस्कृतिक पर्यटनात वाढ होत आहे. सरकारकडून धार्मिक पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

 देशभरात मंदिरांचे पुनरुज्जीवन कार्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशभरात धार्मिक स्थळांचे जतन आणि पुनऊज्जीवनाचे काम सुरू आहे. गुजरातमधील सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणी म्हणजे देशाच्या गौरवशाली सामर्थ्याचे प्रतीक आहे. गोमंतकीयांसह देशवासियांनी सांस्कृतिक अभिमान जपण्याची गरज आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.