गोलकीपर श्रीजेशला संस्मरणीय निरोप
भारतीय हॉकी संघाचा गोलरक्षक श्रीजेश पीआर (परत्तु रविंद्रन) याने पॅरिस ऑलिम्पिकमधील कांस्यपदक सामन्यानंतर आपल्या कारकिर्दीची यशस्वी सांगता केली. भारतीय हॉकी संघाच्या टोकीयो ऑलिम्पिक स्पर्धेतील कामगिरीसोबतच याआधीच्या सामन्यांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या श्रीजेशने भारताला यंदाच्या पॅरिस
ऑलिम्पिक स्पर्धेतही कांस्य पदक मिळवून देत लाखो चाहत्यांना अमूल्य अशी भेट दिली.
ग्रेट ब्रिटनसोबत झालेल्या सामन्यामध्ये एक-एक अशी बरोबरी झाली असताना शूटआऊटमध्ये भारताने ग्रेट ब्रिटनला 4-2 फरकाने हरवत उपांत्य फेरीचा रस्ता पकडला होता. हा महत्त्वाचा सामना खऱ्या अर्थाने जिंकून दिला तो भारताचा वॉल म्हणून बिरुदावली प्राप्त केलेला पीआर श्रीजेश याने. त्याच्या कामगिरीचे देशभरामध्ये कौतुक करण्यात आले. स्वत:ला झोकून देत तगड्या ब्रिटन संघाचे गोल थोपविण्याचे महत्त्वाचे काम त्याने केले. गुरुवारी भारताने स्पेनला 2-1 गोलफरकाने हरवत कांस्यपदकावर हक्क प्राप्त केला.
या शानदार विजयाने गोलकीपर श्रीजेश याच्या कारकिर्दीचाही अत्यंत यशस्वी आणि खऱ्या अर्थाने संस्मरणीय असाच समारोप झाला. त्याच्यासाठी हा विजय आयुष्यभरासाठी प्रेरणादायी राहणार आहे, हे वेगळे सांगायला नको. या ऑलिम्पिक स्पर्धेत गोलकीपर श्रीजेश हा भक्कम भिंतीच्या स्वरुपामध्ये उभ राहिला होता. त्यामुळे भारताच्या कांस्यपदकापर्यंतच्या वाटचालीमध्ये त्याच्या कामगिरीकडे दुर्लक्ष करता येत नाही. सामना झाल्यानंतर संघातील सदस्यांनी त्याचा यथोचित सन्मान केला.
त्या सामन्यानंतर हळवा झालेल्या श्रीजेशने बोलताना, आपण योग्य वेळी निवृत्तीचा निर्णय घेतलेला आहे. ऑलिम्पिक स्पर्धांना अलविदा म्हणण्यासाठी ही योग्य वेळ असल्याचे त्याने म्हटले. आपण एका पदकासोबत घरी जात आहोत यासारखा दुसरा आनंद नाही, अशीही भावना त्याने व्यक्त केली. लोकांच्या भावनांचा मी आदर करतो आणि मलाही माहिती आहे की काही वेळा काही निर्णय खरोखरच कठीण असतात. परंतु योग्य वेळ आली असता घेतलेले निर्णय हे कैकपटीने चांगले ठरत असतात आणि तसेच काहीसे माझ्याबाबतीत झालेले आहे, असेही तो म्हणून गेला. टोकियोत मिळालेल्या पदकाची जागा माझ्या हृदयात खास आहे. यातून आम्हाला आत्मविश्वास अधिक मिळाला आणि यानेच या खेपेलाही पदक प्राप्त करता आले.
श्रीजेशच्या जवळपास 18 वर्षाच्या
हॉकी कारकिर्दीचा समारोप ऑलिम्पिक स्पर्धेच्या माध्यमातून संस्मरणीय असाच झालेला आहे, यात वाद नाही. 8 मे 1988 ला किजाक्कंबलम या केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्यामध्ये त्याचा जन्म झाला. शेतकरी घराण्यात जन्मलेल्या श्रीजेश लहान वयात असताना लांबउडी व व्हॉलीबॉल सारख्या खेळात भाग घेत असे. वयाच्या 12 व्या वर्षी तिरुवनंतपूरम येथील जिवीराजा स्पोर्ट्स स्कूलमध्ये त्याने प्रवेश मिळविला. या ठिकाणीच त्याच्या कारकिर्दीला खऱ्या अर्थाने योग्य ती दिशा मिळाली. तेथील प्रशिक्षकांनी श्रीजेशला गोलकीपिंग करण्याचा सल्ला दिला. यातूनच त्याची गोलकीपरची कारकिर्द भविष्यात फुलून आली. नंतर पदवी प्राप्त केल्यानंतर 2004 मध्ये कनिष्ठ राष्ट्रीय संघामध्ये पदार्पण केले आणि ऑस्ट्रेलिया बरोबरचा सामना खेळला. त्यानंतर 2006 मध्ये वरिष्ठ राष्ट्रीय संघामध्ये त्याने पदार्पण केले. यानंतर याचा प्रवास भारतीय हॉकी संघासाठी खूपच लकी ठरला. 2008 ची कनिष्ठ आशिया चषकाच्या विजयामध्ये उत्कृष्ट गोलकीपरचा पुरस्कार त्याने प्राप्त केला. 2014 च्या दक्षिण कोरियातील आशियाई स्पर्धेतही भारताला सुवर्णपदक मिळाले. यामध्येसुद्धा श्रीजेशने पाकिस्तान विरुद्धच्या अंतिम सामन्यात 2 गोल उत्तमपणे थोपविले होते. 2016 मध्ये त्याच्याकडे भारतीय संघाच्या कप्तानपदाची जबाबदारी सोपवली गेली. 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये श्रीजेशच्या नेतृत्वाखाली संघाला उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारता आली. यानंतर त्याची चमक पुन्हा एकदा 2021 च्या टोकियो
ऑलिम्पिकमध्ये पहायला मिळाली. हॉकीतील बलाढ्या जर्मनीला हरवत संघाला कांस्यपदक मिळविण्यात त्याचा वाटा लक्षणीय ठरला. केरळात तो सर्वांचाच आयकॉन ठरला. आयएम विजयन किंवा अंजू बॉबी जॉर्ज यांच्यानंतर क्रीडा प्रकारात कारकिर्द गाजविणारा श्रीजेश संपूर्ण भारतामध्ये ओळखला गेला ते त्याच्या दैदिप्यमान कामगिरीमुळे. तो नुसता भारतातच लोकप्रिय झाला नाही तर संपूर्ण जगाचेच लक्ष त्याने आपल्या कामगिरीमुळे वेधून घेतले.
श्रीजेशने माजी अॅथलिट अनिषा हिच्याशी लग्न केले असून त्या आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. त्याला एक मुलगी आणि एक मुलगा आहे. गोलकीपर श्रीजेशला पद्मश्री, खेलरत्न असे पुरस्कार मिळाले आहेत. त्याचप्रमाणे 2021 मध्ये जागतिक स्तरावर अॅथलिट म्हणून त्याची निवड झाली आहे. सध्याला तो केरळ सरकारच्या उच्च शिक्षण विभागात जॉइंट डायरेक्टर म्हणून सेवेत आहे. त्याचप्रमाणे रोटरी क्लबचा सदस्यही आहे. असंख्य भारतीयांना
पॅरीसमधील कांस्य पदकासाठीची भारताची कामगिरी कायमस्वरुपी लक्षात राहिल ती निव्वळ आणि निव्वळ गोलकीपर श्रीजेशमुळेच. वेल डन श्रीजेश.