गोव्यात होणार मेघा वेलनेस सेंटर
योगगुरु रामदेवबाबा यांची घोषणा
प्रतिनिधी/ पणजी
पतंजलीकडून लवकरच गोव्यात मेगा वेलनेस सेंटर उभारण्यात येणार आहे. हे केंद्र हरिद्वारनंतर देशातील द्वितीय क्रमांकाचे सर्वात मोठे केंद्र ठरणार आहे, अशी घोषणा योगगुरु बाबा रामदेव यांनी केली. या केंद्रामुळे आरोग्य आणि वेलनेस क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील. त्याचबरोबर एक वेलनेस डेस्टिनेशन म्हणूनही गोवा अधिक मजबूत होण्याची अपेक्षा आहे.
शनिवारी पणजीत योग सेतू परिसरात आयोजित योग सत्रानंतर श्री रामदेवबाबा पत्रकारांशी बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी गोवा ही आध्यात्मिक परंपरा असलेली भूमी असून तिचे पावित्र्य जपले पाहिजे, असे सांगितले. त्याचबरोबर ‘गोरक्षण ही सामूहिक जबाबदारी आहे. मात्र केवळ चर्चासत्रे आयोजित करून किंवा घोषणा देऊन ते साध्य करता येणार नाही, त्यासाठी प्रत्यक्ष कृती पाहिजे, शंकराचार्य यांच्यासारख्या ज्येष्ठ हिंदू धार्मिक नेते, संत, ऋषी यांनी गोरक्षण ही वैयक्तिक जबाबदारी मानून गायी दत्तक घ्याव्यात व त्यांचे संगोपन करावे. त्याद्वारे इतरांसाठी आदर्श घालून द्यावा, असे रामदेवबाबा यांनी सांगितले. त्याचबरोबर प्रत्येक हिंदूनेही किमान एक गाय पाळली पाहिजे, असेही ते म्हणाले. पतंजलीच्या विस्तार योजनांविषयी बोलताना त्यांनी, हरिद्वारनंतर लवकरच गोव्यात पतंजलीचे सर्वात मोठे वेलनेस सेंटर उभारले जाईल, अशी घोषणा त्यांनी केली.