'देवरहाटी'च्या मुक्ततेसाठी लवकरच मंत्रालयात बैठक
चिपळूण :
देवस्थानांच्या देवरहाटीच्या जमिनी शासनाच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी महसूल व वनविभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर मंदिर महासंघ प्रतिनिधींच्या सहभागाने मंत्रालयात लवकरच बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन गृह आणि महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी जिल्हा मंदिर महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना दिले.
शासनाने कोणत्याही प्रकारे देवस्थानांशी चर्चा न करता जिल्ह्यातील देवस्थानांच्या देवरहाटीच्या जमिनीवर ताबा घेतल्याने जिल्ह्यात सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. या अनुषंगाने जिल्ह्यात दापोली व चिपळूण येथे देवस्थानाच्या प्रतिनिधींच्या सहभागाने घंटानाद आंदोलनाच्या माध्यमातून आपला असंतोष व्यक्त केला आहे. याविषयी महाराष्ट्र मंदिर महासंघाने देवस्थान विश्वस्तांना घेऊन जिल्ह्यातील मंत्री व आमदार यांनाही निवेदन दिले. या संदर्भात राज्यमंत्री कदम यांना निवेदन दिल्यानंतर त्यांनी विषयाचे गांभीर्य ओळखून ही समस्या सोडवण्यासाठी महसूल व वनविभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या प्रतिनिधींना घेऊन लवकरच मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात येईल, असे आश्वासन दिले. तसेच चिपळूण-संगमेश्वर विधानसभा क्षेत्राचे आमदार शेखर निकम यांनी या समस्येवर चालू अधिवेशनात आवाज उठवणार, असे आश्वासन दिले. यावेळी महाराष्ट्र मंदिर महासंघाचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य लक्ष्मण गुरव, दापोली तालुका संयोजक सुरेश रेवाळे, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सुनंदन भावे, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे जिल्हा सहसंयोजक चंद्रकांत कदम, जिल्हा संघटक सुरेश शिंदे, चिपळूण तालुका संयोजक महेश पोंक्षे, उमेश गुरव उपस्थित होते.