गुडघेदुखी बरे करणारे औषध...
वृद्धापकाळात बहुतेकांना गुडघेदुखीच्या विकार जडतो आणि चालता येणे कठीण जाते, ही वस्तुस्थिती आहे. गुडघ्यामधला मगज किंवा कार्टिलेज वयपरत्वे झिजते आणि त्यामुळे हाडे एकमेकांवर घासून चालताना किंवा गुडघ्यांची हालचाल केल्यानंतर वेदना होतात. कित्येकांच्या या वेदना सहनशक्तीच्या पलिकडल्या असतात. या विकारावर सध्या सर्वात प्रभावी उपाय म्हणजे गुडघ्याची शस्त्रक्रिया (नी रिप्लेसमेंट सर्जरी) हाच आहे. कारण हा विकार औषधाने बरा होत नाही. पण ही शस्त्रक्रिया महागडी असल्याने सर्वसामान्यांना परवडेलच असे नाही. पण आता या विकारावर एक औषध शोधून काढल्याचे प्रतिपादन करण्यात आले आहे.
स्टॅनफर्ड मेडिसिनमधील संशोधकांनी हे औषध शोधले आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. या औषधामुळे झिजलेल्या कार्टिलेजची पुन्हा वाढ होऊन ते पूर्ववत् बनते आणि गुडघे कोणत्याही शस्त्रक्रियेविना नैसर्गिकरित्या पूर्ण बरे होऊन नेहमीप्रमाणे काम करु लागतात. हे औषध कसे काम करते, यासंबंधीही सांगण्यात आले आहे. वाढत्या वयासमवेत शरिरात ‘15-पीडीजीएच’ नामक एका प्रथिनाचे प्रमाण दुप्पट वाढते. हे प्रथिन गुडघ्यांमधील कार्टिलेजची झीज भरुन काढण्याची जी नैसर्गिक प्रक्रिया शरिरात होत असते, तिला विरोध करते. त्यामुळे ही झीज भरुन येत नाही. परिणामी, गुडघेदुखीचा विकार होतो. या नव्या औषधामुळे या प्रथिनाची वाढ खुंटली जाते. त्यामुळे गुडघ्यातल्या कार्टिलेजची झीज शरिकारकडून नैसर्गिकरित्या भरुन काढली जाते. ही झीज भरुन काढणाऱ्या ज्या पेशी आणि ऊती असतात, त्या या औषधामुळे पुन्हा कार्यरत होतात. त्यामुळे गुडघेदुखीच्या विकारापासून अवघड शस्त्रक्रियेविनाच आपली सुटका होऊ शकते. अर्थातच, हे औषध अद्याप बाल्यावस्थेत आहे. पण ते जेव्हा बाजारात उपलब्ध होईल, तेव्हा ते गुडघेदुखीच्या विकारामुळे त्रासलेल्या असंख्यांसाठी वरदान सिद्ध होऊ शकते.