For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘होय होय वारकरी‘ पुस्तकात वारकरी परंपरांचा चिकित्सक वेध

05:21 PM Jan 30, 2025 IST | Radhika Patil
‘होय होय वारकरी‘ पुस्तकात वारकरी परंपरांचा चिकित्सक वेध
Advertisement

कोल्हापूर : 

Advertisement

वारकरी संप्रदायाच्या वाटचालीचा आणि परंपरांचा वर्तमानकालीन परिप्रेक्ष्यातून वेध घेण्याचा प्रयत्न बंडगर यांनी या पुस्तकात केला आहे. केवळ कौतुक करणारे न लिहीता अत्यंत परखडपणे सत्य समोर आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. वारकरी संप्रदायाच्या परंपरांचा चिकित्सक वृत्तीने वेध घेणारे ‘होय होय वारकरी‘ हे मराठीतील एक महत्त्वाचे पुस्तक आहे, असे मत साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर यांनी व्यक्त केले.

शिवाजी विद्यापीठाचे संत तुकाराम अध्यासन आणि मराठी अधिविभाग यांच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त ह... ज्ञानेश्वर बंडगर लिखित ‘होय होय वारकरी‘ या ग्रंथाविषयी आयोजित चर्चेत ते बोलत होते. चर्चेत संत साहित्याचे अभ्यासक डॉ. श्रीरंग गायकवाड आणि प्राचार्य गोविंद काजरेकर यांनीही सहभाग घेतला. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के उद्घाटक म्हणून उपस्थित होते. ग्रंथाचे प्रकाशन कुलगुरू डॉ. शिर्के यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

Advertisement

प्रा. बांदेकर म्हणाले, वारकरी संप्रदायातील चांगल्या गोष्टी मांडतानाच वारकरी संप्रदायाच्या आडून समाजमन कलुषित करणाऱ्या प्रवृत्तींचाही शोध ते घेतात. काळाच्या ओघात वेळोवेळी दडविल्या गेलेल्या गोष्टीही पुराव्यानिशी प्रकाशात आणतात. त्याचप्रमाणे अनेक अलक्षित वारकरी, कीर्तनकार यांचेही कार्य सामोरे आणतात. विविध जाती समुदायातील अज्ञात कीर्तनकारांची नावे यात समजतात.

संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. श्रीरंग गायकवाड म्हणाले, जिथला नागरिक वारी करतो, तो महाराष्ट्र; आणि सर्व जातीधर्मांचे लोक एकत्र यावेत, याचे तत्त्वज्ञान सांगणारा तो महाराष्ट्र धर्म, असे वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्राचे अभिन्न नाते आहे. सहभोजनाची परंपरा वारकरी संप्रदायाने रुजविली. संतांनी लोकांना जोडून ठेवण्याचे काम सातत्याने केले. ज्ञानेश्वरी, भागवत आणि तुकारामांची गाथा हे तीन ग्रंथ अवघ्या मानवतेचे सारस्वरुप आहेत. अस्पृश्यतेसह कर्मकांडांची चिकित्सा करीत सर्वांना सामावून घेणारा असा वारकरी संप्रदाय आहे. या संप्रदायाच्या समग्र गुणवैशिष्ट्यांची अतिशय अभ्यासपूर्वक मांडणी बंडगर यांनी या पुस्तकात केली आहे.

प्राचार्य गोविंद काजरेकर म्हणाले, सांस्कृतिक धुरिणत्व भौतिक, बौद्धिक आणि सांस्कृतिक परिवर्तनासाठी आवश्यक असते. हे धुरिणत्व वारकरी संप्रदायाकडे संत ज्ञानेश्वर यांच्यापासून ते नामदेव, तुकाराम यांच्याकडून आले. ज्ञानेश्वरीमध्ये वारकरी संप्रदायाची बीजमांडणी करण्यात आली आहे. बंडगर यांनी बहुजनवादी परिप्रेक्ष्यातून या स्रायाची मांडणी पुस्तकात केली आहे. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के म्हणाले, समतेचा विचार प्रवाहीपणे सर्वदूर पसरविणारा वारकरी संप्रदाय म्हणजे तत्कालीन समाजातील एक विद्यापीठच होते. माणसातले माणूसपण कायम जपण्याचे काम वारी करीत असते. भक्तीरसाची प्रचिती घेण्यासाठी आणि आपले पाय जमिनीवर राहण्यासाठी वारीचा अनुभव घेणे आवश्यक आहे. बंडगर यांनी विद्यापीठाच्या संत तुकाराम अध्यासनाच्या माध्यमातून संतसाहित्याला आणखी योगदान द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

संत तुकाराम अध्यासनाचे समन्वयक डॉ. नंदकुमार मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. रणधीर शिंदे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रांजली क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. सुखदेव एकल यांनी आभार मानले. यावेळी डॉ. प्रभंजन माने, डॉ. अक्षय सरवदे, डॉ. मनोहर वासवानी आदी उपस्थित होते.


Advertisement
Tags :

.