शेंडा पार्कात साकारतेय मेडिकल हब
कोल्हापूर / इम्रान गवंडी :
शेंडा पार्क येथे साकारत असलेल्या भव्य 1100 बेडच्या हॉस्पिटलमुळे कोल्हापुरची वैद्यकीय नगरी म्हणून ओळख निर्माण होत आहे. एकाच छताखाली सर्व उपचार मिळणार असुन गरीब व गरजुंना याचा लाभ होणार आहे. यामध्ये 600 खाटांचे जनरल, 250 खाटांचे कॅन्सर हॉस्पिटल व 250 खाटांचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारले जाणार आहे.
1100 बेडच्या हॉस्पिटलसह फॉरेन्सिक इमारत, डॉक्टर्स व परिचारिका वसतिगृहे, मुलींचे 150 क्षमतेचे वसतिगृह, शवगृह, ग्रंथालय, प्रशासकीय मायक्रोबायोलॉजी व पॅथॉलॉजी, अंतर्गत रस्ते, गटार, फुटपाथ, सुशोभीकरण, क्रीडा सुविधांचा समावेश असल्याने सर्व उपचार एकाच छताखाली मिळणार आहे. सध्या याचे काम प्रगतीपथावर आहे. हॉस्पिटल उभारण्याचे काम प्रगतीपथावर असुन चारच दिवसापुर्वी पहिल्या मजल्याच्या स्लॅबचा शुभारंभ पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते व वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडला. दोन्ही वैद्यकीय मंत्रीपद कोल्हापुरला मिळाल्याने दोघांनीही कोल्हापुरच्या वैद्यकीय क्षेत्राला मोठ्या उंचीवर नेण्यासाठी लक्ष घातले आहे.
छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय व राजर्षी शाहू छत्रपती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा विस्तार होत आहे. नवीन होणारी तीन सुसज्ज रुग्णालये, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे विभागीय कार्यालय आणि परिचारिका महाविद्यालय यामुळे शेंडा पार्कमध्ये नवी वैद्यकीय नगरीच साकारत आहे.
- एकाच छताखाली सर्व उपचार
शेंडा पार्क येथे उभारण्यात येणाऱ्या 250 खाटांच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मेंदू, हृदय, मणका, फुफ्फुस, किडनीसारख्या गंभीर आजारांवर मोफत उपचार मिळणार आहेत. त्याचबरोबर 600 खाटांचे जनरल व 250 खाटांचे कॅन्सर हॉस्पिटल होणार आहे.
- असे आहे 1100 बेडचे हॉस्पिटल
-एकूण क्षेत्रफळ : 1 लाख एक हजार स्क्वेअर मीटर (30 एकर)
-एकूण अपेक्षित खर्च : 526 कोटी रूपये
-600 खाटांचे जनरल हॉस्पिटल (7 मजली इमारत)
-250 खाटांचे कॅन्सर हॉस्पिटल (6 मजली इमारत)
-250 खाटांचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल (6 मजली इमारत)
-किचन, लॉन्ड्री, स्टाफ वसतिगृहे, परिचारिका प्रशिक्षण केंद्र आदी सुविधा
- अशी सुरू आहेत कामे :
-अंतर्गत रस्ते, गटार व फुटपाथ 14.68 कोटी
-जमीन समपात व सुशोभीकरण 14.60 कोटी
-क्रीडा सुविधा (बॅडमिंटन, टेबल टेनिस कोर्ट) 4.56 कोटी
-फॉरेन्सिक इमारत 14.74 कोटी
-डॉक्टर्स व परिचारिका वसतिगृहे प्रत्येकी 1.36 कोटी
-फर्निचर 14.96 कोटी
-वसतिगृह विद्युत व स्थापत्य कामे 14.99 कोटी
-मुलींचे 150 क्षमतेचे वसतिगृह 1.36 कोटी
- सद्यस्थितीत पुर्ण झालेली कामे
-20 कोटींचे ऑडिटोरियम हॉल,
-9.59 कोटींचे फर्निचर, एकोस्टिक, विद्युतीकरण प्रगतिपथावर
-16.95 कोटींचे 150 मुलींसाठीचे वसतिगृह पूर्ण
-7.44 कोटींचे शवगृह पूर्ण
-9.55 कोटींची व्याख्यान व परीक्षा कक्ष इमारत पूर्ण
-10 कोटींचे ग्रंथालय, प्रशासकीय, मायक्रोबायोलॉजी व पॅथॉलॉजी इमारती पूर्ण
- असे होणार हॉस्पिटल
-एकूण 30 एकरांत 1,100 बेडचे सुसज्ज व अद्ययावत हॉस्पिटल
-आरोग्य संकुल; न्यायवैद्यकशास्त्राची स्वतंत्र इमारत
-सामान्य रुग्णालय, बाह्यरुग्ण विभाग : 600 बेड
-निवासी डॉक्टर्स व आंतरवासिताकरिता पुरुष वसतिगृह : क्षमता 250
-निवासी डॉक्टर्स व आंतरवासिताकरिता महिला वसतिगृह : क्षमता 250
-मुलींचे वसतिगृह : क्षमता 150
-मुलांचे वसतिगृह : क्षमता 150
-परिचारिका प्रशिक्षण केंद्र इमारत : क्षमता 300
-सेंट्रल लायबरी परीक्षा भवन : क्षमता 400
-अंतर्गत रस्ते डांबरीकरण व काँक्रीटीकरण
- गरीब व गरजुंना आधारवड
शेंडा पार्क येथे उभारण्यात येणाऱ्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मेंदू, हृदय, मनका, फुफ्फुस, किडनीसारख्या गंभीर आजारांवर मोफत उपचार मिळणार आहेत. 1100 बेडच्या हॉस्पिटलचे काम लवकर पुर्णत्वाकडे नेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. रुग्णांना यापुढे पुणे किंवा मुंबईला धाव घ्यावी लागणार नाही. प्रत्यक्ष बांधकामही वेगाने सुरू आहे. कोल्हापुरात सर्व सुविधांचे हॉस्पिटल होत असल्याने येत्या काही दिवसात वैद्यकीय क्षेत्रात कोल्हापूर जिल्हा गरूड झेप घेणार आहे.
-हसन मुश्रीफ, वैद्यकीय शिक्षण मंत्री